( प्रस्तुत लेखक स्वतः एका बहुराष्ट्रीय आय टी कम्पनी मध्ये कार्यरत असून ,या क्षेत्राचा १५ वर्षे अनुभव आहे .लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत. काही मुद्दे कठोर भाषेत मांडले आहेत .यात कुठल्याही व्यवसायाचा अथवा व्यावसायिकाचा वैयक्तिक उपमर्द करण्याचा हेतू नाही .आपल्या मुलाला अथवा मुलीला "आय टी " क्षेत्रात पाठवायला बघत असाल तर नक्कीच वाचा आणि आपल्या पाल्याला वाचायला द्या .लेखाचा विषय तांत्रिक असल्याने जिकडे योग्य मराठी प्रमाण प्रतिशब्द मिळाले नाहीत तिकडे मूळ तांत्रिक संज्ञा वापरल्या आहेत )
आय टी चे मृगजळ : काय सत्य काय असत्य
सध्या वर्तमानपत्र उघडले की आय टी क्षेत्रात मंदी आहे आणि हजारो लोकांचे रोजगार जाणार अश्या बातम्या दिसतात . अमेरिकेने आणि इतर देशांनी व्हिसा चे नियम कडक केले असल्याने भारतीय आय टी प्रोफेशनल्स च्या बऱ्याच संधी जाणार अशी ओरड सुद्धा दिसते . या दोन्ही मुद्द्यात नक्कीच तथ्य आहे .पण यासाठी सरसकट आय टी कम्पन्यांना किंवा अमेरिकन सरकार ला व्हिलन बनविण्याआधी काही बाबींचा सर्वांगीण परामर्श घेणे गरजेचे आहे .आपल्या आय टी क्षेत्रा बद्दलच्या काही भाबड्या कल्पना आणि समज तपासून पहाण्याची वेळ आलेली आहे .
१. आय टी मधले भारताचे नक्की योगदान काय ?
" भारतीय संगणक "अभियंते" ( ! ) जगभर भारताचा झेंडा फडकवीत आहेत आणि भारत आय टी क्षेत्रात महासत्ता आहे ," असा एक भाबडा समज आपल्या देशात आहे .रोजगार निर्मिती साठी दुसरे काही ठोस जमत नसल्याने या दिवास्वप्नात जनतेला मग्न ठेवणे हे बेरकी राजकारण्यांच्या सोयीचे सुद्धा आहे . प्रत्यक्षात ९९ % भारतीय आय टी कम्पन्या या केवळ परदेशातील आय टी प्रकल्पांसाठी स्वस्त मनुष्यबळ पुरविण्याचे ठेकेदार आहेत . १९९० च्या दशकात भारतात जरी फारसे संगणकीकरण झाले नव्हते तरी परदेशातील संगणकावर अवलंबुन असणाऱ्या हजारो उद्योगांनी Y२K च्या भीतीने आपली दारे "जो मिळेल तो " या तत्वावर ( भारता सारख्या स्वस्त मनुष्यबळ देणाऱ्या ,इंग्रजी बऱ्यापैकी माहित असलेल्या देशांसाठी ) उघडली आणि आपल्याकडे ज्याला ज्याला कॉम्पुटर चे बेसिक ज्ञान होते त्यांना जराश्या प्रशिक्षणाने परदेशी जायची संधी मिळू लागली . डॉलर मध्ये पगार आणि परदेशी नोकरी याचे टिपिकल मध्यमवर्गीय आकर्षण यामुळे आय टी बद्दल एक प्रकारचे वलय निर्माण झाले आणि जो तो आय टी /कॉम्पुटर "इंजिनियरिंग" मध्ये येण्यासाठी पळू लागला . मुळात या सर्व प्रकारात "इंजिनियरिंग" काहीच नव्हते .आवश्यक होते ते कोडिंग चे ज्ञान .आणि कोडिंग तर कोणीही शिकू शकतो .
