Skip to main content

उत्तम आणि समाधानकारक करियर कसे निवडाल ?

नमस्कार मित्रांनो . उत्तम आणि समाधानकारक करियर कसे निवडावे याबद्दल थोडी मांडणी करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न :-)

जर तुम्ही हा लेख अशा अपेक्षेने वाचायला  सुरुवात केली असेल की मी
तुम्हाला आज हमखास नोकरी आणि पैसे देणार करिअर क्षेत्र सांगणार आहे
आणि तुमच्या मुलांना अमुक-तमुक कोर्स केला की गलेलठ्ठ पगाराची नोकरी
लागेल याचे मार्गदर्शन करणार आहे तर कृपया हा लेख वाचणं
आताच बंद करा :-)




आपण या लेखांमध्ये आज करियर निवडताना मुलांनी आणि पालकांनी नक्की कसला विचार केला पाहिजे याबद्दल चर्चा
करणार आहोत आणि बऱ्याच पालकांना कदाचित ते आवडणार सुद्धा नाही . मला असे अनुभव आहेत की त्यांच्या दहावी
किंवा बारावी झालेल्या मुलाला अथवा मुलीला पालकांनी माझ्याकडे आणलं आणि त्यांची अपेक्षा अशी होती की मी त्यांना
इंजिनीअरिंग किव्वा आय टी क्षेत्रातील करियर कसे चांगले हे सांगून  इंजिनीअरिंगचा कोर्स करायला सांगेन . पण त्यांचा
भ्रमनिरास झाला आणि मी मात्र केवळ त्या विद्यार्थ्याला लॉजिकली विचार कसा करायचा हे शिकवायचा प्रयत्न केला

जेव्हा पालक त्यांच्या मुलांना घेऊन माझ्याकडे येतात आणि म्हणतात “याला जरा गाईड करा हो की हल्ली कशाला
जास्त “स्कोप” आहे “ … मी त्यांना एक प्रश्न विचारतो “स्कोप “  म्हणजे नक्की काय हो ? 90 टक्के वेळा स्कोप म्हणजे
महिन्याला लाखो रुपये देणारी गलेलठ्ठ पगाराची नोकरी एवढेच पालकांचं म्हणणं असतं पण आपल्या मुलाला काय आवडते ?
आपल्या मुलाला एखादी गोष्ट झेपेल का ? त्यासाठी करावे लागणारे कष्ट  आणि काही विशेष कोर्सेस निवडले तर त्यासाठी
येणारा खर्च यासाठी आपली आणि आपल्या मुलाची तयारी आहे का याबद्दल जाणून घेण्यात त्यांना काहीही इंटरेस्ट नसतो.  
आणि म्हणूनच मी विचार केला की या बद्दलचे माझे विचार या लेखातून मांडावेत . दहावी आणि बारावीचे निकाल लागलेले
आहेत आणि पालकांची करिअर निवडीसाठी आणि कोर्स निवडीसाठी फार धावपळ चालू आहे .

परंतु मी मात्र म्हणेन की  कुठल्याही कोर्सला ऍडमिशन घेण्याआधी खालील मुद्द्यांवर आपल्या मुलांसोबत बसून नीट
विचार करा ,चर्चा करा आणि मगच ठरवा करिअर कुठे करायचं !


१. पॅशन : ( आपली आवड) :

