The Gavankars

Tuesday, July 25, 2017

मराठी माणसाला काय येत नाही !!मराठी भाषा दिन अथवा महाराष्ट्र दिन असला की काही टिपिकल मेसेजेस व्हाट्सअप वर फिरू लागतात.त्यातलाच एक मेसेज म्हणजे "मराठी माणसाला काय येते " ! थोर व्यक्तींची नावे घेऊन ,मराठी माणसाला हिंदवी स्वराज्य स्थापन करता येते / राज्यघटना लिहिता येते /मराठी माणसाला भारतीय असंतोषाचे जनक होता येते / मराठी महिलेला राष्ट्र्पती होता येते /मराठी क्रिकेटपटू विश्वविक्रमवीर होतो /मराठी माणसाला अमुक येते आणि तमुक येते ..वगैरे वगैरे लिहून "अभिमान आहे मराठी असल्याचा" ची फुशारकी मारली जाते .हे जे कोणी "थोर" असतात ते फक्त  "मराठी" म्हणून नव्हे तर आपल्या अंगभूत गुणांनी आणि परिश्रमाने मोठे झालेले असतात . पण आपण मात्र त्यांना फक्त "मराठी" लेबल चिकटवून फुशारक्या मारतो . 

ठीकाय ...आपल्या भाषेचा /राज्याचा /संस्कृतीचा /थोर महापुरुषांच्या कार्याचा अभिमान असणे यात वाईट काहीच नाही . पण हे सर्व करताना आजचा मराठी समाज कसा आहे याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे केवळ आपल्या गौरवशाली इतिहासाच्या रम्य कथांमध्ये रमणाऱ्या  आणि आपल्या वर्तमानाकडे दुर्लक्ष करणाऱ्या समाजाला उज्जवल भविष्य असूच शकत नाही . पुढे नमूद केलेल्या मुद्द्यांना काही सन्माननीय अपवाद नक्कीच आहेत .पण सदरचे निरीक्षण कॉर्पोरेट तसेच सामाजिक क्षेत्रातील दीड दशकाच्या स्वानुभवावरून नोंदवित आहे .यात कुठल्याही समाजाला बदनाम करण्याचा हेतू नसून केवळ एक आरसा दाखविणे आहे 

"मराठी माणसाला काय येत नाही " याबद्दल सुद्धा आता थोडी चर्चा करूया  :


१. आजच्या मराठी  तरुणाईला सहसा  प्रतिकात्मकतेच्या बाहेर पडून मूलभूत काम करणे जमत नाही :


आज महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यात  गावच्या नाक्यावर /एस टी स्टॅन्ड वर / चहा टपरी /तालमी वगैरे ठिकाणी तिशीतल्या  रिकामटेकड्या तरुणांच्या भरपूर टोळ्या दिसतात . कोणीतरी यावर एक सुंदर लेख लिहिला होता जो मला व्हाट्सअप वर आला होता.लेखकाचे नाव आठवत नाही . यांना दिवसभर टवाळक्या करीत  स्थानिक आणि अगदी इंटरनॅशनल राजकारण ,खेळ वगैरे वर चर्चा करणे फार आवडते . पण या चर्चातून काही विधायक कार्य करावे असे फार कमी जणांना वाटते .वर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवली ,चंद्रकोरीचा टिळा लावला आणि उठता बसता " जगदंब " किंव्वा "जय महाराष्ट्र" म्हटल्याने महाराज होता येत नाही .महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ वयाच्या १६ व्या वर्षी मूठभर मावळ्यांना घेऊन रोवली आणि आमचे हे तिशीतले घोडे  आज केवळ फॅशन म्हणून महाराजांचा वापर करतात .!
१० मराठी पोरं एकत्र जमली तर फार तर दही हंडी सुरु करतील किंव्वा एक गणपती बसवतील आळीत . पण मूलभूत सामाजिक कार्य करणारे / उद्योजकता विकास व्हावा म्हणून झटणारे तरुण फारच कमी . 

गावचा सरपंच /आमदार /सहकारी संस्थेचे संचालक वगैरे कोणी मोठे " झाड" पकडून रहायचं आणि फुशारकी मारायची हे यांचे जीवितकार्य ! राजकारणी माणसे धूर्तपणे गरज असे पर्यंत यांना वापरतात आणि मग खड्यासारखे बाजूला फेकतात .तो पर्यंत चाळीशी आली असते आणि हातात काही काम नसते ! ना कुठले कौशल्य शिकून झालेले असते जे यांचे पोट भरायला मदत करेल ! 

राजकारणात पडलेले तरुण सुद्धा "धंदा" काय करतात ? तर नगरपालिका /जिल्हा परिषदे मध्ये रस्ते आणि गटारांची बांधकाम कंत्राटे घेणे !यात यांचे नॉलेज असते शून्य पण कुठल्या साहेबाला कसे "पटवायचे" हे मात्र बरोबर समजते . हीच हुशारी इतर उद्योग धंद्यात मात्र दिसत नाही .


२. मराठी माणसाला धड  उद्योग  धंदा करता येत नाहीच पण कॉर्पोरेट क्षेत्रात मिळेल  ती नोकरी पत्करून अनुभव घेणे सुद्धा आवडत नाही ! 


काही सन्माननीय अपवाद सोडले तर मराठी माणसाला उद्योग धंदा करताच येत नाही .याची अनेक कारणं आहेत . सर्वात मोठे कारण म्हणजे मराठी माणसामध्ये असलेला "मोडेन पण वाकणार नाही " असा असलेला वृथा बाणा ! बिझनेस करताना थोडे फार लवचिक असावे लागते . गोड बोलून,डोक्यावर बर्फ ठेवून वागावे लागते . पण आम्ही मात्र "एक घाव दोन तुकडे" करणारे ! जे पटणार नाही त्यात फटकन बोलून मोकळे होणारे ! मग कुणी दुखावले /नाराज झाले तरी फिकीर नाही . हीच अडचण नोकरी बाबत ! इकडे आपल्या "पे डिग्री" चा वृथा अभिमान आडवा येतो  ! " आमचे आजोबा ब्रिटिश काळात फायनान्स ऑफिसर होते ! आम्ही इस्त्रीचा धंदा कसा काय करणार ! " किंवा  " अमुक तमुक संस्थानिकांना सुद्धा कर्ज देणारं आमचं घराणं ! .आहात कुठं ? आमचा बंडू नाही बुवा करणार ती "फालतू" ( ! ) १५ हज्जार देणारी नोकरी ! " ," पोरीला घरी बसवीन पण इव्हेंट मॅनेजमेंट कम्पनी मधली नोकरी करून देणार नाही ! रात्री बेरात्री घरी येईल ..लोक काय म्हणतील ! " ..असले संवाद आपण नेहमी ऐकले असतील ! या मध्ये मुले शिकून सुद्धा नुसती घरी बसतात . या उलट इतर राज्यातील तरुण पडेल ती नोकरी घेऊन लाख मोलाचा जीवनानुभव मिळवतात ! हळू हळू कॉर्पोरेट लॅडर चढतात ! योग्य वेळी कधी कधी आपला स्व-रोजगार सुद्धा शोधतात ! 

आयुष्यात कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली तर  माणूस खूप पुढे जाऊ शकतो .पण काही करायचेच नाही आणि व्यवस्थेला शिव्या द्यायच्या तर आपलेच नुकसान होते 


३. मराठी माणसाला "बिझनेस नेटवर्किंग " जमत नाही ! 


फेसबुक आणि व्हाट्सअँप वर पडीक असणारे तरुण त्या आभासी जगात रमतात !पण विविध क्षेत्रात काम करताना आपण ज्यांना भेटतो त्यांना आपल्या "नेटवर्क" मध्ये सामावून घेण्याची कला फार थोड्यांना जमते ! आजच्या जगात कोण कधी कसा उपयोगी पडेल आणि कोणाची आपल्याला करियर मध्ये अथवा अगदी वैयक्तिक आयुष्यात कधी मदत लागेल याचा नेम नसतो . पण भेटलेल्या माणसाच्या क्षेत्राबद्दल जुजबी माहिती करून घेणे ,असल्यास आपले विझिटिंग कार्ड एक्सचेंज करणे ,लिंक्डइन सारख्या प्रोफेशनल नेटवर्क वर त्यांना "ऍड" करणे ,वगैरे फार कमी तरुण करतात . विविध इंडस्ट्रीयल प्रदर्शनांना भेट देणे ,सध्या कुठल्या क्षेत्रात चलती आहे याचा अंदाज घेऊन एखाद्या कम्पनीची डिस्ट्रिब्युटरशीप घेऊन बघणे ,चार मित्र एकत्र येऊन एखादा पार्ट टाइम लघु उद्योग करून बघणे वगैरे मराठी तरुण अभावानेच करताना दिसतात . आपली "बिझनेस" ची उडी वडा पाव /पाव भाजी ची गाडी अथवा दिवाळी मध्ये होलसेल ने फटाके आणून रिटेल मध्ये विकणे याच्या पुढे जात नाही . 

होलसेल मार्केट मध्ये फिरणे,बिझनेस चे तंत्र समजून घेणे ,इतर समाजातील बिझनेस करणाऱ्यांशी चर्चा करणे हे केल्याशीवाय उद्योजकता विकास होणार  कसा ?

सॅटर्डे/संडे  क्लब ,मराठी उद्योग क्लब वगैरे प्रयत्न नक्कीच सुरु आहेत पण यातून फारसे  नवीन उद्योजक घडताना काही दिसत नाहीत हे पण तितकेच खरे .त्याच त्याच लोकांची कॉन्फरन्स रूम्स मध्ये भरणारी पिकनिक एव्हढेच या "मराठी बिझनेस  क्लब्स" चे आऊटपूट !


४. मराठी माणसाला एकमेकांना धरून पुढे जाणे जमत नाही .