आजही काही सन्माननीय अपवाद बदलता कॉम्पुटर /माहिती तंत्रन्यान क्षेत्रात मूलभूत संशोधन अथवा एखादे नवीनतम ( innovative ) उत्पादन याबाबतीत भारतीय लोकांची आणि कम्पन्यान्ची बोंबच दिसते . केवळ मायक्रोसॉफ्ट,गुगल अश्या कम्पन्याच्या प्रमुखपदी भारतीय मुळाची व्यक्ती (सत्या नाडेला /सुंदर पिचाई ) बसल्याने या वास्तवात तसूभरही फरक पडला नाहीये आणि नजीकच्या काळात पडण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत . याउलट जगातील आज सर्व आघाडीच्या आय टी प्रणाली /उत्पादने ही अमेरिकन (उदा : ऍप्पल /मायक्रोसॉफ्ट / ओरॅकल ई ) अथवा युरोपियन ( उदा : एस ए पी ) कम्पन्यांनी बनवलेली दिसतात आणि या कम्पन्याची उत्पादने /प्रणाली स्वस्तात "बसवून" द्यायचे काम आमचे आय टी "कामगार" करतात . म्हणजे हा "लेबर जॉब" झाला .आणि इतिहास साक्षी आहे की असे लेबर /कामगार जॉब्स स्वस्ताई कडून अधिक स्वस्ताई कडे आणि मग यांत्रिकीकरणा ( ऑटोमेशन ) कडे जातात .भारताच्या ३००० अभियांत्रिकी विद्यालयांमधून सुमारे १५ लाख इंजिनियर्स बाहेर पडतात दर वर्षी आणि यातील ३० % मुलांना जेमतेम आज नोकरी (मग ती इंजिनीयरची असेलच असे नाही ) मिळते . याचे कारण हेच !
पूर्वी लहानपणी एक गमतीचे कोडे ऐकले होते....राजा का आजारी पडला ? घोडा का बसला ? आणि भाकरी का करपली ? या सगळ्याचे उत्तर होते एकच : " न फिरल्याने /फिरविल्याने " ..तसेच ..इंजिनियर बेकार का झाले ? अभियांत्रिकी महाविद्यालये गोत्यात का आली ? आणि भारतीय आय टी चा फुगा का फुटला ? या सर्व पप्रश्नांचे उत्तर सुद्धा एकच "नवीन शिकण्याची क्षमता आणि कौशल्य आत्मसात न केल्याने " !
२.मग आज नक्की झालेय काय ?
भारतीय संगणक प्रशिक्षित मनुष्यबळ स्वस्त असल्याने गेली दोन दशके आपले आय टी "कामगार" परदेशी लोकांना स्थानिकांपेक्षा सहज "परवडायचे " .आपल्याकडे मुंबई ला जसे बिहार आणि यु पी मधले मजूर बांधकाम क्षेत्रात परवडतात तसे . पण हा काळ आपल्या देशाने फक्त "आय टी महासत्ता" म्हणून खोटी कौतुके करून घेण्यात फुकट घालवला.मागणी तसा पुरवठा म्हणून भारंभार इंजिनियरिंग कॉलेजेस निघाली आणि लाखो "अभियंते" ( ! ) या फॅक्ट्रीज मधून बाहेर पडू लागले .जो पर्यंत आय टी प्रोजेक्ट्स सुरु होते आणि मनुष्यबळ गरजेचे होते तो पर्यंत हा फुगा फुटला नाही .पण गेली ५ वर्षे हा या क्षेत्राचा संक्रमणाचा काळ ठरला .
पहिला फटका : तंत्रज्ञान बदलले .