करियर निवडताना आपण भारतीय बऱ्याच वेळा आपल्या आवडी निवडीला काहीच महत्त्व देत नाही याचे कारण असे असेल
की आपल्याला लहानपणापासून शिकवले असतं की आपण सर्वात “ पुढे जायला पाहिजे “ आणि आपल्यासारख्या अचाट
लोकसंख्येच्या देशांमध्ये “ पुढे जाणं”  म्हणजे वर्गांमध्ये अभ्यासात पहिले येणे . पुढे जाणं म्हणजे कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्यू
मध्ये सर्वात चांगली नोकरी पटकावणे ! आपल्या टिपिकल मराठी मध्यमवर्गीय व्याख्येमध्ये पुढे जाणं म्हणजे अभ्यासात पुढे
जाणे असत. आपल्याला चित्रकला आवडत असेल, आपल्याला खेळ आवडत असतील किंवा आपल्याला समाजसेवा  
आवडत असेल तरी तरी या क्षेत्रांमध्ये तुम्ही कितीही मेहनत केलीत तरी समाज तुम्हाला यशस्वी समजत नाही.
आणि आपल्या देशांमध्ये काही प्रमाणात अशा क्षेत्रांमध्ये पुढे जाणं थोड कठीण असतं असाही एक समज आहे .
लोकसंख्येमुळे स्पर्धा खूप आहे ,खेळ कला यासाठी चांगल्या सोयी सर्व ठिकाणी नाहीत त्यामुळे सर्वच क्रिकेटवेडी मुले
सचिन तेंडुलकर बनू शकत नाहीत, उत्तम बॅडमिंटन खेळणाऱ्या  सर्व मुली सायना नेहवाल /सिंधू बनत नाहीत अथवा सुंदर चित्र
काढणारी सर्व मुले एम एफ हुसेन बनू शकत नाहीत. यात काही अंशी तथ्य आहेच पण म्हणून  ज्यांना कला आणि क्रीडा
क्षेत्रांमध्ये गती  आहे त्या सर्वांनी आपापली स्वप्ने गुंडाळून ठेवून इंजिनिअर /डॉक्टर/ वकील किंवा सीए व्हावे असेही
 नाही.



करियर निवडताना असा विचार करा की तुम्हाला रोज आठ ते दहा तास एखादे काम करायचय आणि  आणि पैसा यामध्ये
महत्त्वाचा नाहीच आहे.  काय बरं तुम्हाला  आवडेल तुम्हाला करायला? मनाविरुद्ध आठवड्याचे ४० तास काम करून सुखी
रहाल ? क्रिकेट चे उदाहरण घेतले तर आज वर म्हटल्याप्रमाणे सगळेच सचिन नाही झाले तरी स्थानिक आणि राष्ट्रीय
पातळीवर विविध स्पर्धा आहेतच ! आय पी एल सारख्या स्पर्धेत खेळणारे सगळेच भारतीय संघात खेळत नसतील पण
बक्कळ पैसे मात्र नक्कीच मिळवतात . स्पोर्ट्स कोट्यामधून रेल्वे,राज्य आणि केंद्र सरकार,विविध बँका इत्यादी मध्ये
अजूनही नोकऱ्या मिळतात .

अभिनयाची आवड असेल तर सध्या असलेले भरपूर टी व्ही चॅनेल्स वरच्या  डेली सोप्स आणि नवीन आलेले वेब सिरीज
/OTT ऍप्स मध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत .अगदी सुपरस्टार झाला नाहीत तरी घर चालविण्यापुरते पैसे नक्की मिळवू
शकाल .

सामाजिक सेवेची आवड असेल आणि लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी अभ्यास आणि अफाट वाचन करण्याची
तयारी असेल तर राज्य आणि केंद्र सरकारात अधिकारी बनून टेचात समाजसेवा करू शकता ! किंवा  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ
सोशल सायन्सेस सारखे कोर्स करून विविध आघाडीच्या समाज सेवी संस्थांमध्ये पगारी समाजसेवा सुद्धा करू शकता .

सांगायचा मुद्दा हा की नवीन अर्थव्यवस्थेमध्ये संधी भरपूर उपलब्ध आहेत आणि एखाद्या गोष्टीची तुम्हाला खूप आवड असेल
तर त्या क्षेत्रात मेहनत करून करियर नक्की करू शकता !

२. उद्योजक ,व्यावसायिक की नोकरी ?