आपल्या मराठी समाजात एकमेकांना पुढे जाण्यात मदत करण्याची वृत्ती फारशी नाहीच . आपला समाज "individual excellence " च्या मागे धावणारा आहे . याउलट गुजराती /मारवाडी/उत्तर भारतीय/दक्षिण भारतीय ..कुठलाही समाज घ्या ." आपल्या " लोकांना नोकरी /उद्योगात मदत करून "समाज" म्हणून उन्नती करून घेण्याची वृत्ती दिसते . एक उत्तर भारतीय  मुंबई मध्ये आला की गावाकडून १० लोकांना घेऊन येतो आणि आपल्या खोलीत राहायला देतो .एखाद्या बँकेमधला दक्षिण भारतीय उच्च अधिकारी आपल्या टीम मध्ये प्रोमोशन्स चा विचार करताना सर्व प्रथम "आपल्या" माणसांना प्राधान्य देतो . एखादा गुजराती शेठ कच्छ च्या छोट्याश्या गावातून आपल्या लांबच्या नात्यामधल्या होतकरू मुलाला मुंबई ला आणून आपल्या धंद्याच्या  सर्व खाचा खोचा शिकवतो आणि तोच मुलगा पुढे जाऊन स्वतः चा धंदा काढून करोडपती होतो .आम्ही मात्र फक्त पदव्या घेऊन बॅंकेतली /आय टी कम्पनीमधली  नोकरी पकडतो आणि बाकी मराठी लोक गेले तेल लावत म्हणून आयुष्य आपल्या कुटुंबापुरते मर्यादित जगतो .

आपले ज्ञान शेअर करावे ,कुणाला तरी "मेंटरींग" करावे असे आपल्या मराठी बॉसेस ना /उद्योगपतींना वाटतच नसावे .यात अजून एक प्रकार म्हणजे नको तो तत्वनिष्ठपणा ! आपल्याला जास्त भीती असते की मी जर मराठी माणसाला पुढे केले तर लोक मला पक्षपाती म्हणतील ! हे जे कोण "लोक " असतात ते कुणालाच कधीच दिसत नाहीत बरं  का ! .पण प्रत्येक गोष्टीत "लोक काय म्हणतील " असतंच ! परंतु जर आपल्या समोर पूर्णतः सारख्या गुणवत्तेचे दोन उमेदवार असतील आणि आपल्याला त्यातून एकच निवडता येणार असेल तर तो एक उमेदवार मराठी असला तर पक्षपात कसा ? पण माझ्या अनुभवात कित्येक असे प्रसंग पहिले आहेत की  मराठी मॅनेजर्स /बॉसेस या "पक्षपाती" शिक्क्याला घाबरून लायकी असताना सुद्धा मुद्दाम मराठी टीम मेंबर ला प्रमोशन देत नाहीत. इतर बॉसेस मात्र आपल्या बरोबर आपल्या समाजाच्या लोकांना कॉर्पोरेट लॅडर वर घेऊन पुढे जातात .
५. मराठी माणसाला आपल्या क्षेत्रात सदैव अद्ययावत रहाणे जमत नाही आणि आलेल्या संधीचा फायदा घेणे जमत नाही 


सध्या जग इतकं बदलतंय की आजचे ज्ञान उद्या कालबाह्य होतंय . पण मराठी समाजात अजूनही "एकदा नोकरीला चिकटलो की रिटायर होईपर्यंत आजू बाजूला बघायचं नाही की नवीन काही शिकायचं नाही" ही वृत्ती दिसते .एव्हढंच काय तर मुंबई,पुण्याच्या बाहेर जायचं नाही म्हणून प्रोमोशन्स नाकारणारे सुद्धा आहेत ! नवीन काही शिकायचं म्हटलं तर कपाळावर आठ्या येतात . कम्पनीचा नवीन प्लांट उत्तराखंड ला सुरु होतोय आणि तिकडे प्रमोशन घेऊन जाण्यापेक्षा इकडेच दुय्यम काम करायचे आणि मग कम्पनीने तुमची गरज नाही म्हणून काढून टाकले की "आमच्यावर अन्याय झाला" म्हणून गळा काढायचा हे नेहमीचे .तीच संधी इतर समाजाचे लोक घेतात आणि भर भर वर चढतात . आम्हाला मुंबई ,पुणे,फार तर नागपूर चालते आणि त्या नन्तर डायरेक्ट् अमेरिका लागते . भोपाळ /पंतनगर /विशाखापट्टणम /गुवाहाटी/चेन्नई वगैरे नाही जाणार आम्ही ! 

आईन्स्टाईन ने म्हटले आहे की ज्या दिवशी तुम्ही नवीन गोष्टी शिकायच्या थांबवलं त्या दिवशी तुमची मृत्यूची वेळ जवळ येईल !


नवीन शिकण्याची वृत्ती आपल्या बहुतांश मराठी मुलांमध्ये तर अजिबात नाही . नेहमीच्या कामा व्यतिरिक्त एखादे वेगळे काम आले तर मराठी माणूस "हे माझे काम नाही ,मला याचा पगार मिळत नाही " म्हणून बाजूला होतो . उलट इतर समाजाचे तरुण आपल्या कामाव्यतिरिक्त इतर कौशल्ये कशी शिकायला मिळतील याचा नेहमी विचार करीत असतात . 

मराठी तरुणांनी या मुद्यांचा जरूर विचार करावा !हा लेख पटला /आवडला तर कृपया लेखकाच्या नावासकट आणि या ब्लॉग च्या लिंक सकट शेअर करा .आपल्या प्रतिक्रिया खालील दिलेल्या ईमेल वर पाठवा .

चिन्मय गवाणकर ,वसई 

(लेखातील सर्व ग्राफिक्स : इंटरनेट वरून गुगल इमेज सर्च मधून साभार .स्वामित्वहक्क असल्यास त्या त्या वेबसाईटचे राखीव . )

Sunday, July 16, 2017

"करोड रुपयांच्या सॅलरी पॅकेजेस " चे सत्य !!


 पूर्वप्रसिद्धी :  लोकसत्ता : लोकरंग पुरवणी : १६ -०७-२०१७ ( http://www.loksatta.com/lekha-news/article-show-truth-about-highest-salary-package-in-multinational-companies-1512435/


आय आय टी आणि आय आय एम च्या कॅम्पस इंटरव्ह्यू मधून तिकडच्या विद्यार्थ्यांना अमेरिकेत काही कम्पन्यांकडून "ऑफर " झालेल्या गलेलठ्ठ  पगाराच्या च्या बातम्या आपण सर्वानीच वाचल्या असतील .आपल्या वर्तमानपत्रांना सुद्धा अश्या बातम्यांना मीठ-मसाला लावून देण्यात मज्जा वाटते ."२२ वर्षाच्या इंजिनियरला मायक्रोसॉफ्ट/उबर /गुगल /अमक्या तमक्या कम्पनीची सव्वा कोटी वार्षिक पगाराची ऑफर " /"आय आय एम अहमदाबाद च्या मुलीला न्यू यॉर्क मध्ये दीड कोटीचे पॅकेज " अश्या बातम्या हल्ली नित्याच्या झाल्या आहेत .अमेरिकन डॉलर मध्ये असलेल्या पॅकेज ला खूप सुलभपणे ७० ने गुणून भारतीय रुपयात डोळे विस्फारणारे आकडे छापून "सनसनी " निर्माण करणे हा मीडिया चा आवडता धंदा आहे . म्हणून आपण या लेखात आज या सर्व प्रकारचे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत . ( फोटो : टाइम्स ऑफ इंडिया च्या पब्लिक वेबसाईट वरून साभार.सर्व हक्क टाइम्स ग्रुप कडेच राखीव )

या बातम्यांचा परिणाम विशेषतः म्हणून समाजातील दोन वर्गावर होतो ,ते म्हणजे १ . इंजिनियरिंग आणि एम बी ए करणारे /करण्यास इच्छुक असणारे विद्यार्थी आणि  २. त्यांचे पालक ! या दोन वर्गांना साधारणपणे खालील तीन प्रकारात विभागता येईल : 

प्रकार एक : भारावलेले पालक आणि त्यांचे भांबावलेले पाल्य  : 

आपल्या मुलाची अथवा मुलीची बौद्धिक क्षमता / मेहनत करण्याची तयारी /आधी मिळालेले गुण /शिक्षणासाठी उपलब्ध असणारा पैसा असल्या कुठल्याही गोष्टींचा विचार न करता या प्रकारातील पालक "सव्वा कोटी पगार आणि कॅलिफोर्निया मध्ये नोकरी " हे स्वप्न आपल्या मुलांवर लादतात आणि मग सुरु होतो एक संघर्ष ! आय आय टी JEE /आय आय एम च्या CAT साठी महागडे क्लास लावणे /मुलाचे खेळ /मित्र मैत्रिणी सगळं बंद करून त्या "बैला" ला घाण्याला जुंपणे सुरु होते आणि जर ऍडमिशन नाही मिळाली तर मग अक्खे घर सुतकात बुडते ! 

प्रकार दोन : इंजिनियर /एम बी ए होऊन ,नोकरी मिळून सुद्धा "करोड रुपया चे पॅकेज न मिळाल्याने " भ्रमनिरास झालेले दुःखी पालक त्यांचे  पाल्य :

हा प्रकार अजून डेंजरस ! कारण घासून घासून अभ्यास करून ,चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवून,कॅम्पस इंटरव्हू मधून यांना वार्षिक १०-१२ लाखाच्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या तरी यांना आपला "पेला अजून अर्धा" आहे असे फिलिंग येते ..कारण कॉलेज मधल्या एका कोणाला तरी मिळालेली तथाकथित "करोड" रुपयाची ( !! ) अमेरिकन ऑफर  ! म्हणजे मिळालेल्या नोकरी चा आनंद न घेता यांचे घर सुद्धा सुतक साजरे करते ! 

म्हणून आपण पहाणार आहोत या "करोड रुपयांच्या पॅकेजेस " चे सत्य :


१. नक्की सॅलरी पॅकेज म्हणजे काय  ? 

प्रत्येक कम्पनीच्या पगाराचे पॅकेज हे काही छोट्या छोट्या गोष्टींनी बनते .प्रत्येक पॅकेज मध्ये "फिक्स" आणि "व्हेरिएबल " असे मूळ दोन विभाग असतात . "फिक्स" म्हणजे तुम्हाला दर वर्षी नक्की मिळणारा पगार आणि "व्हेरिएबल" म्हणजे तुमच्या /कम्पनीच्या परफॉर्मन्स /बिझनेस रिझल्ट्स वर अवलंबुन असणारा पगार .आणि सध्या ज्या क्षेत्रात आणि विभागात तुम्ही नोकरी करता त्या त्या प्रमाणे या "फिक्स " सॅलरी ची पॅकेज मधील टक्केवारी बदलते. उदा . विक्री ,मार्केटिंग इत्यादी विभागातील कर्मचाऱ्यांना जर १०० रुपयाचे "पॅकेज" असेल तर त्यातील ६० % अथवा कधी कधी तर ५० % पगार फक्त "फिक्स " म्हणजे तुम्हाला नक्की हातात  मिळणार असतो . तुमचे काम जर बॅक ऑफिस चे अथवा ऍडमीन /एच आर वगैरे असेल तर कदाचित हीच टक्केवारी ८० % फिक्स आणि २० % व्हेरिएबल अशी असू शकते . पण एक मात्र खरं की एक सरकारी नोकऱ्या सोडल्या तर सहसा कुठलीही खाजगी कम्पनी आज १०० % फिक्स पगार ऑफर करत नाही . 