मशीन लर्निंग , इंटरनेट ऑफ थिंग्स ,आभासी बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence ) ,बिग डेटा ऍनालीटीक्स चे "सेल्फ सर्व्हिस" प्लॅटफॉर्मस आणि क्लाउड कॉम्पुटिंग इत्यादी नवीन गोष्टींनी तंत्रज्ञानाचे विश्व बदलून टाकले .आभासी बुद्धिमत्ता ,मशीन लर्निंग आणि रोबोटिक्स ने आय टी मधले लो लेव्हल /रिपीटेटिव्ह म्हणजे टेस्टिंग /डिबगिंग /सिम्पल प्रोग्रामिंग / सिम्पल कोड चेंजेस असे रोजगार सम्पवले.बिग डेटा आणि ऍनालीटीक्स चे प्लॅटफॉर्म्स आता अधिकाधिक सोपे होत असल्याने बिझनेस युजर्स स्वतः सेल्फ सर्व्हिस करून वापरू शकतात आणि त्याने "अनॅलिस्ट " चे जॉब्स कमी केले .म्हणजे पहिले एक्ससेल शीट्स च्या डोंगराखाली जे काम १० लोकांची टीम एक आठवडा करायची आणि बिझनेस लीडर्स ना समजेल असे रिपोर्ट्स आणि चार्ट्स तयार करून द्यायची ,तेच काम आता स्वतः बिझनेस युजर्स स्वतः च्या आय पॅड वर ५ मिनिट्स मध्ये करू शकतात . म्हणजे जरी बिग डेटा ऍनालीटीक्स ,डेटा सायन्स हे आजही जरी "हॉट " करियर ऑप्शन्स असले तरी त्या क्षेत्रात सुद्धा लो लेव्हल अथवा एंट्री लेव्हल नोकऱ्या कमी झाल्या आहेत .
पूर्वी अजून एक क्षेत्र आय टी मध्ये भरपूर नोकऱ्या द्यायचे ,ते म्हणजे "हार्डवेअर ,नेटवर्क आणि सिस्टिम्स म्यानेजमेंट " .म्हणजे ज्यांना सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी मिळायची नाही त्यांना किमान हार्डवेअर म्यानेजमेंट अथवा नेटवर्क / डेटा सेंटर म्यानेजमेंट अश्या नोकऱ्या मिळायच्या.आता क्लाउड कॉम्पुटिंग मुळे ते रोजगार सुद्धा कमी होत आहेत.कारण हल्ली प्रत्येक छोट्या मोठ्या कम्पनी ला स्वतः चे हार्डवेअर घेऊन आपल्या डेटा सेंटर मध्ये चालविण्यापेक्षा बहुराष्ट्रीय कम्पन्यांनी जगभर सुरु केलेल्या क्लाउड डेटा सेंटर्स मध्ये आपली सॉफ्टवेअर्स चालविणे सोपे आणि किफायती झाले आहे .त्यामुळे या मॉडेल मध्ये हे सर्व हार्डवेअर आणि सिस्टीम म्यानेजमेंट चे जॉब्स ऍमेझॉन ,गुगल,आय बी एम ,मायक्रोसॉफ्ट अश्या तगड्या क्लाउड कम्पन्यांकडे शिफ्ट झाले आहेत.आणि तिकडेही ऑटोमेशन झाल्याने अक्खे १०००० सर्व्हर्स चे डेटा सेंटर फक्त ३-४ माणसे आरामात चालवू शकतात .एका डेटा सेंटर मध्ये किमान १००० ते कमाल ५००० कम्पन्या आपले वर्कलोड चालवू शकतात .त्यामुळे हेच सर्व्हर्स जर प्रत्येक ग्राहकाने ( कम्पनीनें) आपलं स्वतः विकत घेतले असते आणि चालवले असते ,तर किमान १००० ते कमाल १०००० लोकांना विकेंद्रित रोजगार मिळाला असता . म्हणजे किती रोजगार नवीन तंत्रज्ञानानाने खाऊन टाकले हे भयावह आहे .