साधारण वयाच्या १६ व्या वर्षापर्यँत म्हणजे दहावी उत्तीर्ण होई पर्यंत , प्रत्येक मुलाचे अथवा मुलीचे व्यक्तिमत्व कसे आहे
याबद्दल त्यांना स्वतःला आणि पालकांना थोडीफार कल्पना आली असते . म्हणजे मुलाला स्वतः हुन काही गोष्टी पुढाकार
घेऊन ,नेतृत्व घेऊन करायला आवडतात की तो एक उत्तम टीम मेम्बर आहे हे साधारणतः समजते . तसच व्यवसाय करीत
असताना उद्योजकांना अनिश्चितता नेहमीच साथ करीत असते .आपल्या मुलाला अथवा मुलीला अनिश्तिततेशी सामना
करता येतो का ?जरा अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न अथवा प्रकल्प शिक्षकांनी करायला सांगितलं तर ती त्यात गडबडून
जाते की आपणहून अवांतर वाचन करून /इतर विद्यार्थी/पालक/शिक्षक वगैरेंशी चर्चा करून तो प्रश्न सोडवते ?




सतत नवीन गोष्टी शिकण्याची ,नवीन मित्र जोडायची आवड आहे का ? वृत्तपत्रातील बातम्या वाचणे ,अर्थव्यवस्थेवर चर्चा
करणे आवडते का ?व्यक्तिमत्व बंडखोर आहे की “कन्फर्मिस्ट” आहे ? या सर्व मुद्द्यांचा विचार करून मुलीला व्यावसायिक
( CA ,वकील इत्यादी ) होणे जमेल की उद्योजक होणे झेपेल याचे साधारण ठोकताळे बांधता येतील . अर्थात उद्योजक
होण्याचा हमखास यशस्वी फॉर्मुला नाही आणि शालेय जीवनात धडाडी दाखवणारा प्रत्येक मुलगा पुढे उद्योजक होईल
आणि एखादा अबोल आणि आज्ञाधारक मुलगा आयुष्यभर नोकरीच करेल असेही नाही . पण जस म्हणतात ना की
“बाळाचे पाय पाळण्यात दिसतात “, तसंच काहीस आपल्याला एकंदरीत स्वभावावरून स्वयं रोजगार की नोकरी हे ठरविता
येईल .

जर मुळात कुणाच्या हाता खाली काम करण्याचे स्वभावात नसेल तर मनाविरुद्ध नोकरी करून रोज बॉसशी भांडण्यापेक्षा
स्वयं रोजगाराचा विचार करावा हे उत्तम . परंतु नोकरी मध्ये मिळणारे स्थैर्य ,महिन्याच्या म्हणायला नक्कीच मिळणारा पगार
हे सर्व उद्योग/व्यवसायात नसत .आपणच मेहनत करून आपला मार्ग शोधायचा असतो याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे .

त्यामुळे दहावी/बारावी नन्तर नोकरी करायची नसेल आणि उद्योग धंदा करायचा असेल तर विद्यापीठीय शिक्षणाच्या
आणि पदव्या मिळविण्याचा भानगडीत न पडता ,कौशल्य विकास ,नवीन गोष्टी शिकणे ,प्रवास करणे,आजच्या जगात
समाजाला नक्की कसली गरज आहे याचा मार्केट सर्व्हे करणे यास महत्व देता येईल . आज इंजिनियर आणि एम बी ए ज
पैशाला पासरी मिळतील पण वेळेला लागला तर प्लम्बर आणि इलेक्ट्रिशियन मिळत नाही ! वाढत्या लोकसंख्येला आणि
फास्ट जीवनशैलीला साजसें व्यवसाय केलेत तर पैसा आपसूक मिळेल . आज शहरात उत्तम आणि घरघुती चव देणारे पोळी
भाजी केंद्र /मुलांची योग्य काळजी घेणारे हायजिनिक पाळणाघर जरी सुरु केलेत तरी खोऱ्याने पैसे मिळू शकतील कारण
आजच्या समाजाच्या या गरजा आहेत आणि गरजेचे पोटेन्शिअल जो टॅप करेल तो खरा सिकंदर .