या "फिक्स" मध्ये मोठा सहभाग असतो तो असतो मूळ पगार म्हणजे " बेसिक "  सॅलरी चा .ज्यावर तुमचा प्रॉव्हिडन्ट फ़ंड ,ग्रॅच्युइटी वगैरे गणले जातात . तसेच उरलेला फिक्स पगार  घरभाडे भत्ता ,वाहतूक भत्ता ,एल टी ए ( वार्षिक ) ,मेडिकल रिइम्बर्समेंट ,फूड कुपन्स ( तिकीट/सोडेक्सो  ई  ) वगैरे भागांनी बनतो .व्हेरिएबल पगार म्हणजे वार्षिक बोनस /सेल्स कमिशन वगैरे भागांनी बनतो ज्याची "मिळेलच " अशी ग्यारंटी कोणी देऊ शकत नाही .त्यामुळे एखादी कम्पनी १०० रुपया चे "पॅकेज" देत असेल तर त्याचा अर्थ १०० रुपये बँक अकाउंट ला आलेच असा होत नाही . 

तसेच कम्पनी आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ करीत असलेल्या इतर सोयी,सुविधा सुद्धा " कॉस्ट  टू  कम्पनी" मध्ये धरल्या जातात आणि त्यांची किंमत "पॅकेज" मध्ये दाखवली जाते ! म्हणजे एखाद्या कम्पनीने तुम्हाला १० लाखाचा मेडिक्लेम म्हणजे आरोग्य विमा देऊ केला तर त्याचा जो १०००० वगैरे जो काय वार्षिक हफ्ता असेल तो तुमच्या "पॅकेज" मध्ये १०००० बेरीज करून दाखविले जातात ! हे १०००० तुम्हाला मिळणार नसतात पण कम्पनी तुमच्यावर खर्च करणार असते तो तुम्हाला "बेनिफिट" म्हणून दाखवतात .एखादी कम्पनी तुम्हाला घरापासून ऑफिस पर्यंत बस सर्व्हिस देत असेल तर त्याचा खर्च सुद्धा "पॅकेज" मध्ये दाखविला जाण्याची उदाहरणे आहेत !

तसेच तुमच्या कमाईवर जाणारा इन्कम टॅक्स तर वेगळाच ! त्याचा तर आपण अजून विचार सुद्धा केला नाहीये . म्हणजे १०० रुपयाचे " पॅकेज" वाल्या माणसाला एखाद्या वर्षी कम्पनीची  किव्वा त्याची स्वतः ची कामगिरी चांगली झाली नाही म्हणून सॅलरी स्लिप च्या डावीकडे  ६० रुपयेच "दिसू" शकतात आणि त्या वर सुद्धा सरासरी ३० % इन्कम टॅक्स धरला तर बँकेत ४२ रुपयेच जमा होऊ शकतात !

म्हणजे "सॅलरी पॅकेज" हा फार फसवा प्रकार असतो आणि सामान्य माणसांना तो न समजल्याने पॅकेज भागिले १२ महिने करून "बापरे त्याला एव्हढे लाख महिन्याला मिळतात " अश्या चर्चा आपल्या मराठी मध्यमवर्गीय घरांमध्ये डोळे विस्फारून केल्या जातात ! 

२. बाहेरच्या देशात पण पॅकेजेस अशीच असतात का ? 

अमेरिका,सिंगापूर,ऑस्ट्रेलिया ,युरोपियन देश आदी ठिकाणी सुद्धा हेच फिक्स आणि व्हेरिएबल चे तत्व राबवले जाते . पण त्यांचे "स्ट्रक्चर" वेगळे असू शकते . म्हणजे बऱ्याच तंत्रद्यान क्षेत्रातील कम्पन्या आपल्या "पॅकेज" मध्ये "एम्प्लॉयी स्टॉक ऑप्शन्स" देतात . तसेच पहिल्या वर्षी "जॉइनिंग बोनस" अथवा " साईनिंग बोनस " देतात .हे बोनस फक्त पहिल्या वर्षी मिळतात आणि त्यामुळे दुसऱ्या वर्षांपासून ते गायब होतात . स्टॉक ऑप्शन्स म्हणजे कम्पनीचे शेअर्स सुद्धा असेच दिले जातात जे हळू हळू दर वर्षी काही एक संख्येत कर्मचाऱ्याच्या डिमॅट अकाउंट ला ४ ते ५ वर्षात जमा होतात आणि कर्मचारी ते लगेच विकू सुद्धा शकत नाहीत . या ४/५ वर्षाच्या काळात जर कम्पनीच्या शेअर ची किंमत कमी झाली तर त्याचा फटका कर्मचाऱ्याला बसतो . म्हणजे पॅकेज मध्ये शेअर च्या आजच्या भावात दाखवलेले मनोहारी चित्र कायम राहीलच असे नाही . ( फोटो : टाइम्स ऑफ इंडिया च्या पब्लिक वेबसाईट वरून साभार.सर्व हक्क टाइम्स ग्रुप कडेच राखीव )

एक  उदाहरण घेऊ  : समजा एखादा विद्यार्थी आज मायक्रोसॉफ्ट मध्ये अमेरिकेत जॉईन करतोय आणि कम्पनी त्याला "पॅकेज " मध्ये ५०० रिस्ट्रिक्टेड स्टॉक ऑप्शन्स देणार असे दाखवतेय,तर सहसा हे ५०० शेअर दर वर्षी १/४ म्हणजे प्रत्येक वर्षाच्या शेवटी  १२५ असे ४ वर्षे जमा होतात .आज मायक्रोसॉफ्ट च्या शेअर ची किंमत साधारण ६८ डॉलर आहे .म्हणजे जरी कम्पनीने त्या विद्यार्थ्याला ५०० शेअर्स देण्याचे कबूल केले असेल तरी त्याचा अर्थ पॅकेज मध्ये पहिल्याच वर्षी त्याला ५०० शेअर X ६८ डॉलर असे ३४००० डॉलर्स म्हणजे आपल्या बाळबोध गणिताप्रमाणे २३,८०,००० रुपये मिळणार नाहीत . पण पॅकेज जाहीर करताना हे सगळे अंतर्भूत करून दाखवले जाते .अमेरिकन आणि युरोपियन कम्पन्यांचे हे नेहमीचे आहे . 

काही कम्पन्या हे शेअर्स कधी विकायचे याचेही नियम घालून देतात .म्हणजे शेअर मिळाल्यापासून २ वर्षे विकायचे नाहीत किंवा कम्पनी सोडली तर अर्धे शेअर परत द्यायचे वगैरे वगैरे . याचाही विचार "पॅकेज" मध्ये केला पाहिजे . 

३. डॉलर मधले पगार जास्त का असतात ? 

याचे साधे उत्तर म्हणजे ,ते जास्त "असण्या" पेक्षा "जास्त" वाटतात कारण आपली डॉलर ला गुणिले ७० करण्याची घाई ! आपण हे लक्षात घेत नाही की जो डॉलर मध्ये कमावतो तो डॉलर मध्येच खर्च करतो ! हे समजून घेण्यासाठी "पर्चेसिंग पॉवर पॅरिटि " हा प्रकार प्रथम समजून घेऊन .याचा अर्थ एखाद्या देशात स्थानिक चलन कोणत्या वस्तू किती भावात विकत घेऊ शकते ! ज्यांना अर्थशास्त्र कळत नाही त्यांच्यासाठी हा मुद्दा समजून घेण्याचा सोपा उपाय म्हणजे "द इकॉनॉमिस्ट" या मासिकाने १९८६ मध्ये गम्मत म्हणून तयार केलेली "बिग मॅक इंडेक्स " ! मॅकडॉनल्ड्स ही फास्ट फूड कम्पनी बहुतेक देशात पसरली आहे आणि त्यांचा प्रसिद्ध बिग मॅक बर्गर त्या त्या देशात किती ला मिळतो यावरून हा तक्ता त्यांनी बनवला . यातून मी वर नमूद केलेला "चलनाची खरेदी करण्याची क्षमता" समजून घेता येईल .

जानेवारी २०१७ च्या किमतीनुसार ५.०६ डॉलर्स ला मिळणार बर्गर भारतातील मॅक्डोनल्ड्स मध्ये १७० रुपयाला मिळतो !  म्हणजे १७०/५.०६ =३३.५९ रुपयाला एक डॉलर असा हिशेब झाला . आपण गणित मात्र नेहमी ७० ने गुणून करतो ! याचा अर्थ भारतात नोकरी करणाऱ्या व्यक्तीला बर्गर खायचा असेल तर अमेरिकेतल्या व्यक्ती पेक्षा अर्धे पैसे भारतीय चलनात पुरेसे होतील .


