वसई विजयोत्सव : प्रत्येक भारतीयाला गौरवास्पद !
२७९ वा वसई विजयोत्सव साजरा होताना बराच गदारोळ उडताना दिसतोय. दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि हे समाज माध्यमांवरील वाद वसई मधल्या धार्मिक शांततेला धोका पोहिचवतील की काय इथपर्यंत पोहोचले आहेत.त्यामुळे काही मुद्दे मांडण्याचा हा विनम्र प्रयत्न .
१. विजयोत्सवावर खर्च केला जावा का ?
या विजयोत्सवाला आधी पासून विरोधक विरोध करतायत आणि मी माझ्या एका फेसबुक पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे लोकशाही मध्ये जनतेच्या करांमधून होणाऱ्या सार्वजनिक खर्चावर बारीक नजर ठेवणे हा विरोधकांचा हक्क आहेच .त्यामुळे वसई मध्ये पाणी,रस्ते,आरोग्य सुविधा इत्यादी वाढविण्याची गरज असताना विजयोत्सवावर इतका खर्च करावा का,हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकतो आणि लोकशाही परंपरेप्रमाणे पालिका सभागृहात तसेच विविध व्यासपीठांवर समूह चर्चा करून तो प्रश्न धसास लावता येऊ शकतो .त्यासाठी हिंदू-ख्रिस्ती वाद निर्माण करून सामाजिक शांततेचा भंग करण्याचे कुटील राजकारण करण्याची गरज नाही .
पण शेवटी हा आपल्या देशाच्या अभिमानाचा प्रश्न असल्याने ,पुढील येणाऱ्या पिढ्यांना या गौरवपूर्ण इतिहासाचा विसर पडू नये म्हणून विजयोत्सव झालाच पाहिजे .तिकडे काय कार्यक्रम करावेत / व्यावसायिक नाटके करावीत का ? / बाल जत्रा भरवावी का की केवळ चिमाजी अप्पांच्या प्रतिमेचे पूजन करून भावपूर्ण वातावरणांत शहीद वीरांना नमन करावे / ऐतिहासिक प्रदर्शने भरवावीत का इत्यादी इत्यादी निर्णय लोकशाही प्रक्रियेने घ्यावे आणि आज तरी महापालिकेचा हा अधिकृत कार्यक्रम असल्याने आणि पालिकेचे नगरसेवक रीतसर निवडणुकीने नागरिकांतून निवडून आल्याने ,लोकशाही प्रक्रिया पार पाडूनच हा उत्सव साजरा केला जातो हे सुद्धा तितकेच खरे . ति
प्रत्येक गोष्टीत "आपला देश गरीब आहे ,उत्सवावर खर्च करू नका " असे म्हटले तर मग १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी चे शासकीय संचलन सुद्धा बंद करावे लागेल .आणि आजू बाजूला समाजात गरजू बांधव उपाशी पोटी झोपत असताना आपण सर्वांनी मिळून आय पी एल आणि बाहुबली -२ वर खर्च केलेल्या हजारो करोड रुपयांचा सुद्धा नैतिक हिशेब आपल्याला स्वतः च्या सद सद विवेक बुद्धीला द्यावा लागेल . या वर पिसाळून "माझा कष्टाने मिळविलेला पैसा मी कसाही खर्च करीन.. अनाथाश्रमाला देणगी देईन नाहीतर बाहुबली बघायला ५०० रुपयाचे मल्टिप्लेक्स चे तिकीट काढीन " असा वाद घालणाऱ्यांनी मग हे सुद्धा ऐकायची तयारी ठेवा की कर रूपाने गोळा झालेला पैसा खर्च करण्याचे सर्व अधिकार त्याच न्यायाने लोकनियुक्त सरकार ला सुद्धा असतात . आणि हो,तुम्ही सरकार ला सनदशीर मार्गाने नक्कीच जाब विचारू शकता !
२. वसई च्या लढ्याचे महत्व काय : परंतु ,"विजयोत्सव पूर्णपणे बंद करा " ही काही संस्थांकडून होणारी मागणी मात्र हास्यास्पद आहे . वसई विजयाचे महत्व इतिहासात काय आहे हे जरा पाहूया .श्रेयस जोशी बरोबर त्या दिवशी बोलताना मी हा मुद्दा मांडला होता आणि त्याने त्याच्या पोस्ट मध्ये सुद्धा हा मुद्धा टाकला आहे .तरीही ज्यांनी श्रेयस ची पोस्ट वाचली नाही त्यांच्यासाठी मी जरा हा मुद्दा परत मांडतो .