आज मोठ्या शहरातला वडा पाव वाला सहज महिन्याला ५०-६० हजार रुपये कमवतो पण इंजिनियर झालेली मुलं
१० हजारावर नोकऱ्या करतात . श्रम प्रतिष्ठा जपायला शिकलात तर कुठलंच काम हलकं नाही . पालकांनी सुद्धा अमुक
काम वाईट आणि तमुक काम चांगलं हा दुराग्रह सोडायला हवा .

व्यावसायिक शिक्षण घ्यायचे असेल तर वकिल,CA ,टॅक्स कन्सल्टन्ट , अक्चुअरीज ,आर्किटेक्चर असे अनेक पर्याय आहेत .
ज्यात तुम्ही स्वतः ची प्रॅक्टिस सुरु करू शकता .त्या त्या विषयात तद्न्य व्हा .

३. जीवनशैली कशी हवी ?

मी आज जेव्हा मुलांशी बोलतो तेव्हा त्यांना हा प्रश्न जरूर विचारतो . “सुखी ,समाधानी आयुष्याची “ त्यांची व्याख्या काय ?
कारण प्रत्येक नोकरी /व्यवसाय /उद्योग यांचे एक लाइफस्टाइल पोटेन्शियल असते .म्हणजे उदाहरणार्थ सरकारी नोकरी
केलीत आणि IAS वगैरे झालात  तर सरकार तर्फे नोकरीत असेपर्यंत घर मिळेल ,एखादी सरकारी गाडी आणि ड्रायव्हर
पण मिळेल . पण तुमची स्वप्न ६० लाखाची मर्सिडीज विकत  घेण्याची आणि विमानाच्या बिझनेस क्लास ने दर सुट्टीत
स्वित्झर्लण्ड ला जाण्याची असतील तर सातवा काय अगदी विसावा वेतन आयोग आला तरी तुमच्या सरकारी पगारात ते
शक्य नाही . अर्थात यात हे गृहीत धरलय की तुम्ही भ्रष्टाचार करणार नाही :-) पण याच नोकरी मध्ये मिळणारी पॉवर /प्रतिष्ठा
आणि प्रत्यक्ष लोकांचे जीवन सकारात्मक पणे बदलण्याची संधी आणि अनुभव खाजगी नोकरीत मिळणार नाही !




त्यामुळे तुम्हाला नक्की कसं जगायचंय हे ठरवा ! कुणाला शिक्षक व्हायचे असेल आणि मुलांना शिकविण्यात आनंद
मिळत असेल तर अपेक्षेएवढा पगार न मिळता सुद्धा त्यात आपला आनंद मानायची तयारी असेल तर तुम्ही निर्वाण
अवस्थेला पोहोचलात समजा :-)

याउलट तुम्ही अति उच्च शिक्षण घेऊन खाजगी बहुराष्ट्रीय कम्पनी मध्ये CEO बनलात आणि तुम्हाला गावातील शांत
जीवनशैली जगायची असेल तर ते शक्य नाही हेही तेव्हढंच खरं ! तिकडे पैसे भरपूर मिळतील पण वेळ नाही मिळणार !
वैद्यकीय क्षेत्रात गेलात तर समाजात मान ,चांगला पैसा मिळेल पण रात्री बेरात्री पेशन्ट ला इमर्जन्सी आली तर त्याच्या
वर उपचार करायला सज्ज व्हावंच लागेल हे पण लक्षात घ्या ! बोटीवर नोकरी करायला गेलात तर सहा सहा महिने समुद्रावर
कुटुंबापासून दूर रहावे लागते याचीही तयारी ठेवा .

फिल्म स्टार व्हायचे असेल तर आपल्या आरोग्याची,दिसण्याची फार काळजी घ्यावी लागते आणि वजन वाढू नये म्हणून
जिभेवर सुद्धा कंट्रोल ठेवावा लागतो ,फिटनेस रुटीन पाळावे लागते . पडद्यावर ग्लॅमरस दिसणारे तारे वैयक्तिक आयुष्यात
मात्र या क्षेत्रातील स्पर्धेमुळे सदैव तणावाखाली आणि असुरक्षित असतात .तो स्ट्रेस आपल्याला जमेल का याचाही विचार
करा .