( फोटो : द इकॉनॉमिस्ट  च्या पब्लिक वेबसाईट वरून साभार.सर्व हक्क इकॉनॉमिस्ट  कडेच राखीव )

आता यातला गमतीचा भाग जरी सोडला तरी ,बाकी "कॉस्ट ऑफ लिव्हिंग" चा विचार केला तरी अमेरिकेत आणि त्यातही कॅलिफोर्निया बे एरिया मध्ये /लंडन /सिंगापूर मध्ये  राहणे भारतापेक्षा फार महाग आहे . आणि त्यामुळे तिकडच्या लोकांना आपल्याला भन्नाट वाटणारे पगार डॉलर मध्ये मिळतात . अजून काही उदाहरणे बघू :

  • सॅन फ्रान्सिस्को मध्ये मेट्रो चे किमान भाडे आहे २.२६ डॉलर आणि आपल्या मुंबई मध्ये ते आहे १० रुपये ! म्हणजे ७० च्या हिशेबाने तिकडची मेट्रो किमान १५८.२ रुपये घेते तर आपला मुंबईकर १० रुपयात मेट्रो मध्ये किमान भाड्यात प्रवास करू शकतो ! 
  • सॅन फ्रान्सिस्को मध्ये १ बी एच के फ्लॅट चे किमान भाडे असते २५०० डॉलर्स ! आणि मुंबई मध्ये अगदी दादर सारख्या ठिकाणी सुद्धा आज १ बी एच के फ्लॅट ३० ते ३५ हजार रुपये महिना भाड्यात मिळतो . याचा अर्थ असा की सॅन फ्रॅंसिस्को मध्ये एका डॉलर ची खरेदी करण्याची क्षमता ही ३५०००/२५०० =१४ रुपये जी खरेदी मुंबई मध्ये करू शकेल तेव्हढी आहे . ७० रुपये नव्हे .वरील चित्रात सर्वात महाग शहरे लाल रंग छटांमध्ये असून सर्वात स्वस्त शहरे हिरव्या रंग छटांमध्ये आहेत 

( फोटो : नंबिओ च्या पब्लिक वेबसाईट वरून साभार.सर्व हक्क नंबिओ  कडेच राखीव )
  • सिंगापूर मध्ये टॅक्सी भाडे ( एसी ) आहे किमान ३.५ सिंगापूर डॉलर ,आणि मुंबई मध्ये कुल कॅब चे किमान भाडे आहे २८ रुपये . म्हणजे सिंगापूर डॉलर आणि भारतीय रुपये यांचा फॉरेन एक्सचेंज रेट आज जरी १ सिंगापूर डॉलर = ४८  भारतीय रुपये च्या आस पास असला तरी याचा अर्थ असा नाही की भारतात ४८ रुपयात जी वस्तू मिळते ती सिंगापूर डॉलर मध्ये १ डॉलर ला मिळेल .
  • लंडन मध्ये ब्रेड चा एक लोफ मिळतो १ पाउंड मध्ये .पण पुण्यामध्ये तोच ब्रेड ९० रुपयाला नाही तर मिळतो साधारण १५ ते २० रुपयाला ! 
दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिका आणि भारतातील  सामाजिक आणि आर्थिक रचना  ! मनुष्यबळ तिकडे फार महाग असल्याने कितीही कमवत असलात तरी ड्रायव्हिंग / लाऊंड्री /बागकाम /साफ सफाई असली सर्व कामे स्वतः ची स्वतः च करावी लागतात . आपल्या कडे मात्र लोकसंख्या जास्त असल्याने कमी पैशात कामाला माणसे मिळतात . अमेरिकेत चांगल्या पाळणाघराची आठवड्याला २०० डॉलर्स भरावे लागतात .इकडे महिना ४-५ हजारात चांगली पाळणाघरे मिळतात . म्हणजे नुसता पैसा कमवणे एक गोष्ट झाली आणि तिकडे आयुष्य अमेरिकन माणसाप्रमाणे जगणे ही वेगळी गोष्ट झाली .भारतीय समाजात श्रमाला किंमत नसल्याने असली घरगुती कामे सुद्धा बऱ्याच लोकांना कमीपणाची वाटतात आणि मग तिकडे गेल्यावर गपचूप डॉलर वाचवायला सगळी कामे करावी लागतात .ती सुद्धा तयारी तुमची असली पाहिजे . 

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे जरी एखादा विद्यार्थी १७५,००० अमेरिकन डॉलर ( फॉरेन एक्सचेंज रेट च्या हिशेबाने सव्वा कोटी रुपये ) च्या पॅकेज वर निवडला गेला आणि तो अमेरिकेत /सिंगापूर/लंडन इकडे रहाणार असेल तर त्याला स्थानिक "कॉस्ट  ऑफ लिव्हिंग " प्रमाणे तो पगार तिकडेच खर्च करायचा आहे हे लक्षात घ्या.त्यातही अमेरिकेत त्याला २८ % टॅक्स बसणार  + वर सांगितल्याप्रमाणे त्याचा फिक्स पगार साधारण ५० % असणार तो म्हणजे ८७,५०० डॉलर .बाकी सगळे कामगिरी वर अवलंबुन !

हे सगळं सरासरी काढून पाहिलं तर भारतात रहाणे अमेरिकेपेक्षा साधारण ६४ % स्वस्त आहे ! म्हणजे अमेरिकेत नेट ८७,५०० डॉलर वर्षाला पगार घेणारा, आणि तिकडेच खर्च करणारा माणूस आपली "लाइफस्टाइल" न बदलता इकडे भारतात साधारण २१  लाख पगारात आरामात राहू शकतो . ( प्री टॅक्स )

आता २१ लाख पगार सुद्धा जास्त आहेच ! पण सव्वा कोटी-दीड कोटी च्या स्वप्नातून बाहेर पडलेलेच बरे ! कारण आज भारतीय कम्पन्या /भारतात काम करणाऱ्या बहुराष्ट्रीय कम्पन्या सुद्धा चांगल्या कॉलेजेस मधल्या  फ्रेश आय आय एम  एम बी ए /आय आय टी इंजिनियर्स ना १५ ते २० लाख पगार देतात . त्यातही स्टॉक ऑप्शन्स वगैरे प्रकार कमी असतात . म्हणजे हातात जास्त पगार येतो आणि इकडे त्याच पैशात तुम्ही ड्राइव्हर / कामवाली बाई / माळी  /इस्त्री वाला वगैरे लोकांकडून स्वस्तात कामे करून घेऊ शकता ! 

हे सर्व लिहावेसे वाटले कारण मध्यमवर्गीय घरांमध्ये कोटी-दीड कोटी पगाराच्या नोकऱ्या मिळण्याच्या मीडिया मधील बातम्या नको ती स्वप्ने आणि मुलांवर  दडपण निर्माण करतात . म्हणून बाळबोधपणे  प्रत्येक अमेरिकन डॉलर च्या नोकरीच्या पॅकेजला गुणिले ७० करणं सोडलेलंच   बरं  !

हा लेख आवडला तर जरूर सर्वांबरोनर शेअर करा .विशेषतः पालकांसोबत .फक्त नावासकट आणि ब्लॉग च्या लिंक सकट  शेअर करा ही विंनती 

-चिन्मय गवाणकर ,वसई 
ChinmayGavankar@gmail.com 
Saturday, July 8, 2017

Banks Can Not Refuse to Accept Scribbled Currency Notes

महत्वाचे : ५०० आणि २००० च्या ज्या नोटांवर काही लिहिले आहे /रंग गेलेला आहे / नोटा चुरगळलेल्या आहेत त्या नोटा सुदधा चलनात आहेत आणि बँका त्या नोटा नाकारू शकत नाहीत .सध्या बऱ्याच ठिकाणी नोटांवर काही लिहिले असेल तर अश्या नोटा दुकानदार स्वीकारत नाहीत. काही बँका सुध्दा अगदी चुकून नवीन २००० आणि ५०० च्या नोटांवर एखादा शाईचा डाग अथवा पेनाने काही मार्क नोटेवर असेल तर अश्या नोटा घ्यायला नकार देत आहेत .

याबाबत एकूणच गोंधळ दिसतो आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती लिहावीशी वाटली :

१. RBI ने ३१ डिसेम्बर २०१३ रोजी  २०१३-१४/१३११ या क्रमांकाचा एक प्रेस रिलीज देऊन त्यात नागरिक आणि बँक अधिकारी यांना नोटांवर काहीही न लिहिण्याचे आवाहन केले होते . हे RBI च्या "क्लीन नोट पॉलिसी" अंतर्गत होते . नोटांवर काही बाही लिहून त्या खराब होतात आणि त्यामुळे कृपया नोटांवर काही लिहू नका असे सांगण्यात आले होते.परंतु लिहिलेल्या नोटा वैध चलन नाहीत असे कुठेही म्हटले नाहीये .

२.याच "क्लीन नोट पॉलिसी" अंतर्गत २००२ पासून RBI  ने  बँकेच्या कर्मचाऱ्यांना नोटांची बंडले स्टेपल करू नका असे सांगितले होते .

३.परंतु "नोटांवर" लिहू नका असे म्हटले म्हणजे "नोटा घेऊच नका" असा सोयीस्कर अर्थ लावून काही बँकांनी प्रथम अश्या नोटा घेण्यास नकार देण्यास सुरुवात केली .

४. RBI  ने मात्र दिनांक २५ एप्रिल २०१७ रोजी एक विशेष सर्क्युलर काढून नोटांवर काहीही लिहिले असले /नोटांचा रंग गेला असला इत्यादी काहीही असले तरी ५०० आणि २००० च्या नव्या नोटा बँकांनी स्वीकारणे बन्धनकारक आहे असे स्पष्टपणे म्हटले आहे . या सर्क्युलर चा सन्दर्भ क्रमांक आहे ४५३०/०४.०००.००१/२०१६-१७ ज्याची प्रत जोडत आहे .

तरी कृपया या सर्क्युलर चा नम्बर नोट करा आणि कुठल्याही बँकेने /संस्थेने आपल्या नोटा घ्यायला नकार दिला तर आपल्या जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांशी अथवा RBI च्या महाराष्ट्र -गोवा क्षेत्रीय बँकिंग लोकपाला कडे कडे तक्रार करू शकता . त्यांचा सम्पर्काचा पत्ता खालीलप्रमाणे :

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ,भायखळा ऑफिस ,मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन च्या समोर ,भायखळा ,
मुंबई-४०० ००८ ,फोन : ०२२-२३०२२०२८,ईमेल : bomumbai@rbi.org.in

आपल्या जिल्ह्याच्या अग्रणी बँकेचा सम्पर्क क्रमांक आणि पत्ता खालील वेबसाईट वर मिळू शकेल : ( स्टेट : महाराष्ट्र असे टाईप करून सर्च बटन दाबा  )पालघर जिल्ह्यासाठी आपल्या जिल्हा अग्रणी बँकेचे ( बँक ऑफ महाराष्ट्र ) व्यवस्थापक श्री अनिल सावंत साहेब यांच्याकडे ०२५२५-२९७४७४ या क्रमांका वर तक्रार करू शकता . नागरिक/दुकानदार यांनी सुद्धा न घाबरता चुकून काही लिहिलेल्या/डाग असलेल्या नोटा कोणी दिल्याच तर त्या स्वीकाराव्या कारण त्या वैध चलन आहेत .अश्या नोटा तुम्ही बिनधास्त बँकेत भरू शकता .परंतु एकूणच आपल्या देशाच्या चलनाचा मान राखण्यासाठी कृपया नोटांवर काही लिहू नका अशी नम्र विंनती .

कृपया ही माहिती सर्व महाराष्ट्र भर पाठवा आणि नागरिकांना या महत्वाच्या विषयाची माहिती करून द्या .कृपया या ब्लॉगच्या लिंक सकट आणि लेखकाच्या नावाने मेसेज फॉरवर्ड केल्यास उत्तम :-) 

धन्यवाद 
चिन्मय गवाणकर ,वसई 
Chinmay.Gavankar@Gmail.com

Tuesday, June 6, 2017

आय टी चे मृगजळ : काय सत्य काय असत्य !! मराठी पालकांनी करावे तरी काय ?

( प्रस्तुत लेखक स्वतः एका बहुराष्ट्रीय आय टी कम्पनी मध्ये कार्यरत असून ,या क्षेत्राचा १५ वर्षे अनुभव आहे .लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत. काही मुद्दे कठोर भाषेत मांडले आहेत .यात कुठल्याही व्यवसायाचा अथवा व्यावसायिकाचा वैयक्तिक उपमर्द करण्याचा हेतू नाही .आपल्या मुलाला अथवा मुलीला "आय टी " क्षेत्रात पाठवायला बघत असाल तर नक्कीच वाचा आणि आपल्या पाल्याला वाचायला द्या .लेखाचा विषय तांत्रिक असल्याने जिकडे योग्य मराठी प्रमाण प्रतिशब्द मिळाले नाहीत तिकडे मूळ तांत्रिक संज्ञा वापरल्या आहेत )

आय टी  चे मृगजळ : काय सत्य काय असत्य 

सध्या वर्तमानपत्र उघडले की आय टी क्षेत्रात मंदी आहे आणि हजारो लोकांचे रोजगार जाणार अश्या बातम्या दिसतात . अमेरिकेने आणि इतर देशांनी व्हिसा चे नियम कडक केले असल्याने भारतीय आय टी प्रोफेशनल्स च्या बऱ्याच संधी जाणार अशी ओरड सुद्धा दिसते . या दोन्ही मुद्द्यात नक्कीच तथ्य आहे .पण यासाठी सरसकट आय टी कम्पन्यांना किंवा अमेरिकन सरकार ला व्हिलन बनविण्याआधी काही बाबींचा सर्वांगीण परामर्श घेणे गरजेचे आहे .आपल्या आय टी क्षेत्रा बद्दलच्या काही भाबड्या कल्पना आणि समज तपासून पहाण्याची वेळ आलेली आहे . 

१. आय टी मधले भारताचे नक्की योगदान काय ?

" भारतीय संगणक "अभियंते" ( ! ) जगभर भारताचा झेंडा फडकवीत आहेत आणि भारत आय टी क्षेत्रात महासत्ता आहे ," असा एक भाबडा समज आपल्या देशात आहे .रोजगार निर्मिती साठी दुसरे काही ठोस जमत नसल्याने या दिवास्वप्नात जनतेला मग्न ठेवणे हे बेरकी राजकारण्यांच्या सोयीचे सुद्धा आहे . प्रत्यक्षात ९९ % भारतीय आय टी कम्पन्या या केवळ परदेशातील आय टी प्रकल्पांसाठी स्वस्त मनुष्यबळ पुरविण्याचे ठेकेदार आहेत . १९९० च्या दशकात  भारतात जरी फारसे संगणकीकरण झाले नव्हते तरी  परदेशातील संगणकावर अवलंबुन असणाऱ्या हजारो उद्योगांनी Y२K  च्या भीतीने आपली दारे "जो मिळेल तो " या तत्वावर  ( भारता सारख्या स्वस्त मनुष्यबळ देणाऱ्या ,इंग्रजी बऱ्यापैकी माहित असलेल्या  देशांसाठी ) उघडली आणि आपल्याकडे ज्याला ज्याला  कॉम्पुटर चे बेसिक ज्ञान होते त्यांना जराश्या प्रशिक्षणाने परदेशी जायची संधी मिळू लागली . डॉलर मध्ये पगार आणि परदेशी नोकरी याचे टिपिकल मध्यमवर्गीय आकर्षण यामुळे आय टी बद्दल एक प्रकारचे वलय निर्माण झाले आणि जो तो आय टी /कॉम्पुटर "इंजिनियरिंग" मध्ये येण्यासाठी पळू लागला . मुळात या सर्व प्रकारात "इंजिनियरिंग" काहीच नव्हते .आवश्यक होते ते कोडिंग चे ज्ञान .आणि कोडिंग तर कोणीही शिकू शकतो . 

आजही काही सन्माननीय अपवाद बदलता कॉम्पुटर /माहिती तंत्रन्यान क्षेत्रात मूलभूत संशोधन अथवा एखादे नवीनतम ( innovative ) उत्पादन याबाबतीत भारतीय लोकांची आणि कम्पन्यान्ची बोंबच दिसते . केवळ मायक्रोसॉफ्ट,गुगल अश्या कम्पन्याच्या प्रमुखपदी भारतीय मुळाची व्यक्ती (सत्या नाडेला /सुंदर पिचाई )  बसल्याने या वास्तवात तसूभरही फरक पडला नाहीये आणि नजीकच्या काळात पडण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत . याउलट जगातील आज सर्व आघाडीच्या आय टी प्रणाली /उत्पादने ही अमेरिकन (उदा : ऍप्पल /मायक्रोसॉफ्ट / ओरॅकल ई  ) अथवा युरोपियन ( उदा : एस ए  पी ) कम्पन्यांनी बनवलेली दिसतात आणि या कम्पन्याची उत्पादने /प्रणाली स्वस्तात "बसवून" द्यायचे काम आमचे आय टी "कामगार" करतात . म्हणजे हा "लेबर जॉब" झाला .आणि इतिहास साक्षी आहे की असे लेबर /कामगार जॉब्स स्वस्ताई कडून अधिक स्वस्ताई कडे आणि मग यांत्रिकीकरणा ( ऑटोमेशन ) कडे जातात .भारताच्या ३००० अभियांत्रिकी विद्यालयांमधून सुमारे १५ लाख इंजिनियर्स बाहेर पडतात दर वर्षी आणि यातील ३० % मुलांना जेमतेम आज नोकरी (मग ती इंजिनीयरची असेलच असे नाही ) मिळते . याचे कारण हेच ! 
पूर्वी लहानपणी एक गमतीचे कोडे ऐकले  होते....राजा का आजारी पडला ? घोडा का बसला ? आणि भाकरी का करपली ? या सगळ्याचे उत्तर होते एकच : " न फिरल्याने /फिरविल्याने " ..तसेच ..इंजिनियर बेकार का झाले ? अभियांत्रिकी महाविद्यालये गोत्यात का आली ? आणि भारतीय आय टी चा फुगा का फुटला ? या सर्व पप्रश्नांचे उत्तर सुद्धा एकच "नवीन शिकण्याची क्षमता आणि कौशल्य आत्मसात न केल्याने " !

२.मग आज नक्की झालेय काय ? 

भारतीय संगणक प्रशिक्षित मनुष्यबळ स्वस्त असल्याने गेली दोन दशके आपले आय टी  "कामगार" परदेशी लोकांना स्थानिकांपेक्षा सहज "परवडायचे  " .आपल्याकडे मुंबई ला जसे बिहार आणि यु पी मधले मजूर बांधकाम क्षेत्रात परवडतात तसे . पण हा काळ आपल्या देशाने फक्त "आय टी महासत्ता" म्हणून खोटी कौतुके करून घेण्यात फुकट घालवला.मागणी तसा पुरवठा म्हणून भारंभार इंजिनियरिंग कॉलेजेस निघाली आणि लाखो "अभियंते" ( ! ) या फॅक्ट्रीज मधून बाहेर पडू लागले .जो पर्यंत आय टी प्रोजेक्ट्स सुरु होते आणि मनुष्यबळ गरजेचे होते तो पर्यंत हा फुगा फुटला नाही .पण गेली ५ वर्षे हा या क्षेत्राचा संक्रमणाचा काळ ठरला . 

पहिला फटका :  तंत्रज्ञान बदलले . 