आधुनिक इतिहासात " पाश्चात्य सैन्यावर आशियाई सत्तेने मिळविलेला पहिला विजय " म्हणून १९०४-५ च्या जपान -रशिया युद्धाचे दाखले दिले जातात . जपान ने १९०५ मध्ये रशिया ला हरविल्यामुळे आशियाई राष्ट्रांमध्ये नव चैतन्य पसरले आणि काही इतिहास कारांच्या मते तर पाश्चात्य वसाहती राज्यकर्त्यांविरुद्ध भारतासारख्या विविध आशियाई देशांमध्ये सुरु असलेल्या स्वातंत्र्य लढ्याला सुद्धा नवीन चैतन्य मिळाले . त्याआधी आशियाई सत्ता युरिपियनांना हरवू शकतात याचा कोणी विचार देखील केला नव्हता . पण वसई चा लढा १७३९ साली लढला गेला ..जपान च्या विजयाच्या किमान दीडशे वर्ष आधी आणि त्यामुळे नजीकच्या लिखित इतिहासामधील आशियाई ( मराठी ) सत्तेने युरोपियन ( पोर्तुगीज ) सत्ते विरुद्ध मिळविलेला तो पहिला विजय ठरतो . अतिशय प्रतिकूल परिस्थिती मध्ये २ वर्ष चिवटपणे झुंझ देऊन मिळालेला हा विजय आहे .
३. मराठे पोर्तुगीजांना घाबरत होते ? /पोर्तुगीजांनी स्वतः हुन सत्ता ताब्यात दिली ? ( काही कुचकट लोकांकडून चालवली जाणारी छुपी कुजबुज मोहीम )
१७३९ ला वसई मधून जावे लागल्यानन्तर भारतातील पोर्तुगीज सत्तेने कधीही मराठी साम्राज्याशी वाकडे घेतले नाही . वसई साठी २४ महिने चिवट लढा देऊन,२२००० मराठी वीरांच्या प्राणांची आहुती देऊन सुद्धा सूडबुद्धीने न वागता ,वसई मधून पोर्तुगीजांना सन्मानाने त्यांच्या चीज वस्तूंसह गोव्याला जाऊ दिले यात मराठ्यांचा मनाचा मोठेपणा दिसतो. वसई मधील काही इतिहासकार कुत्सितपणे आणि आपल्या दुर्दैवाने हा मराठ्यांचा कमकुवतपणा समजतात .वसई मधलेच काही अर्धवट अकलेचे लोक तर खाजगीत बोलताना असेही म्हणतात की चिमाजी अप्पांना २ वर्षे प्रयत्न करून सुद्धा किल्ला जिंकता आला नाही ,शेवटी छुपा समझोता करून पोर्तुगीजांना सगळी दौलत घेऊन जाऊ दिले .पण तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता मराठी सत्ता प्रबळ होती आणि हा काळ पहिले बाजीराव पेशवे यांच्या ऐन बहराचा होता . अगदी इतिहासाचा अभ्यास नसेल तरी मागच्या वर्षी आलेला "बाजीराव मस्तानी" सिनेमा जरी पहिला असाल तर हा काळ डोळ्यासमोर उभा राहील .मराठी सत्ता विविध प्रांत पादाक्रांत करीत होती .त्यामुळे गोवा,दीव दमण च्या उरलेल्या पोर्तुगीजांना घाबरण्याचे आणि म्हणून नमते घेण्याचे मराठ्यांना काहीच कारण नव्हते . मराठी सत्तेला उतरती कळा पानिपत च्या पराभवांनंतर ( जो किमान २० वर्षे दूर होता ) नन्तर लागली आणि त्यामुळे " चिमाजी अप्पा पोर्तुगीजांना घाबरले आणि म्हणून त्यांनी मुकाट तह करून पोर्तुगीजांना बँड च्या तालात वाजत गाजत जाण्याची परवानगी दिली " असल्या कुचाळक्या करणारे खरे वसईकर काय तर भारतीयच नव्हेत .त्यामुळे अशा स्वयंघोषित "इतिहासकारांकडून " सावध राहावे .