त्यामुळे आपल्याला काय आणि कस जगायचंय हे प्रथम ठरवा . प्रत्येक व्यवसाय,नोकरी ,धंदा आपल्यासोबत काही
युनिक चॅलेंजेस घेऊन येतो त्याबद्दल त्या त्या क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा करा .केवळ ग्लॅमर ला भुलून करियर निवडू नका .





या जगात यशस्वीतेची व्याख्या म्हणजे भरपूर पैसे कमावणारा आणि त्यामुळे समाजात कॉलर टाईट असणारा हीच नसून
आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी जे करियर तुम्हाला योग्य वाटेल त्याकडे जा . कुणाला नकोही असते मर्सिडीज
आणि असतातही काही जण समाधानी रिक्षाने जाऊन येऊन . पैशाचे गुलाम होऊ नका .आपली जीवनशैली आपण निवडा .

आणि पैसाच जर महत्वाचा असेल तर “ सोमवार ते शुक्रवार मनाविरुद्ध आवडत नसणारे काम करीन पण पैसे कमवून
विकेंड ला आणि सुट्टीत खर्च करीन “ असा मध्यममार्ग घेणारे सुद्धा बरेच जण आहेत .पण मग त्याला “करियर” करणं न
म्हणता “अडजस्टमेन्ट” असं म्हणता येईल . आठवड्याचे पाच दिवस दुःखी राहून विकेंड चे दोन दिवस सुखात जगायचं की
आवडत काम करून नेहमीच आनंदी रहायचं ?तुमचं तुम्ही ठरवा

४. देशात रहायचे की परदेशात

जीवनशैली आणि आवड यांची सांगड घालणारा हा एक अजून मुद्दा महत्वाचा  आहे .काही विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्याचे
आणि तिकडेच नोकरी करण्याचे आकर्षण असते . पण परदेशात सेटल होणे आज पूर्वीसारखे सोपे राहिले नाहीये .
परदेशांत शिक्षणासाठी जास्त खर्च येतो आणि जर तिकडेच परकीय चलनात पगार देणारी नोकरी मिळाली नाही तर भारतात
परत येऊन मिळणाऱ्या पगारात घेतलेले एज्युकेशन लोन फेडणे महाकर्मकठीण काम असते .(अधिक माहितीसाठी या
विषयावरचा माझा लेख वाचण्यासाठी इकडे क्लिक करा ) तसेच परदेशातून अगदीच काही विशेष पात्रता कमावली नाहीत
अथवा नामवंतविद्यापीठातून पदवी घेतली नाहीत तर इकडे केवळ “फॉरेन रिटर्न्ड” म्हणून कोणीही तुम्हाला नोकरीसाठी
विशेष पायघड्या घालत नाहीत . परदेशातील सर्वसामान्य विद्यापीठाची पदवी आणि इकडच्या मुंबई किंवा पुणे विद्यापीठाची
पदवी समकक्षच मानली जाते . उलट काही व्यवसायात जसे की वैद्यकीय व्यवसायात बाहेरच्या देशातून मिळवलेली
वैद्यकीय पदवी भारतात तशीच्या तशी चालत सुद्धा नाही ! इकडे मेडिकल कौंसिल ची कठीण परीक्षा देऊनच भारतात
वैद्यकीय व्यवसायाचा परवाना मिळतो . याचा पण विचार करा .