मशीन लर्निंग , इंटरनेट ऑफ थिंग्स ,आभासी बुद्धिमत्ता ( Artificial  Intelligence ) ,बिग डेटा ऍनालीटीक्स चे "सेल्फ सर्व्हिस" प्लॅटफॉर्मस आणि क्लाउड कॉम्पुटिंग इत्यादी नवीन गोष्टींनी तंत्रज्ञानाचे विश्व बदलून टाकले .आभासी बुद्धिमत्ता ,मशीन लर्निंग आणि रोबोटिक्स ने आय टी मधले लो लेव्हल /रिपीटेटिव्ह म्हणजे टेस्टिंग /डिबगिंग /सिम्पल  प्रोग्रामिंग / सिम्पल कोड चेंजेस असे रोजगार सम्पवले.बिग डेटा आणि ऍनालीटीक्स चे प्लॅटफॉर्म्स आता अधिकाधिक सोपे होत असल्याने बिझनेस युजर्स स्वतः सेल्फ सर्व्हिस करून वापरू शकतात आणि त्याने "अनॅलिस्ट " चे जॉब्स कमी केले .म्हणजे पहिले एक्ससेल शीट्स च्या डोंगराखाली जे काम १० लोकांची टीम एक आठवडा करायची आणि बिझनेस लीडर्स ना समजेल असे रिपोर्ट्स आणि चार्ट्स तयार करून द्यायची ,तेच काम आता स्वतः बिझनेस युजर्स स्वतः च्या आय पॅड वर ५ मिनिट्स मध्ये करू शकतात . म्हणजे जरी बिग डेटा ऍनालीटीक्स ,डेटा सायन्स हे आजही जरी "हॉट " करियर ऑप्शन्स असले तरी त्या क्षेत्रात सुद्धा लो लेव्हल अथवा एंट्री लेव्हल नोकऱ्या कमी झाल्या आहेत .
पूर्वी अजून एक क्षेत्र आय टी  मध्ये भरपूर नोकऱ्या द्यायचे ,ते म्हणजे "हार्डवेअर ,नेटवर्क आणि सिस्टिम्स म्यानेजमेंट " .म्हणजे ज्यांना सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी मिळायची नाही त्यांना किमान हार्डवेअर म्यानेजमेंट अथवा नेटवर्क /  डेटा सेंटर म्यानेजमेंट अश्या नोकऱ्या मिळायच्या.आता क्लाउड कॉम्पुटिंग मुळे ते रोजगार सुद्धा कमी होत आहेत.कारण हल्ली प्रत्येक छोट्या मोठ्या कम्पनी ला स्वतः चे हार्डवेअर घेऊन आपल्या डेटा सेंटर मध्ये चालविण्यापेक्षा बहुराष्ट्रीय कम्पन्यांनी जगभर सुरु केलेल्या क्लाउड डेटा सेंटर्स मध्ये आपली सॉफ्टवेअर्स चालविणे सोपे आणि किफायती झाले आहे .त्यामुळे या मॉडेल मध्ये हे सर्व हार्डवेअर आणि सिस्टीम म्यानेजमेंट चे जॉब्स ऍमेझॉन ,गुगल,आय बी एम ,मायक्रोसॉफ्ट अश्या तगड्या क्लाउड कम्पन्यांकडे शिफ्ट झाले आहेत.आणि तिकडेही ऑटोमेशन झाल्याने अक्खे १०००० सर्व्हर्स चे डेटा सेंटर फक्त  ३-४ माणसे आरामात चालवू शकतात .एका डेटा सेंटर मध्ये किमान १००० ते कमाल ५००० कम्पन्या आपले वर्कलोड चालवू शकतात .त्यामुळे हेच सर्व्हर्स जर प्रत्येक ग्राहकाने ( कम्पनीनें) आपलं स्वतः विकत घेतले असते आणि चालवले असते  ,तर किमान १००० ते कमाल १००००  लोकांना विकेंद्रित रोजगार मिळाला असता . म्हणजे किती रोजगार नवीन तंत्रज्ञानानाने खाऊन टाकले हे भयावह आहे . आपल्या देशातून हजारो इंजिनियर्स फ्रेशर्स म्हणून कम्पनी जॉईन करायचे तेव्हा त्यांना अपेक्षित ट्रेनिंग द्यायला वेळ आणि पैसे लागत असल्याने ,वाट पहाण्यापेक्षा ,त्यांना कम्पन्या अश्या लो लेव्हल कामास जुंपायच्या आणि त्यावरही बॉडी शॉपिंग करून बक्कळ पैसे कमवायच्या .म्हणजे आपला बंडू आणि बबडी जायची अमेरिकेला "इंजिनियर" म्हणून पण करायची दिवसभर सॉफ्टवेअर  टेस्टिंग चे काम जे आता रोबो आणि आभासी बुद्धिमत्ता असलेली मशिन्स करू शकतात . मूलभूत संशोधन आणि इनोव्हेशन न झाल्याने भारतीय आय टी कम्पन्या आता डायनोसॉर झाल्या आहेत . आणि त्याहून कालबाहय झाली आहेत ती आपली अभियांत्रिकी महाविद्यालये आणि त्यांचे जुनाट  अभ्यासक्रम ! आज मुलांना आय टी मध्ये डिग्री घेऊन सुद्धा आहेत त्या नोकऱ्या सुद्धा मिळत नाहीत कारण त्यांनी ४ वर्षे शिकलेले ज्ञान टाकाऊ झालेले असते . जग आज रुबी /पायथन /डॉकर  कंटेनर्स / नोड जे एस /मोंगो डीबी /कलाऊडन्ट/बिग क्वेरी /अपाचे हाडुप /स्पार्क आणि API  लायब्ररी इत्यादी कन्सेप्ट्स वापरून प्रोग्रामिंग करत असताना आपल्या अभ्यासक्रमात अजूनही शिकविले काय जाते ? तर जावा आणि C ++ ! मी व्यवसायाचा भाग म्हणून काही इंजिनियरिंग महाविद्यालयात मार्गदर्शन करण्यासाठी जातो तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोलतो ,आणि ज्या पातळीवर तिकडे जे काही चालते आणि आज इंडस्ट्री ला काय हवे आहे यात जमीन अस्मानाचा फरक आहे .अर्थात काही कॉलेजेस मध्ये अपवादाने एखाद्या प्राध्यापकाच्या स्वतः च्या पुढाकारातून चांगले काही नवीन कोर्सेस सुरु झालेले आहेतही .पण ९० % कॉलेजेस अजूनही मागे आहेत . 
दुसरा फटका : ग्लोबलायझेशन चा फुगा फुटला :

विसाव्या शतकाच्या अखेरीस असे म्हटले जाऊ लागले की इंटरनेट ,  आय टी आणि आऊटसोर्सिंग च्या व्यापक प्रसारामुळे जग जवळ आले आहे आणि यापुढे जग अधिकाधिक "ग्लोबल" बाजारपेठ होईल .थॉमस फ्रीडमन सारख्या प्रख्यात लेखकाने "वर्ल्ड इज फ्लॅट " सारखे बेस्टसेलर पुस्तक याच काळात लिहिले . पण आज परिस्थिती पहाता ,जागतिक पातळीवर उजव्या विचारसरणी च्या राजवटी अधिकाधिक सत्तेवर येऊ लागल्या आहेत .त्यामुळे बाहेरच्या लोकांना नोकऱ्या देणे म्हणजे अश्या राजवटी ज्या स्वप्नाळू राष्ट्रवाद आणि देशभक्ती च्या आभासी डोलाऱ्यावर उभ्या असतात त्यांना आवाहन देणे असे वाटू लागले आहे .आज जगभर विशेतः पाश्चात्य राष्ट्रात "बाहेरच्या" लोकांबद्दल तिरस्कार वाढतो आहे आणि "हे भारतीय आणि चिनी आले कमी पगारावर काम करायला आणि आपल्या पोटावर पाय द्यायला " अशी भावना वाढीस लागली आहे .अगदी महाराष्ट्रामध्ये काही राजकीय पक्ष उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य कष्टकरी जनते विरुद्ध जसा विखार पसरवतात तसेच हे . त्यामुळे आज परदेशी कम्पन्यांवर त्यांनी  आपले आय टी प्रोजेक्ट्स भारतीय आय टी कम्पन्यांना देऊ नये असा दबाव वाढतो आहे .परदेशी व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वर्क व्हिसा चे नियम सुद्धा कडक झाल्याने  नाईलाजाने भारतीय आय टी कम्पन्यांना त्या त्या देशातील स्थानिक नागरिकांना नोकऱ्या द्याव्या लागत आहेत आणि त्यामुळे आपल्या भारतीय "फॅक्टरी " मधून बी.ई .झालेल्या " इंजिनियर "कामगारांना कॅम्पस प्लेसमेंट सुद्धा मिळणे मुश्किल झाले आहे .


३.मग आता करायचे काय ?

कुठलेही क्षेत्र हे प्रवाही असते आणि त्या त्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांचे आकलन आणि अंगीकार करणे हे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गरजेचे असते . आंधळेपणाने पालकांनी आपल्या मुलांना सरसकट कॉम्प्युटर आणि आय टी इंजिनियर बनवायच्या फॅक्टरी मध्ये टाकले तर भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त ! आय टी क्षेत्र बुडालेले नाही पण त्यात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराचे प्रकार आणि त्याला लागणारी कौशल्य आणि लागणारी माणसांची संख्या या गोष्टी बदलल्या आहेत . तसेच केवळ परदेशी जाण्याचे तिकीट म्हणून आय टी कडे पाहू नये .आज जगात भारत ही सर्वात वेगाने वाढणारी दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे . आपल्या देशाला प्रगती मध्ये अजून खूप पल्ला गाठायचा आहे .त्यामुळे शेती ,लघु आणि मध्यम उद्योग ,पायाभूत क्षेत्र ,डिजिटल इंडिया आणि अश्या अनेक गोष्टींसाठी संगणकीकरण आणि आय टी सोल्युशन्स ची गरज लागणारच आहे . पण पूर्वीसारखे ऑन साईट मिळणारा  "इझी डॉलर मनी " आणि इकडे देशात त्याच वेळी दणक्यात मिळणारा भारतीय रुपयामधला पगार या गोष्टी आता असणार नाहीत . थातुर मातुर खाजगी इंजिनियरिंग कॉलेज मधून पाट्या टाकून इंजिनियर झालेल्या मुलांना नोकरी लागणे सोडाच पण साधे कोणी इंटरव्हू ला सुद्धा बोलावणार नाही . 

एकोणिसाव्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांती ने जुने रोजगार सम्पवले पण नवीन रोजगार सुद्धा निर्माण केले ! फक्त ज्यांनी त्याच्याशी जुळवून घेतले ते तगले .विसाव्या शतकाच्या मध्यात सुरु झालेल्या संगणकीकरणा मुळे आपले आयुष्य आमूलाग्र बदलले आणि परत काही जुने रोजगार सम्पवले पण नवीन रोजगार निर्माण सुद्धा केले .आय टी सोल्युशन्स मुळे कुठल्याही उद्योगाची  उत्पादकता आणि गुणात्मकता वाढते . म्हणजे बँकांचे संगणकीकरण झाल्याने काही लोकांच्या नोकऱ्या नक्की कमी झाल्या पण त्याच वेळी कोअर बँकिंग च्या नेटवर्क मुळे बँकाच्या शाखा सुद्धा अधिक सुरु करता आल्या आणि त्यामुळे त्या क्षेत्रात त्या प्रमाणात अधिक रोजगार निर्माण झाले . देशातील १९९१ च्या आर्थिक उदारीकरणांनंतर  तर वर नमूद केल्याप्रमाणे आपल्या देशातील एक अक्खी पिढी आय टी क्षेत्रात घुसली ! म्हणजे कालानुरूप रोजगार नष्ट होतात आणि नवीन क्षेत्र उदयास येते . 

शेवटचा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे आय टी क्षेत्र तेव्हाच वाढू शकेल जेव्हा इतर उद्योग आणि व्यवसायांची वाढ होईल ! म्हणजे जास्त बँका वाढल्या तर त्याला लागणाऱ्या संगणक प्रणाली वाढतील,पायाभूत क्षेत्र वाढले तर स्मार्ट सिटीज साठी आय टी लागेलच  ,जास्त विमानकम्पन्या सुरु झाल्या तर एअरपोर्ट आणि एअरलाईन क्षेत्रात आय टी ची जास्त गरज लागेल ,जास्त उत्पादन उद्योग सुरु झाले तर ERP सारख्या सॉफ्टवेअर्स ना मागणी वाढेल ,जास्त मीडिया कम्पनीज सुरु झाल्या तर त्यांना लागणारे VFX /Animation इत्यादी रोजगार निर्माण होतील ...वगैरे वगैरे...त्यामुळे या सर्व क्षेत्राला सुद्धा वाढण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हवे आहे ! मग आपल्या मुलाला अथवा मुलीला इंजिनियरिंग करायचेच असेल तर मेकॅनिकल /सिव्हिल/इलेक्ट्रिकल असे मूलभूत इंजिनियरिंग का करू नये ? बँकिंग/मीडिया मध्ये का त्याने करियर करू नये ? आय टी च करायचे तर चाकोरीबद्ध बी ई च्या डिग्री च्या मागे लागण्यापेक्षा  बेसिक ग्रॅज्युएशन करता करता साईड बाय साईड डेटा सायन्स /क्लाउड/मशीन लर्निंग अश्या नवीन क्षेत्रात स्पेशलाइज्ड कोर्सेस का करू नयेत ?सरकार मध्ये सुद्धा डिजिटल इंडिया मोहीम सुरु आहे मग आपल्या बबडी ने आय ए एस होऊन आय टी चा विधायक वापर करून सरकारी योजनांचे संगणकीकरण करवून घेण्याचे स्वप्न का पाहू नये ?

आणि नोकरीच का ..स्वतः चा स्टार्ट अप सुरु करण्याचे प्रयत्न सुद्धा करू नयेत ?
एव्हढे सगळे करियर ऑप्शन्स उपलब्ध असताना केवळ आय टी मध्ये नोकरी करून अमेरिकेला जाण्याचे टिपिकल मराठी मध्यमवर्गीय स्वप्न आपण का पहातोय ? मुलांना काय आवडते आणि त्यांना कशात गती आहे याचा विचार आपण कधी करणार ?

वाचा आणि विचार करा ! पटल्यास सर्व मराठी पालकांना हा लेख पाठवा .

धन्यवाद 

चिन्मय गवाणकर ,वसई 
ChinmayGavankar@gmail.com 

Thursday, May 11, 2017

वसई विजयोत्सव : प्रत्येक भारतीयाला गौरवास्पद !

२७९ वा वसई विजयोत्सव साजरा होताना बराच गदारोळ उडताना दिसतोय. दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि हे समाज माध्यमांवरील वाद वसई मधल्या धार्मिक शांततेला धोका पोहिचवतील  की  काय इथपर्यंत पोहोचले आहेत.त्यामुळे काही मुद्दे मांडण्याचा हा विनम्र प्रयत्न .

१. विजयोत्सवावर खर्च केला जावा का ? 

या विजयोत्सवाला आधी पासून विरोधक विरोध करतायत आणि मी माझ्या एका फेसबुक पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे लोकशाही मध्ये जनतेच्या करांमधून होणाऱ्या सार्वजनिक खर्चावर बारीक नजर ठेवणे हा विरोधकांचा हक्क आहेच .त्यामुळे वसई मध्ये पाणी,रस्ते,आरोग्य सुविधा इत्यादी वाढविण्याची गरज असताना विजयोत्सवावर इतका खर्च करावा का,हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकतो आणि लोकशाही परंपरेप्रमाणे पालिका सभागृहात तसेच विविध व्यासपीठांवर समूह चर्चा करून तो प्रश्न धसास लावता येऊ शकतो .त्यासाठी हिंदू-ख्रिस्ती वाद निर्माण करून सामाजिक शांततेचा भंग करण्याचे कुटील राजकारण करण्याची गरज नाही . 

पण शेवटी हा आपल्या देशाच्या अभिमानाचा प्रश्न असल्याने ,पुढील येणाऱ्या पिढ्यांना या गौरवपूर्ण इतिहासाचा विसर पडू नये म्हणून विजयोत्सव झालाच पाहिजे .तिकडे काय कार्यक्रम करावेत / व्यावसायिक नाटके करावीत का ? / बाल जत्रा भरवावी का की केवळ चिमाजी अप्पांच्या प्रतिमेचे पूजन करून भावपूर्ण वातावरणांत शहीद वीरांना नमन करावे / ऐतिहासिक प्रदर्शने भरवावीत का इत्यादी इत्यादी निर्णय लोकशाही प्रक्रियेने घ्यावे आणि आज तरी महापालिकेचा हा अधिकृत कार्यक्रम असल्याने आणि पालिकेचे नगरसेवक रीतसर निवडणुकीने नागरिकांतून निवडून आल्याने ,लोकशाही प्रक्रिया पार पाडूनच हा उत्सव साजरा केला जातो हे सुद्धा तितकेच खरे .  ति

प्रत्येक गोष्टीत "आपला  देश गरीब आहे ,उत्सवावर खर्च करू  नका " असे  म्हटले तर मग १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी चे शासकीय संचलन सुद्धा बंद करावे लागेल .आणि आजू बाजूला समाजात गरजू बांधव  उपाशी पोटी झोपत असताना आपण सर्वांनी मिळून आय पी एल आणि बाहुबली -२ वर खर्च केलेल्या हजारो करोड रुपयांचा सुद्धा नैतिक हिशेब आपल्याला स्वतः च्या सद सद विवेक बुद्धीला द्यावा लागेल . या वर पिसाळून "माझा कष्टाने मिळविलेला पैसा मी कसाही खर्च करीन.. अनाथाश्रमाला देणगी देईन नाहीतर बाहुबली बघायला ५०० रुपयाचे मल्टिप्लेक्स चे तिकीट काढीन  " असा वाद घालणाऱ्यांनी मग हे सुद्धा ऐकायची तयारी ठेवा की कर रूपाने गोळा झालेला पैसा खर्च करण्याचे सर्व अधिकार त्याच न्यायाने लोकनियुक्त  सरकार ला सुद्धा असतात . आणि हो,तुम्ही सरकार ला सनदशीर मार्गाने नक्कीच जाब विचारू शकता ! 

२. वसई च्या लढ्याचे महत्व काय : परंतु ,"विजयोत्सव पूर्णपणे बंद करा " ही काही संस्थांकडून होणारी मागणी मात्र हास्यास्पद आहे . वसई विजयाचे महत्व इतिहासात काय आहे हे  जरा पाहूया .श्रेयस जोशी  बरोबर  त्या दिवशी बोलताना मी हा मुद्दा मांडला होता आणि त्याने त्याच्या पोस्ट मध्ये सुद्धा हा मुद्धा टाकला आहे .तरीही ज्यांनी श्रेयस ची पोस्ट वाचली नाही त्यांच्यासाठी मी जरा हा मुद्दा परत मांडतो . 

आधुनिक इतिहासात " पाश्चात्य सैन्यावर आशियाई सत्तेने मिळविलेला पहिला विजय " म्हणून १९०४-५ च्या जपान -रशिया युद्धाचे दाखले दिले जातात . जपान ने १९०५ मध्ये रशिया ला हरविल्यामुळे आशियाई राष्ट्रांमध्ये नव चैतन्य पसरले आणि काही इतिहास कारांच्या मते तर  पाश्चात्य वसाहती राज्यकर्त्यांविरुद्ध भारतासारख्या विविध आशियाई देशांमध्ये सुरु असलेल्या स्वातंत्र्य लढ्याला सुद्धा नवीन चैतन्य मिळाले . त्याआधी आशियाई सत्ता युरिपियनांना हरवू शकतात याचा कोणी विचार देखील केला नव्हता . पण वसई चा लढा १७३९ साली लढला गेला ..जपान च्या विजयाच्या किमान दीडशे वर्ष आधी आणि त्यामुळे नजीकच्या  लिखित इतिहासामधील आशियाई ( मराठी ) सत्तेने युरोपियन ( पोर्तुगीज ) सत्ते विरुद्ध मिळविलेला तो पहिला विजय ठरतो .  अतिशय प्रतिकूल परिस्थिती मध्ये २ वर्ष चिवटपणे झुंझ देऊन मिळालेला हा विजय आहे . 

 ३. मराठे पोर्तुगीजांना घाबरत होते ? /पोर्तुगीजांनी स्वतः हुन सत्ता ताब्यात दिली ? ( काही कुचकट लोकांकडून चालवली जाणारी छुपी कुजबुज मोहीम ) 


१७३९ ला वसई मधून जावे लागल्यानन्तर भारतातील पोर्तुगीज सत्तेने कधीही मराठी साम्राज्याशी वाकडे घेतले नाही . वसई साठी २४ महिने चिवट लढा देऊन,२२००० मराठी वीरांच्या प्राणांची आहुती देऊन सुद्धा सूडबुद्धीने न वागता ,वसई मधून पोर्तुगीजांना सन्मानाने त्यांच्या चीज वस्तूंसह गोव्याला जाऊ दिले यात  मराठ्यांचा मनाचा मोठेपणा दिसतो. वसई मधील काही इतिहासकार कुत्सितपणे आणि आपल्या  दुर्दैवाने हा मराठ्यांचा कमकुवतपणा समजतात .वसई मधलेच काही अर्धवट अकलेचे लोक तर खाजगीत बोलताना असेही म्हणतात की चिमाजी अप्पांना २ वर्षे प्रयत्न करून सुद्धा  किल्ला जिंकता आला नाही ,शेवटी छुपा समझोता करून पोर्तुगीजांना सगळी दौलत घेऊन जाऊ दिले .पण तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता मराठी सत्ता प्रबळ होती आणि हा काळ पहिले बाजीराव पेशवे यांच्या ऐन बहराचा होता . अगदी इतिहासाचा अभ्यास नसेल तरी मागच्या वर्षी आलेला "बाजीराव मस्तानी" सिनेमा जरी पहिला असाल तर हा काळ डोळ्यासमोर उभा राहील .मराठी सत्ता विविध प्रांत पादाक्रांत करीत होती .त्यामुळे गोवा,दीव दमण च्या उरलेल्या पोर्तुगीजांना घाबरण्याचे आणि म्हणून नमते घेण्याचे मराठ्यांना काहीच कारण नव्हते . मराठी सत्तेला उतरती कळा  पानिपत च्या पराभवांनंतर ( जो किमान २०  वर्षे दूर होता ) नन्तर लागली आणि त्यामुळे " चिमाजी अप्पा पोर्तुगीजांना घाबरले आणि म्हणून त्यांनी मुकाट तह करून पोर्तुगीजांना बँड च्या तालात वाजत गाजत जाण्याची परवानगी दिली " असल्या कुचाळक्या करणारे खरे वसईकर  काय तर भारतीयच नव्हेत .त्यामुळे अशा स्वयंघोषित "इतिहासकारांकडून " सावध राहावे .
पोर्तुगीज सरकार च्या तत्कालीन नोंदीत १७३७ ते १७३९ च्या धामधुमीत मराठ्यांच्या झन्झावाता मुळे उत्तर कोकण (सध्याचा मुंबई,ठाणे आणि पालघर जिल्हा ) मधील  वसई ही राजधानी ,२ मोठे किल्ले २० छोटे किल्ले,४ मुख्य बंदरे ,८ शहरे आणि ३४० गावे गमवावी लागली असा उल्लेख आहे . जर चिमाजी अप्पांचे "सेटिंग " ( आमच्या वसई च्या खास स्थानिक भाषेत ) असते तर त्यांना अक्खा उत्तर कोकण आंदण देण्याने पोर्तुगिजांचा काय बरं फायदा झाला ? उलट वसई ही पोर्तुगीजांची त्या वेळची सर्वात श्रीमंत वसाहत होती . वसई गमवावी लागल्याने पोर्तुगीज साम्राज्याची खूप मोठी हानी झाली .वसई चक्क पोर्तुगीज पोस्टल स्टॅम्प वर सुद्धा झळकली आहे .४. वसई चा विजय हा  केवळ " हिंदूंचा " विजय आहे ?