आपल्या देशातून हजारो इंजिनियर्स फ्रेशर्स म्हणून कम्पनी जॉईन करायचे तेव्हा त्यांना अपेक्षित ट्रेनिंग द्यायला वेळ आणि पैसे लागत असल्याने ,वाट पहाण्यापेक्षा ,त्यांना कम्पन्या अश्या लो लेव्हल कामास जुंपायच्या आणि त्यावरही बॉडी शॉपिंग करून बक्कळ पैसे कमवायच्या .म्हणजे आपला बंडू आणि बबडी जायची अमेरिकेला "इंजिनियर" म्हणून पण करायची दिवसभर सॉफ्टवेअर टेस्टिंग चे काम जे आता रोबो आणि आभासी बुद्धिमत्ता असलेली मशिन्स करू शकतात . मूलभूत संशोधन आणि इनोव्हेशन न झाल्याने भारतीय आय टी कम्पन्या आता डायनोसॉर झाल्या आहेत . आणि त्याहून कालबाहय झाली आहेत ती आपली अभियांत्रिकी महाविद्यालये आणि त्यांचे जुनाट अभ्यासक्रम ! आज मुलांना आय टी मध्ये डिग्री घेऊन सुद्धा आहेत त्या नोकऱ्या सुद्धा मिळत नाहीत कारण त्यांनी ४ वर्षे शिकलेले ज्ञान टाकाऊ झालेले असते . जग आज रुबी /पायथन /डॉकर कंटेनर्स / नोड जे एस /मोंगो डीबी /कलाऊडन्ट/बिग क्वेरी /अपाचे हाडुप /स्पार्क आणि API लायब्ररी इत्यादी कन्सेप्ट्स वापरून प्रोग्रामिंग करत असताना आपल्या अभ्यासक्रमात अजूनही शिकविले काय जाते ? तर जावा आणि C ++ ! मी व्यवसायाचा भाग म्हणून काही इंजिनियरिंग महाविद्यालयात मार्गदर्शन करण्यासाठी जातो तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोलतो ,आणि ज्या पातळीवर तिकडे जे काही चालते आणि आज इंडस्ट्री ला काय हवे आहे यात जमीन अस्मानाचा फरक आहे .अर्थात काही कॉलेजेस मध्ये अपवादाने एखाद्या प्राध्यापकाच्या स्वतः च्या पुढाकारातून चांगले काही नवीन कोर्सेस सुरु झालेले आहेतही .पण ९० % कॉलेजेस अजूनही मागे आहेत .
दुसरा फटका : ग्लोबलायझेशन चा फुगा फुटला :
विसाव्या शतकाच्या अखेरीस असे म्हटले जाऊ लागले की इंटरनेट , आय टी आणि आऊटसोर्सिंग च्या व्यापक प्रसारामुळे जग जवळ आले आहे आणि यापुढे जग अधिकाधिक "ग्लोबल" बाजारपेठ होईल .थॉमस फ्रीडमन सारख्या प्रख्यात लेखकाने "वर्ल्ड इज फ्लॅट " सारखे बेस्टसेलर पुस्तक याच काळात लिहिले . पण आज परिस्थिती पहाता ,जागतिक पातळीवर उजव्या विचारसरणी च्या राजवटी अधिकाधिक सत्तेवर येऊ लागल्या आहेत .त्यामुळे बाहेरच्या लोकांना नोकऱ्या देणे म्हणजे अश्या राजवटी ज्या स्वप्नाळू राष्ट्रवाद आणि देशभक्ती च्या आभासी डोलाऱ्यावर उभ्या असतात त्यांना आवाहन देणे असे वाटू लागले आहे .आज जगभर विशेतः पाश्चात्य राष्ट्रात "बाहेरच्या" लोकांबद्दल तिरस्कार वाढतो आहे आणि "हे भारतीय आणि चिनी आले कमी पगारावर काम करायला आणि आपल्या पोटावर पाय द्यायला " अशी भावना वाढीस लागली आहे .अगदी महाराष्ट्रामध्ये काही राजकीय पक्ष उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य कष्टकरी जनते विरुद्ध जसा विखार पसरवतात तसेच हे . त्यामुळे आज परदेशी कम्पन्यांवर त्यांनी आपले आय टी प्रोजेक्ट्स भारतीय आय टी कम्पन्यांना देऊ नये असा दबाव वाढतो आहे .
परदेशी व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वर्क व्हिसा चे नियम सुद्धा कडक झाल्याने नाईलाजाने भारतीय आय टी कम्पन्यांना त्या त्या देशातील स्थानिक नागरिकांना नोकऱ्या द्याव्या लागत आहेत आणि त्यामुळे आपल्या भारतीय "फॅक्टरी " मधून बी.ई .झालेल्या " इंजिनियर "कामगारांना कॅम्पस प्लेसमेंट सुद्धा मिळणे मुश्किल झाले आहे .
३.मग आता करायचे काय ?
कुठलेही क्षेत्र हे प्रवाही असते आणि त्या त्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांचे आकलन आणि अंगीकार करणे हे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गरजेचे असते . आंधळेपणाने पालकांनी आपल्या मुलांना सरसकट कॉम्प्युटर आणि आय टी इंजिनियर बनवायच्या फॅक्टरी मध्ये टाकले तर भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त ! आय टी क्षेत्र बुडालेले नाही पण त्यात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराचे प्रकार आणि त्याला लागणारी कौशल्य आणि लागणारी माणसांची संख्या या गोष्टी बदलल्या आहेत . तसेच केवळ परदेशी जाण्याचे तिकीट म्हणून आय टी कडे पाहू नये .आज जगात भारत ही सर्वात वेगाने वाढणारी दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे . आपल्या देशाला प्रगती मध्ये अजून खूप पल्ला गाठायचा आहे .त्यामुळे शेती ,लघु आणि मध्यम उद्योग ,पायाभूत क्षेत्र ,डिजिटल इंडिया आणि अश्या अनेक गोष्टींसाठी संगणकीकरण आणि आय टी सोल्युशन्स ची गरज लागणारच आहे . पण पूर्वीसारखे ऑन साईट मिळणारा "इझी डॉलर मनी " आणि इकडे देशात त्याच वेळी दणक्यात मिळणारा भारतीय रुपयामधला पगार या गोष्टी आता असणार नाहीत . थातुर मातुर खाजगी इंजिनियरिंग कॉलेज मधून पाट्या टाकून इंजिनियर झालेल्या मुलांना नोकरी लागणे सोडाच पण साधे कोणी इंटरव्हू ला सुद्धा बोलावणार नाही .
एकोणिसाव्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांती ने जुने रोजगार सम्पवले पण नवीन रोजगार सुद्धा निर्माण केले ! फक्त ज्यांनी त्याच्याशी जुळवून घेतले ते तगले .विसाव्या शतकाच्या मध्यात सुरु झालेल्या संगणकीकरणा मुळे आपले आयुष्य आमूलाग्र बदलले आणि परत काही जुने रोजगार सम्पवले पण नवीन रोजगार निर्माण सुद्धा केले .आय टी सोल्युशन्स मुळे कुठल्याही उद्योगाची उत्पादकता आणि गुणात्मकता वाढते . म्हणजे बँकांचे संगणकीकरण झाल्याने काही लोकांच्या नोकऱ्या नक्की कमी झाल्या पण त्याच वेळी कोअर बँकिंग च्या नेटवर्क मुळे बँकाच्या शाखा सुद्धा अधिक सुरु करता आल्या आणि त्यामुळे त्या क्षेत्रात त्या प्रमाणात अधिक रोजगार निर्माण झाले . देशातील १९९१ च्या आर्थिक उदारीकरणांनंतर तर वर नमूद केल्याप्रमाणे आपल्या देशातील एक अक्खी पिढी आय टी क्षेत्रात घुसली ! म्हणजे कालानुरूप रोजगार नष्ट होतात आणि नवीन क्षेत्र उदयास येते .
शेवटचा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे आय टी क्षेत्र तेव्हाच वाढू शकेल जेव्हा इतर उद्योग आणि व्यवसायांची वाढ होईल ! म्हणजे जास्त बँका वाढल्या तर त्याला लागणाऱ्या संगणक प्रणाली वाढतील,पायाभूत क्षेत्र वाढले तर स्मार्ट सिटीज साठी आय टी लागेलच ,जास्त विमानकम्पन्या सुरु झाल्या तर एअरपोर्ट आणि एअरलाईन क्षेत्रात आय टी ची जास्त गरज लागेल ,जास्त उत्पादन उद्योग सुरु झाले तर ERP सारख्या सॉफ्टवेअर्स ना मागणी वाढेल ,जास्त मीडिया कम्पनीज सुरु झाल्या तर त्यांना लागणारे VFX /Animation इत्यादी रोजगार निर्माण होतील ...वगैरे वगैरे...त्यामुळे या सर्व क्षेत्राला सुद्धा वाढण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हवे आहे ! मग आपल्या मुलाला अथवा मुलीला इंजिनियरिंग करायचेच असेल तर मेकॅनिकल /सिव्हिल/इलेक्ट्रिकल असे मूलभूत इंजिनियरिंग का करू नये ? बँकिंग/मीडिया मध्ये का त्याने करियर करू नये ? आय टी च करायचे तर चाकोरीबद्ध बी ई च्या डिग्री च्या मागे लागण्यापेक्षा बेसिक ग्रॅज्युएशन करता करता साईड बाय साईड डेटा सायन्स /क्लाउड/मशीन लर्निंग अश्या नवीन क्षेत्रात स्पेशलाइज्ड कोर्सेस का करू नयेत ?सरकार मध्ये सुद्धा डिजिटल इंडिया मोहीम सुरु आहे मग आपल्या बबडी ने आय ए एस होऊन आय टी चा विधायक वापर करून सरकारी योजनांचे संगणकीकरण करवून घेण्याचे स्वप्न का पाहू नये ?
आणि नोकरीच का ..स्वतः चा स्टार्ट अप सुरु करण्याचे प्रयत्न सुद्धा करू नयेत ?
एव्हढे सगळे करियर ऑप्शन्स उपलब्ध असताना केवळ आय टी मध्ये नोकरी करून अमेरिकेला जाण्याचे टिपिकल मराठी मध्यमवर्गीय स्वप्न आपण का पहातोय ? मुलांना काय आवडते आणि त्यांना कशात गती आहे याचा विचार आपण कधी करणार ?
वाचा आणि विचार करा ! पटल्यास सर्व मराठी पालकांना हा लेख पाठवा .
धन्यवाद
चिन्मय गवाणकर ,वसई
ChinmayGavankar@gmail.com
Comments
--शशी जोगळेकर
--शशी जोगळेकर
Thnx chinmay. Keep it up.
एका महत्त्वाच्या विषयावर अभ्यासपुर्ण लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन! माझ्या मनात आलेले काही विचार,
१) आय. टी. असो वा दुसरं कोणतं क्षेत्र असो; ज्या झपाट्यानं जगातील संदर्भ बदलत चालले आहेत तो वेग पाहता कोणतंही एक क्षेत्र तुमच्यापुर्ण कारकिर्दीच्या कालावधीत शिखरावर रहाणं शक्य नाही. त्यामुळं तुमच्या कारकिर्दीत काही काळ यशाचं शिखर आणि बाकी काळ 'Also Ran' अशी परिस्थिती आल्यास दुःखी होण्याचं कारण नाही.
२) "अरे हा मोठ्या कंपनीत कामाला आहे' ह्या वाक्याची चटक सोशल स्टेटससाठी मध्यमवर्गीयांना काही प्रमाणात लागली आहे. ती जाऊन "हा चांगला शिक्षक आहे, हा चांगल्या प्रकारे शेती करतो' ही स्टेटसची वाक्य व्हायला हवीत. ज्या प्रमाणात अजुनही आपल्या देशाची लोकसंख्या वाढत चालली आहे ते पाहता केवळ शेती , पारंपरिक अभियांत्रिकी, वैद्यकीय, शिक्षण ही मुलभूत क्षेत्रच दीर्घकाळ टिकू शकतात.
३) All is not lost for IT. पण नक्कीच संधी कमी होत चालल्या आहेत. गेल्या २० वर्षात जर १०० टक्के इच्छुक अभियंत्यांना IT क्षेत्रानं सामावुन घेतलं तर आज कदाचित केवळ ८० टक्क्यांना ते सामावुन घेईल आणि उद्या ६० टक्क्यांना! एकंदरीत इच्छुकांच्या यादीत Aptitude, Programming Skills, Presentation Skills, Perseverance ह्या गुणांच्या एकंदरीत मिलाफाच्या दृष्टीनं आपलं नक्की स्थान कोणतं आहे ह्याची जाण स्वतःला असणं आणि त्यानुसार आपल्या अपेक्षा बनवणं हे ज्याला जमलं तो नक्कीच सुस्थितीत असेल
४) दीर्घकालीन पर्यांयांसाठी आपल्या देशांतर्गत क्षेत्रच आपल्याला तारून नेऊ शकतील हा अगदी योग्य मुद्दा चिन्मय तू मांडला आहेस. भुलवणाऱ परदेशी वास्तव्य सरसकट सर्वांना मिळण्याचा काळ निघुन गेला हे वास्तव एक समाज म्हणून आपण जितक्या लवकर स्वीकारू ते आपल्या समाजाच्या दृष्टीनं हिताचं ठरेल.
५) शेवटी एक फारसा न बोलला जाणारा पण महत्त्वाचा मुद्दा! सामाजिक समारंभात किंवा लग्नासाठी योग्य तरुणांचा शोध घेताना ज्यावेळी एक समाज म्हणून आपण ज्या दिवशी एक तरुण शिक्षक, शेतकरी ह्यांना एका गलेलठ्ठ पगाराच्या नोकरदाराइतकच मानाचं स्थान देऊ त्यावेळी आपल्या समाजातील तरुणांवर एक Glamorous करियर बनविण्याचं मोठं ओझं बऱ्याच अंशी कमी होईल !
आदित्य
This blog is eye opener for all Parents,Thanks Chinmay
Daya
Thanks for guiding us.
Vishal Jadhav
Santosh Ugale,
Scientist-E & Technical Director,
Govt. Of India's,
National Informatics Centre,
Pune.
Some clarification about last topic about `
आय टी क्षेत्र तेव्हाच वाढू शकेल जेव्हा इतर उद्योग आणि व्यवसायांची वाढ होईल`
But wats Niti Ayog chief said today as
Low-cost Internet based transactions and business efficiency due to technology advancements are expected to kill physical banks in next 5-6 years, NITI Aayog CEO Amitabh Kant said today.
It's a chances of every sectors.Then wats your views on this.
माझे काही विचार माझ्या अनुभवास अनुसरून.
खुप छान. काही तथ्य छान मांडली आहेत. आय टी मध्ये नक्कीच मनुष्यबळ कमी लागणार आहे. पण त्याचबरोबर आय टी मध्ये नवीन टेक्नॉलॉजी वर भरपूर काम येणार आहे. बर्याच गोष्टी वर संशोधन चालू आहे. आपले डे टु डे लाईफ आय टी मुळे पूर्णपणे बदलत आहे आणि अजूनही बदलणार आहे. पण त्यासाठी गरज आहे टेक्नीकल, टँलेंटेड संशोधक लोकांची. खरं आहे फक्त गलेलठ्ठ पगार आणि परदेशी गमन करण्याच्या अपेक्षा मनी बाळगून करायचे म्हणून करायचे इंजिनिअरींग अशा लोकांचे काम नाही आता. होतकरू आणि क्यालिबर असणाऱ्याची नेहमीच डीमांड सर्वत्र राहणार.
परंतु एक गोष्ट समजून घेतले पाहिजे की जा भारतीय आयटी कंपन्या स्वतः स कन्सल्टींग क्षेत्रात धरतात त्यांचे product development हे कधी ध्येय न्हवतेच. त्यामुळे ते innovation, नवीन उत्पादन का करत न्हवते हे दोषारोप करणे चुकीचे आहे. पण पाश्चात्य कंपन्यानी बनवले ल्या किचकट प्रणाली/यंत्रणेला maintain करणे, त्यात सुधारणा करणे हे पण डोके खाजवण्याचे काम होते. प्रणाली 'बसवून' देणे/ installation करणे हा फक्त संपूर्ण कामातला फक्त एक भाग आहे.
Y2K टप्यात नक्कीच फक्त coding आणि data feeding चे थातुरमातुर काम होते. परंतु नंतरच्या टप्यात किचकट product development आणि maintenance मध्ये गरज होती logic, creativity ची मेहनतीची. मोबाईल प्याक करणार्यांना, डिलिव्हरी करणाऱ्याँला आपण लेबर जाँब वाला म्हणू पण मोबाईल repair करणाऱ्या ला आपण skilled worker म्हणतो. प्रणालीतली त्रुटी आणि चुका काढताना बर्याच वेळा ए सी मधे ही घाम फुटायचा. आणि हेच योगदान होते भारतीय इंजिनिअरचे. डॉलर मधला पगार होता पण त्या बरोबर धाम, अश्रू, असंतुलित जीवन ही होतेच. आणि ह्या साठी तत्पर नसायचे बरेचसे पश्चिमात्य लोकल युवक.
म्हणून मोठमोठ्या कंपन्यांच्या बर्याच शा मोठ्या हुद्द्यावर, संशोधन विभागात बरेच भारतीय आहेत. त्या कंपन्यांच्या आत ही भारतीय आणि vendors ही भारतीय असे ही चित्र आहे. आणि हेच चित्र बदलन्यासाठी आले व्हिजा निर्बंध.
ग्लोबलायझेशन नक्कीच झाले असते पण त्याचा फुगा फुटण्याचे कारण आहे दहशतवाद, राजकीय फायद्या च्या हेतुतून निर्माण झालेला संकुचित पणा आणि अजूनही आय टी क्षेत्रातीँल challenges जसे की cyber security. ह्या गोष्टींत योग्य तो बदल झाला तर ग्लोबलायझेशन पून्हा जोम धरेल.
आणि खरेच बाकी क्षेत्रात ही छान कामे आहेत म्हणून आय टी वर शिक्का मारल्या प्रमाणे मुलांनी आणि पालकांनी तिकडे च धाऊ नये. विद्यार्थ्यांचा कल, आवड, तयारी ओळखावी.
आय टी शिक्षणात नक्कीच योग्य ते बदल व्हायला हवे आहेत पण त्यातले challenges ही समजले पाहिजेत. जसे जलद गतीने बदलणारी टेक्नॉलॉजी, नवीन बदल आणि basic fundamentals ह्या दोन्ही ची योग्य ती सांगड syllabus मध्ये घातली पाहिजे. Funda clear असतील तर नवीन language आणि software शिकायला अवघड नसते.
तसे पहायला गेले तर आय टी मधल्या काही जनकांनी, महारथींनी तर महाविद्यालयीन शिक्षण पण पूर्ण केले नाही. मग आय टी शिक्षणातील त्रुटींची सबब ही लांबच.
अफाट झणझणीत अंजन चिन्मय सर ...👌👌👌👌
https://www.businesstoday.in/sectors/jobs/jobs-are-back-in-it-sector-top-6-firms-hire-over-1-lakh-employees-in-2018-19/story/337610.html
https://www.business-standard.com/article/companies/it-industry-on-hiring-spree-adds-record-number-of-employees-in-q1-119082500648_1.html
https://trak.in/tags/business/2019/07/25/tcs-rolls-out-job-offer-to-30000-freshers-tcs-recruitment-hits-5-year-high/