गल्लो गल्ली बोकाळलेल्या कमिशन बेसिस वर विद्यार्थी जाळ्यात ओढणाऱ्या फॉरेन एज्युकेशन कन्सल्टंट्स च्या नादी लागून
उगाचच UK /US /ऑस्ट्रेलिया /न्यूझीलण्ड आदी देशातील सुमार कॉलेजेस मध्ये प्रवेश घेऊन , ५०-६० लाख रुपये घालवून
एम एस अथवा एम बी ए च्या पदव्यांची भेंडोळी घेऊन परत आलात तर इकडे कुणीही ढुंकून विचारत नाही .
पालकांना मात्र आपली बछडी फॉरेन ला शिकतात म्हणून कोण कौतुक आणि अभिमान वाटतो . पण ते देश शिक्षण झाले
की विद्यार्थ्यांना वर्क परमिट आणि  नागरिकत्व द्यायला सहज तयार नसतात आणि म्हणून विद्यार्थ्यांना इकडे परत यावे लागते
आणि मग बेकारीचा सामना करत करत खूप भ्रमनिरास होतो .कशासाठी एव्हढा अट्टाहास ?

आता याउलट गोष्ट म्हणजे काही विशिष्ठ करियर्स ची देशात असलेली मर्यादित उपलब्धता ! उदाहरणार्थ ,आज तुम्हाला
मूलभूत विज्ञान ,अणू विज्ञान ,अंतरिक्ष विज्ञान किंवा अगदी डेअरी टेक्नॉलॉजी वगैरे क्षेत्रांमध्ये नवीन संशोधन करायचे असेल
तर देशात फार मर्यादित संधी आहेत . अजूनही आपण आय टी मध्ये वगैरे सुद्धा लेबर जॉब्स करतो ,इनोव्हेशन नाही .  
शिकण्यासाठी परदेशा चाच पर्याय उरतो . मग यासाठी असणाऱ्या प्रवेश परीक्षा ,लागणारी  रेफरन्स लेटर्स ,स्टेटमेंट
ऑफ पर्पज वगैरेची माहिती घ्या .

सारांश :

मागच्या पिढीने जास्त विचार न करता पटापट मिळेल ते शिकून मिळेल ती नोकरी पटकावली आणि आयुष्यभर
पाट्या टाकत निभावून नेले . पण त्यांच्या या मेहनत आणि त्यागामुळे आजच्या पिढीला किमान आर्थिक स्थैर्य आहे .
मग या पिढीने थोडी कॅल्क्युलेटेड रिस्क का घेऊ नये ? थोडी ट्रायल एरर का करून बघू नये ? वयाच्या सोळाव्या वर्षी
दहावी,अठराव्या वर्षी बारावी,एकविसाव्या वर्षी पदवी आणि मग नोकरी याच चक्रात का अडकावे ? वर नमूद केलेल्या
चार मुद्य्यांवर सखोल चर्चा करून ,कागदावर आपल्याला यातले काय आवडते ?काय जमेल ? कुठे रहायचे आहे
आणि कशी जीवनशैली जगायची आहे याचा एक आराखडा मुलांनी आणि पालकांनी एकत्र बसून बनवला आणि मग
त्या त्या क्षेत्रातील जाणत्या व्यक्तींशी बोलून करियरची डोळस निवड केली तर ?



लेख आवडला तर प्रतिक्रिया नक्की कळवा . आणि लेखकाच्या नावासकट शेअर नक्की करा :-)

( लेखातील सर्व इमेजेस गुगल इमेज सर्च वरून साभार आणि स्वामित्व हक्क त्या त्या वेबसाईट कडे सुरक्षित. )


- चिन्मय गवाणकर
वसई
chinmaygavankar@gmail.com

Comments

Unknown said…
Very nice Chinmay. You have covered most important concerns and point while selecting career in this article .
Students and parents must realize and consider these points which are definitely more useful in long run for successful life.

Popular posts from this blog

आय टी चे मृगजळ : काय सत्य काय असत्य !! मराठी पालकांनी करावे तरी काय ?