पोर्तुगीज हे धर्मवेडे होते हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही . त्यांनी आणि स्पॅनिश लोकांनी जगभर आपला धर्म पसरावा म्हणून व्यापाराच्या आडून जो धर्मांतराचा उच्छाद घातला त्यास तुलना नाही . पोर्तुगीज इतके कट्टर होते की इन्क्वीसिशन्स चा काळा कुट्ट इतिहास त्यांनी लिहिला . ब्रिटिश,डच आणि फ्रेंच आदी इतर वसाहती सत्ता पैशाच्या मागे होत्या आणि एका मर्यादे पलीकडे त्यांनी स्थानिक धर्मात फार ढवळाढवळ केली नाही .ब्रिटिशांनी " फोडा आणि राज्य करा" नीती अंतर्गत इकडे जातीय आणि धार्मिक भांडणे जरूर लावून दिली,पण " स्टेट स्पॉन्सर्ड कन्व्हर्शन्स " म्हणजे सरकारच्या पाठिंब्याने होणारी सामूहिक धर्मांतरे केल्याचे फारसे दाखले नाहीत . पोर्तुगीजांनी वसई मध्ये बळजबरीने किती धर्मांतरे केली आणि आप खुशीने किती वंचीत  समाजघटकांनी हिंदू धर्माला,जाती व्यवस्थेला आणि सामाजिक  विषमतेला  कंटाळून कॅथलिक धर्म स्वीकारला या विषयावर आजही बरेच मतभेद आहेत .त्याकाळची मूळ विश्वास ठेवावी अशी कागदपत्रे भारतात तरी फारशी उपलब्ध नाहीत .पोर्तुगीज रेकॉर्ड्स मध्ये लिस्बन ला असतील तर माहित नाही . पण समकालीन गोव्यात काय घडत होते याची विपुल माहिती उपलब्ध आहे .आणि गोव्यामध्ये जो छळ हिंदूंचा झाला ,तो पाहता वसई मधले पोर्तुगीज फार उदारमतवादी असतील असा भाबडा विश्वास ठेवायला मी तरी तयार नाही . त्यामुळे  " पोर्तुगीज खूप चांगले होते आणि त्यांनी कोणावर बळजबरी केली नाही " असे बोलणारे तथाकथित विचारवन्त ठार वेडे तरी असावेत अथवा महामूर्ख तरी . 

पेशव्यांनी वसई मुक्ती साठी सैन्य पाठविण्यामागे इकडच्या हिंदूंचे रक्षण करावे हा हेतू होताच पण गुजरात पासून मुंबई पर्यंत पसरलेल्या विशाल किनारपट्टी वर आणि समुद्र व्यापारावर नियंत्रण आणणे हा सामरिक आणि स्ट्रॅटेजिक हेतू सुद्धा होता . युद्ध जिंकल्यावर जे  हिंदू नाहीत अथवा ज्यांनी धर्मांतर केले आहे त्यांना सुद्धा सन्मानाने वागविणारे उदार मन मराठ्यांकडे होते . वसई मधील नवीन ख्रिस्ती झालेली तत्कालीन कुटुंबे यांना पोर्तुगीज कुटुंबांपुढे दुय्य्म दर्जा होता आणि पोर्तुगीज वसई ची उघडपणे लूट करून युरोपचे खजिने भरीत होते त्यामुळे इकडील हिंदू आणि ख्रिस्ती अशा  सर्व समाजात पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटी विरुद्ध संताप होताच . त्यामुळे मराठी सैन्याच्या विजयाचे स्वागत आणि विजयोत्सव सर्व समाजाने एकत्र मिळून साजरा केला हा इतिहास आहे 

आजही वसई ची संस्कृती बघाल तर वसई मधला हिंदू माणूस आणि ख्रिस्ती माणूस यामधला फरक एक धार्मिक निष्ठा सॊडल्या तर काहीच नाही . वसई मधील सर्व नागरिक प्रथम भारतीय,मग महाराष्ट्रीयन ,मग वसईकर आणि शेवटी हिंदू किव्वा ख्रिस्ती असतात .वसई च्या ख्रिस्ती शिक्षिका साडी नेसून,मुंबई च्या मराठी माध्यमातील शाळांमध्ये जेव्हा शुद्ध मराठी शिकवतात तेव्हा नवीन माणसाला त्यांचे ख्रिस्ती नाव ऐकून चकित व्हायला होते . यात वसई मधल्या बंधू भावाचे आणि शांततेचे मूळ लपले आहे . त्यामुळे मराठे -पोर्तुगीज लढा हा "हिंदूं विरुद्ध ख्रिस्ती" अश्या संकोचलेल्या दृष्टिकोनातून बघणाऱ्या लोकांचे उद्दिष्ट्य केवळ समाजात अशांतता निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेणे हाच आहे . 

५.पोर्तुगीज " आधुनिक " शासक होते आणि मराठ्यांनी त्यांना हाकलून दिल्याने वसई चे नुकसान झाले ?

हा तर मी ऐकलेला सर्वात हास्यास्पद युक्तिवाद. .पोर्तुगीज सत्ता अतिशय क्रूर होती आणि त्यांनी देशांचे शोषण करून युरोपियन खजिने भरले .मान्य की त्यांच्या आधी आलेले मुघल शासक सुद्धा परकीय होते. पण मुघलांनी इकडेच साम्राज्य स्थापन करून भारताला आपला देश मानले .कुणाला मुसलमानी राजवट आवडो न आवडो पण ती "स्थानिक" राजवट म्हणून राहिली .भारतीय कला ,संस्कृती, समाज जीवन इ वर मुघलांनी खूप भर घातली .पोर्तुगीजांनी वसाहती लुटून लिसबन ला पैसे नेले .पोर्तुगीजांनी म्हणे वसई च्या किल्यांत " सुसज्ज " हॉस्पिटल काढले होते !!! ज्यांना फार प्रेम वाटते पोर्तुगीज लोकांचे त्यांनी १९६० पूर्वी गोव्यात राहणाऱ्या लोकांना विचारावे काय दिवे लावले पोर्तुगीजांनी तिकडे .ब्रिटिशांनी पण भारताचे शोषण केले पण निदान काहीतरी सोयी सुवीधा आणल्या इकडे .पोर्तुगीज गोव्यात अगदी १९६० पर्यंत धड रस्ते,वीज,रेल्वे काहीच नव्हते .एकही उद्योग त्यांनी उभा केला नाही .लुटारू राजवट होती ती . १९६० पर्यंत ज्या पोर्तुगीजांना गोव्यात धड वैद्यकीय सुविधा देता आल्या नाहीत ते सतराव्या शतकात वसई मध्ये कसले डोम्बल "सुसज्ज" वगैरे हॉस्पिटल उभारणार ! विश्रामगृह /सॅनिटोरियम एव्हढीच लायकी असणार त्या "हॉस्पिटल" ची . पोर्तुगीजांनी वसई च्या अर्थ व्यवस्थेला काहीच दिले नाही .त्यांनी फक्त वसई च्या बंदराचा वापर करून जगभर व्यापार केला आणि इकडच्या पोर्तुगीज व्यापाऱ्यांना मालामाल केले . वसई ची सामान्य जनता अगदी आता आता  १९६०-७० पर्यंत  केवळ शेती बागायती वर जगत होती .काय मोठे दिवे लावले वसई चा "विकास" करायला पोर्तुगीजांनी ? काही नवीन शिकवले इकडच्या जनतेला ? काही नवीन पायाभूत सुविधा निर्माण केल्या ? बोट बांधण्याचे तंत्र उत्तम जमायचे त्यांना .स्थानिकांना ते तरी शिकवले का त्यांनी ?

वसई चे पोर्तुगीज गेल्याने काहीही नुकसान झाले नाही . प्रत्येक शहराचा एक वैभवाचा काळ असतो. पोर्तुगीज येण्याआधी कित्येक शतके वसई च्या सोपारा बंदरातून भारताचा मध्य पूर्व,आफ्रिका आणि युरोप शी व्यापार सुरु होता . पोर्तुगीज येण्याच्या आधी पासून भारत हा असा देश होता की जो जागतिक GDP मध्ये २५ % वाटा उचलायचा ! अश्या सुंदर भारत भूमीला लुटायला आलेली दरोडेखोरांची टोळी केवळ हे  पोर्तुगीज म्हणजे . केवळ नौकानयन ,जहाज बांधणी शास्त्र प्रगत होते त्यांचे  आणि जगभर फिरण्याची धडाडी ! विज्ञान /तंत्रद्यान /अभिजात कला वगैरे साठी पोर्तुगाल कधीच प्रसिद्ध नव्हता .आजही पोर्तुगाल हा देश एक आळशी आणि खालावलेल्या अर्थव्यवस्थेचा देश म्हणून ओळखला जातो. युरोपात एकोणिसाव्या शतकात इंग्लड आणि मध्य युरोप मध्ये औद्योगिक क्रांती होत असताना पोर्तुगाल मात्र सुशेगाद होता .केवळ आपल्या जगभर च्या वसाहती लुटायच्या आणि नागरिकांचा धर्मवेडाने क्रूर छळ करायचा या पलीकडे त्यांना अक्कल नव्हती . त्यामुळे १७३९ मधल्या वसईच्या  पोर्तुगीजांना "आधुनिक राजवट " म्हणणाऱ्यांनी आपले डोके तपासून घ्यावे हे उत्तम .


त्यामुळे केवळ वसई नव्हे तर प्रत्येक भारतीयाने हा विजय साजरा केलाच पाहिजे . कसा करायचा ,किती पैसे खर्च करायचे याची चर्चा जरूर करा .पण कृपया यास हिंदू-ख्रिस्ती वादाचे स्वरूप देऊन वसई मधील शांतता बिघडवू नका .