पोर्तुगीज सरकार च्या तत्कालीन नोंदीत १७३७ ते १७३९ च्या धामधुमीत मराठ्यांच्या झन्झावाता मुळे उत्तर कोकण (सध्याचा मुंबई,ठाणे आणि पालघर जिल्हा ) मधील वसई ही राजधानी ,२ मोठे किल्ले २० छोटे किल्ले,४ मुख्य बंदरे ,८ शहरे आणि ३४० गावे गमवावी लागली असा उल्लेख आहे . जर चिमाजी अप्पांचे "सेटिंग " ( आमच्या वसई च्या खास स्थानिक भाषेत ) असते तर त्यांना अक्खा उत्तर कोकण आंदण देण्याने पोर्तुगिजांचा काय बरं फायदा झाला ? उलट वसई ही पोर्तुगीजांची त्या वेळची सर्वात श्रीमंत वसाहत होती . वसई गमवावी लागल्याने पोर्तुगीज साम्राज्याची खूप मोठी हानी झाली .वसई चक्क पोर्तुगीज पोस्टल स्टॅम्प वर सुद्धा झळकली आहे .
४. वसई चा विजय हा केवळ " हिंदूंचा " विजय आहे ?
पोर्तुगीज हे धर्मवेडे होते हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही . त्यांनी आणि स्पॅनिश लोकांनी जगभर आपला धर्म पसरावा म्हणून व्यापाराच्या आडून जो धर्मांतराचा उच्छाद घातला त्यास तुलना नाही . पोर्तुगीज इतके कट्टर होते की इन्क्वीसिशन्स चा काळा कुट्ट इतिहास त्यांनी लिहिला . ब्रिटिश,डच आणि फ्रेंच आदी इतर वसाहती सत्ता पैशाच्या मागे होत्या आणि एका मर्यादे पलीकडे त्यांनी स्थानिक धर्मात फार ढवळाढवळ केली नाही .ब्रिटिशांनी " फोडा आणि राज्य करा" नीती अंतर्गत इकडे जातीय आणि धार्मिक भांडणे जरूर लावून दिली,पण " स्टेट स्पॉन्सर्ड कन्व्हर्शन्स " म्हणजे सरकारच्या पाठिंब्याने होणारी सामूहिक धर्मांतरे केल्याचे फारसे दाखले नाहीत . पोर्तुगीजांनी वसई मध्ये बळजबरीने किती धर्मांतरे केली आणि आप खुशीने किती वंचीत समाजघटकांनी हिंदू धर्माला,जाती व्यवस्थेला आणि सामाजिक विषमतेला कंटाळून कॅथलिक धर्म स्वीकारला या विषयावर आजही बरेच मतभेद आहेत .त्याकाळची मूळ विश्वास ठेवावी अशी कागदपत्रे भारतात तरी फारशी उपलब्ध नाहीत .पोर्तुगीज रेकॉर्ड्स मध्ये लिस्बन ला असतील तर माहित नाही . पण समकालीन गोव्यात काय घडत होते याची विपुल माहिती उपलब्ध आहे .आणि गोव्यामध्ये जो छळ हिंदूंचा झाला ,तो पाहता वसई मधले पोर्तुगीज फार उदारमतवादी असतील असा भाबडा विश्वास ठेवायला मी तरी तयार नाही . त्यामुळे " पोर्तुगीज खूप चांगले होते आणि त्यांनी कोणावर बळजबरी केली नाही " असे बोलणारे तथाकथित विचारवन्त ठार वेडे तरी असावेत अथवा महामूर्ख तरी .
पेशव्यांनी वसई मुक्ती साठी सैन्य पाठविण्यामागे इकडच्या हिंदूंचे रक्षण करावे हा हेतू होताच पण गुजरात पासून मुंबई पर्यंत पसरलेल्या विशाल किनारपट्टी वर आणि समुद्र व्यापारावर नियंत्रण आणणे हा सामरिक आणि स्ट्रॅटेजिक हेतू सुद्धा होता . युद्ध जिंकल्यावर जे हिंदू नाहीत अथवा ज्यांनी धर्मांतर केले आहे त्यांना सुद्धा सन्मानाने वागविणारे उदार मन मराठ्यांकडे होते . वसई मधील नवीन ख्रिस्ती झालेली तत्कालीन कुटुंबे यांना पोर्तुगीज कुटुंबांपुढे दुय्य्म दर्जा होता आणि पोर्तुगीज वसई ची उघडपणे लूट करून युरोपचे खजिने भरीत होते त्यामुळे इकडील हिंदू आणि ख्रिस्ती अशा सर्व समाजात पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटी विरुद्ध संताप होताच . त्यामुळे मराठी सैन्याच्या विजयाचे स्वागत आणि विजयोत्सव सर्व समाजाने एकत्र मिळून साजरा केला हा इतिहास आहे .
आजही वसई ची संस्कृती बघाल तर वसई मधला हिंदू माणूस आणि ख्रिस्ती माणूस यामधला फरक एक धार्मिक निष्ठा सॊडल्या तर काहीच नाही . वसई मधील सर्व नागरिक प्रथम भारतीय,मग महाराष्ट्रीयन ,मग वसईकर आणि शेवटी हिंदू किव्वा ख्रिस्ती असतात .वसई च्या ख्रिस्ती शिक्षिका साडी नेसून,मुंबई च्या मराठी माध्यमातील शाळांमध्ये जेव्हा शुद्ध मराठी शिकवतात तेव्हा नवीन माणसाला त्यांचे ख्रिस्ती नाव ऐकून चकित व्हायला होते . यात वसई मधल्या बंधू भावाचे आणि शांततेचे मूळ लपले आहे . त्यामुळे मराठे -पोर्तुगीज लढा हा "हिंदूं विरुद्ध ख्रिस्ती" अश्या संकोचलेल्या दृष्टिकोनातून बघणाऱ्या लोकांचे उद्दिष्ट्य केवळ समाजात अशांतता निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेणे हाच आहे .
५.पोर्तुगीज " आधुनिक " शासक होते आणि मराठ्यांनी त्यांना हाकलून दिल्याने वसई चे नुकसान झाले ?
हा तर मी ऐकलेला सर्वात हास्यास्पद युक्तिवाद. .पोर्तुगीज सत्ता अतिशय क्रूर होती आणि त्यांनी देशांचे शोषण करून युरोपियन खजिने भरले .मान्य की त्यांच्या आधी आलेले मुघल शासक सुद्धा परकीय होते. पण मुघलांनी इकडेच साम्राज्य स्थापन करून भारताला आपला देश मानले .कुणाला मुसलमानी राजवट आवडो न आवडो पण ती "स्थानिक" राजवट म्हणून राहिली .भारतीय कला ,संस्कृती, समाज जीवन इ वर मुघलांनी खूप भर घातली .पोर्तुगीजांनी वसाहती लुटून लिसबन ला पैसे नेले .पोर्तुगीजांनी म्हणे वसई च्या किल्यांत " सुसज्ज " हॉस्पिटल काढले होते !!!
ज्यांना फार प्रेम वाटते पोर्तुगीज लोकांचे त्यांनी १९६० पूर्वी गोव्यात राहणाऱ्या लोकांना विचारावे काय दिवे लावले पोर्तुगीजांनी तिकडे .ब्रिटिशांनी पण भारताचे शोषण केले पण निदान काहीतरी सोयी सुवीधा आणल्या इकडे .पोर्तुगीज गोव्यात अगदी १९६० पर्यंत धड रस्ते,वीज,रेल्वे काहीच नव्हते .एकही उद्योग त्यांनी उभा केला नाही .लुटारू राजवट होती ती . १९६० पर्यंत ज्या पोर्तुगीजांना गोव्यात धड वैद्यकीय सुविधा देता आल्या नाहीत ते सतराव्या शतकात वसई मध्ये कसले डोम्बल "सुसज्ज" वगैरे हॉस्पिटल उभारणार ! विश्रामगृह /सॅनिटोरियम एव्हढीच लायकी असणार त्या "हॉस्पिटल" ची . पोर्तुगीजांनी वसई च्या अर्थ व्यवस्थेला काहीच दिले नाही .त्यांनी फक्त वसई च्या बंदराचा वापर करून जगभर व्यापार केला आणि इकडच्या पोर्तुगीज व्यापाऱ्यांना मालामाल केले . वसई ची सामान्य जनता अगदी आता आता १९६०-७० पर्यंत केवळ शेती बागायती वर जगत होती .काय मोठे दिवे लावले वसई चा "विकास" करायला पोर्तुगीजांनी ? काही नवीन शिकवले इकडच्या जनतेला ? काही नवीन पायाभूत सुविधा निर्माण केल्या ? बोट बांधण्याचे तंत्र उत्तम जमायचे त्यांना .स्थानिकांना ते तरी शिकवले का त्यांनी ?
वसई चे पोर्तुगीज गेल्याने काहीही नुकसान झाले नाही . प्रत्येक शहराचा एक वैभवाचा काळ असतो. पोर्तुगीज येण्याआधी कित्येक शतके वसई च्या सोपारा बंदरातून भारताचा मध्य पूर्व,आफ्रिका आणि युरोप शी व्यापार सुरु होता . पोर्तुगीज येण्याच्या आधी पासून भारत हा असा देश होता की जो जागतिक GDP मध्ये २५ % वाटा उचलायचा ! अश्या सुंदर भारत भूमीला लुटायला आलेली दरोडेखोरांची टोळी केवळ हे पोर्तुगीज म्हणजे . केवळ नौकानयन ,जहाज बांधणी शास्त्र प्रगत होते त्यांचे आणि जगभर फिरण्याची धडाडी ! विज्ञान /तंत्रद्यान /अभिजात कला वगैरे साठी पोर्तुगाल कधीच प्रसिद्ध नव्हता .आजही पोर्तुगाल हा देश एक आळशी आणि खालावलेल्या अर्थव्यवस्थेचा देश म्हणून ओळखला जातो. युरोपात एकोणिसाव्या शतकात इंग्लड आणि मध्य युरोप मध्ये औद्योगिक क्रांती होत असताना पोर्तुगाल मात्र सुशेगाद होता .केवळ आपल्या जगभर च्या वसाहती लुटायच्या आणि नागरिकांचा धर्मवेडाने क्रूर छळ करायचा या पलीकडे त्यांना अक्कल नव्हती . त्यामुळे १७३९ मधल्या वसईच्या पोर्तुगीजांना "आधुनिक राजवट " म्हणणाऱ्यांनी आपले डोके तपासून घ्यावे हे उत्तम .
त्यामुळे केवळ वसई नव्हे तर प्रत्येक भारतीयाने हा विजय साजरा केलाच पाहिजे . कसा करायचा ,किती पैसे खर्च करायचे याची चर्चा जरूर करा .पण कृपया यास हिंदू-ख्रिस्ती वादाचे स्वरूप देऊन वसई मधील शांतता बिघडवू नका .
17 Comments:
चपराक पोर्तुगीज प्रेमींना
एकदम संयत आणि परफेक्ट!!👍
मस्तच...सणसणीत आणि मुद्देसुत...!! :)
अतिशय सुंदर आणि मुद्देसूद blog.
अतिशय सुरेख मुद्देसूद
Sundar
अभ्यासपूर्ण आणि परखड!!👍
खुप सुंदर
Superb
सुंदर विश्लेषण
वसईचा इतिहास वाचायला आवडेल.
Detailed & very true.
Jay "Vajrai", Jay " Chimaji Aappa", Jai "Vasai"
Detailed & very true.
Jay "Vajrai", Jay " Chimaji Aappa", Jai "Vasai"
पोर्तुगीजांच्या अत्याचाराचा लेखाजोखा गोवा इंक्विझिशन रेकॉर्ड्स मध्ये आजही पूर्णपणे उपलब्ध आहे परंतु डॉ.पिसुर्लेकार ह्यांनी त्यातील ठराविक गोष्टीच प्रकाशित केल्या आहेत.. भारतीय इतिहासकरांनी इतिहासातील घटनांमुळे भविष्यात वाद व पेच प्रसंग उद्भवू नयेत म्हणून हे ऐतिहासिक दस्तावेज बंद करून गोवा आर्काइव्ह्स मध्ये ठेवेले आहेत..
हि सहिष्णू भावना स्वयंघोषित इतिहास अभ्यासकांनी न ठेवता वसईच्या विजयाला कराराचं रूप देऊन इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न केला.. असेच प्रयत्न विद्यमान काळातही सातत्याने होताहेत.. हे लक्ष देण्यासारखी बाब आहे.. म्हणूनच इतिहासातील लेखी पुरावे आणि दस्तावेजांच जतन आणि अभ्यास होणं गरजेच आहे.
Very well written!!!
खुप छान माहिती आणि विश्लेषण, चिन्मय. धर्मनिष्ठा देशावरील निष्ठेपेक्षा मोठी झाली काय होते हे पाकिस्तान आणि इतर काही देशांची जी काही परिस्थिति झाली आहे त्यावरून आपण शिकावे.
बाकी विजयदिन जरूर साजरा करावा पण त्याआधि लाखो रुपये उधळणा-यांनी खालील काही मुद्द्यांंवरदेखिल थोडा विचार करावा.
'वसई विजयोत्सव' ह्या 'सोहळ्यावर' मी काही वर्षांअगोदर दिलेली प्रतिक्रिया...
आहे अभिमान आम्हा शिवरायांचा नी मराठ्यांचा,
इंच इंच जमिनीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या मावळ्यांचा.
पावनखिंड लढवून शिवरायांना वाचवणाऱ्या बाजीप्रभूंचा,
नी एकही लढाई न हरणाऱ्या बाजीराव पेशव्यांचा.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांचा,
नी मार्सेलिसच्या समुद्रात उडी घेणाऱ्या सावरकरांचा.
तर मग नक्कीच अभिमान आहे अटकेपार झेंडे रोवणाऱ्या पेशव्यांचा,
नी वसई सर करणाऱ्या चिमाजी अप्पांचा.
मला वाटतं......
स्वातंत्र्यदिवस नी विजयदिवस जरूर साजरे करावेत,
पण त्याआधी काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे प्रयासदेखील करावेत.
खरोखरच आहे का नैतिक अधिकार आम्हाला विजयोत्सव साजरा करण्याचा?
आहे का अधिकार चिमाजी अप्पांची वहाण तरी उचलण्याचा?
आहे का अधिकार?
सार्वजनिक सोयी-सुविधांचा बोजवारा उडालेला असताना,
उन्मादाने लक्ष-लक्ष उधळण्याचा.
आहे का अधिकार?
एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना पाण्याबाबत वसई सुशेगात म्हणण्याचा,
कोर्टाच्या फेऱ्यात सापडलेल्या गावांना सापत्न वागणूक देण्याचा.
आहे का अधिकार?
वर्षानुवर्ष जुने वृक्ष तोडून भकास नावाचा विकास करण्याचा, ४ चा F.S.I. लावून २२ मजली towers बांधण्याचा.
आहे का अधिकार?
झुंडीने जमिनी घेऊन concrete jungle उभारण्याचा,
माझ्या हिरव्यागार वसईला मोगलाई असल्यागत लुटण्याचा.
शोधणार आहोत आम्ही ह्याची उत्तरं? की धरणार आहोत हात....
आपल्यापुरती विकासाची बेटं तयार करणाऱ्यांचा,
काही बंदरांच्या विकासासाठी बंदराचा विकास करू पाहणाऱ्या बंदरांचा?
सुनिल डि'मेलो
०५ मे २०१२
महापालिका वसई विजयोत्सवाला भव्य स्वरूप देऊन, सर्व जातिधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन साजरा करीत आहे हि खुप चांगली गोष्ट आहे. मराठ्यांनी युरोपियम सत्तेविरूद्ध मिळवलेला पहिलाच विजय होता.यानंतर सव्वाशे वर्षानंतर दुसरा युरोपियम सत्तेविरूद्धचा उठाव (1857 चा राष्ट्रीय उठाव ) झाला होता.वसईचा रणसंग्रामानंतरचा विजय हा २२००० मराठी सैन्याच्या रक्ताने लिहिला गेला.हा विजय प्रत्येक भारतीयाला स्फुर्ती देणारा आहे.किंबहुना त्यामुळेच इंग्रजांविरूद्धच्या लढ्याला आपल्याला अधीक बळकटी मिळाली.
महापालिका वसई विजयदिन साजरा करीत असेल तरी या विजयदिनाचा पुर्वइतिहास लोकांपर्यंत पोहचवणे फार गरजेचे आहे.उगाच विजयोत्सवाबद्दल लोकांचे मन कलुषीत करून या उत्सवावर बंदीची मागणी करण्यापेक्षा,हा विजयोत्सव सर्व धर्मीयांसाठी एकोप्याचा मेळावा कसा होऊ शकेल याबाबत अधीक विश्लेषण करणे गरजेचे आहे.
तुर्तास सर्व वसईकरांना २७९ व्या वसई विजयोत्सवाच्या शुभेच्छा...
जय वज्राई...जय चिमाजी
Masta
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home