( प्रस्तुत लेखक स्वतः एका बहुराष्ट्रीय आय टी कम्पनी मध्ये कार्यरत असून ,या क्षेत्राचा १५ वर्षे अनुभव आहे .लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत. काही मुद्दे कठोर भाषेत मांडले आहेत .यात कुठल्याही व्यवसायाचा अथवा व्यावसायिकाचा वैयक्तिक उपमर्द करण्याचा हेतू नाही .आपल्या मुलाला अथवा मुलीला "आय टी " क्षेत्रात पाठवायला बघत असाल तर नक्कीच वाचा आणि आपल्या पाल्याला वाचायला द्या .लेखाचा विषय तांत्रिक असल्याने जिकडे योग्य मराठी प्रमाण प्रतिशब्द मिळाले नाहीत तिकडे मूळ तांत्रिक संज्ञा वापरल्या आहेत ) आय टी  चे मृगजळ : काय सत्य काय असत्य  सध्या वर्तमानपत्र उघडले की आय टी क्षेत्रात मंदी आहे आणि हजारो लोकांचे रोजगार जाणार अश्या बातम्या दिसतात . अमेरिकेने आणि इतर देशांनी व्हिसा चे नियम कडक केले असल्याने भारतीय आय टी प्रोफेशनल्स च्या बऱ्याच संधी जाणार अशी ओरड सुद्धा दिसते . या दोन्ही मुद्द्यात नक्कीच तथ्य आहे .पण यासाठी सरसकट आय टी कम्पन्यांना किंवा अमेरिकन सरकार ला व्हिलन बनविण्याआधी काही बाबींचा सर्वांगीण परामर्श घेणे गरजेचे आहे .आपल्या आय टी क्षेत्रा बद्दलच्या क...

The Crazy Airline Pilot

Hi The great Sarkari Indian Airlines (Now Air India) has done it again!They took passengers ransom for their own mistakes and tantrums yesterday on IC 164 from Goa to Mumbai. I was the one who praised Indian Airlines when they did a fantastic job during the employee strike recently in June earlier this year.(Please refer to my Articles published in DNA newspaper on 15th June 2007 titled "Hats off to Indian Spirits" and in Hindustan Times the same day titled "Indian did a good job" ) However sunday's episode raises serious doubts on Indian Airlines' ability to perform as "customer caring /serving entity". It was a lazy Sunday afternoon (11th November 2007) in Goa and most of the Travellers were returning to their home destinations after spending a diwali holiday (being a long weekend) in Goa.Everyone had to join their offices/business the next day and hence preferred afternoon flights to go back which gives a relaxing evening at home before anothe...

मराठी माणसाला काय येत नाही !!

मराठी भाषा दिन अथवा महाराष्ट्र दिन असला की काही टिपिकल मेसेजेस व्हाट्सअप वर फिरू लागतात.त्यातलाच एक मेसेज म्हणजे "मराठी माणसाला काय येते " ! थोर व्यक्तींची नावे घेऊन ,मराठी माणसाला हिंदवी स्वराज्य स्थापन करता येते / राज्यघटना लिहिता येते /मराठी माणसाला भारतीय असंतोषाचे जनक होता येते / मराठी महिलेला राष्ट्र्पती होता येते /मराठी क्रिकेटपटू विश्वविक्रमवीर होतो /मराठी माणसाला अमुक येते आणि तमुक येते ..वगैरे वगैरे लिहून "अभिमान आहे मराठी असल्याचा" ची फुशारकी मारली जाते .हे जे कोणी "थोर" असतात ते फक्त  "मराठी" म्हणून नव्हे तर आपल्या अंगभूत गुणांनी आणि परिश्रमाने मोठे झालेले असतात . पण आपण मात्र त्यांना फक्त "मराठी" लेबल चिकटवून फुशारक्या मारतो .  ठीकाय ...आपल्या भाषेचा /राज्याचा /संस्कृतीचा /थोर महापुरुषांच्या कार्याचा अभिमान असणे यात वाईट काहीच नाही . पण हे सर्व करताना आजचा मराठी समाज कसा आहे याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे केवळ आपल्या गौरवशाली इतिहासाच्या रम्य कथांमध्ये रमणाऱ्या  आणि आपल्या वर्तमानाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ...