Skip to main content

मराठी माणसाला काय येत नाही !!



मराठी भाषा दिन अथवा महाराष्ट्र दिन असला की काही टिपिकल मेसेजेस व्हाट्सअप वर फिरू लागतात.त्यातलाच एक मेसेज म्हणजे "मराठी माणसाला काय येते " ! थोर व्यक्तींची नावे घेऊन ,मराठी माणसाला हिंदवी स्वराज्य स्थापन करता येते / राज्यघटना लिहिता येते /मराठी माणसाला भारतीय असंतोषाचे जनक होता येते / मराठी महिलेला राष्ट्र्पती होता येते /मराठी क्रिकेटपटू विश्वविक्रमवीर होतो /मराठी माणसाला अमुक येते आणि तमुक येते ..वगैरे वगैरे लिहून "अभिमान आहे मराठी असल्याचा" ची फुशारकी मारली जाते .हे जे कोणी "थोर" असतात ते फक्त  "मराठी" म्हणून नव्हे तर आपल्या अंगभूत गुणांनी आणि परिश्रमाने मोठे झालेले असतात . पण आपण मात्र त्यांना फक्त "मराठी" लेबल चिकटवून फुशारक्या मारतो . 





ठीकाय ...आपल्या भाषेचा /राज्याचा /संस्कृतीचा /थोर महापुरुषांच्या कार्याचा अभिमान असणे यात वाईट काहीच नाही . पण हे सर्व करताना आजचा मराठी समाज कसा आहे याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे केवळ आपल्या गौरवशाली इतिहासाच्या रम्य कथांमध्ये रमणाऱ्या  आणि आपल्या वर्तमानाकडे दुर्लक्ष करणाऱ्या समाजाला उज्जवल भविष्य असूच शकत नाही . पुढे नमूद केलेल्या मुद्द्यांना काही सन्माननीय अपवाद नक्कीच आहेत .पण सदरचे निरीक्षण कॉर्पोरेट तसेच सामाजिक क्षेत्रातील दीड दशकाच्या स्वानुभवावरून नोंदवित आहे .यात कुठल्याही समाजाला बदनाम करण्याचा हेतू नसून केवळ एक आरसा दाखविणे आहे 

"मराठी माणसाला काय येत नाही " याबद्दल सुद्धा आता थोडी चर्चा करूया  :


१. आजच्या मराठी  तरुणाईला सहसा  प्रतिकात्मकतेच्या बाहेर पडून मूलभूत काम करणे जमत नाही :


आज महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यात  गावच्या नाक्यावर /एस टी स्टॅन्ड वर / चहा टपरी /तालमी वगैरे ठिकाणी तिशीतल्या  रिकामटेकड्या तरुणांच्या भरपूर टोळ्या दिसतात . कोणीतरी यावर एक सुंदर लेख लिहिला होता जो मला व्हाट्सअप वर आला होता.लेखकाचे नाव आठवत नाही . यांना दिवसभर टवाळक्या करीत  स्थानिक आणि अगदी इंटरनॅशनल राजकारण ,खेळ वगैरे वर चर्चा करणे फार आवडते . पण या चर्चातून काही विधायक कार्य करावे असे फार कमी जणांना वाटते .वर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवली ,चंद्रकोरीचा टिळा लावला आणि उठता बसता " जगदंब " किंव्वा "जय महाराष्ट्र" म्हटल्याने महाराज होता येत नाही .महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ वयाच्या १६ व्या वर्षी मूठभर मावळ्यांना घेऊन रोवली आणि आमचे हे तिशीतले घोडे  आज केवळ फॅशन म्हणून महाराजांचा वापर करतात .!




१० मराठी पोरं एकत्र जमली तर फार तर दही हंडी सुरु करतील किंव्वा एक गणपती बसवतील आळीत . पण मूलभूत सामाजिक कार्य करणारे / उद्योजकता विकास व्हावा म्हणून झटणारे तरुण फारच कमी . 

गावचा सरपंच /आमदार /सहकारी संस्थेचे संचालक वगैरे कोणी मोठे " झाड" पकडून रहायचं आणि फुशारकी मारायची हे यांचे जीवितकार्य ! राजकारणी माणसे धूर्तपणे गरज असे पर्यंत यांना वापरतात आणि मग खड्यासारखे बाजूला फेकतात .तो पर्यंत चाळीशी आली असते आणि हातात काही काम नसते ! ना कुठले कौशल्य शिकून झालेले असते जे यांचे पोट भरायला मदत करेल ! 

राजकारणात पडलेले तरुण सुद्धा "धंदा" काय करतात ? तर नगरपालिका /जिल्हा परिषदे मध्ये रस्ते आणि गटारांची बांधकाम कंत्राटे घेणे !यात यांचे नॉलेज असते शून्य पण कुठल्या साहेबाला कसे "पटवायचे" हे मात्र बरोबर समजते . हीच हुशारी इतर उद्योग धंद्यात मात्र दिसत नाही .


२. मराठी माणसाला धड  उद्योग  धंदा करता येत नाहीच पण कॉर्पोरेट क्षेत्रात मिळेल  ती नोकरी पत्करून अनुभव घेणे सुद्धा आवडत नाही ! 


काही सन्माननीय अपवाद सोडले तर मराठी माणसाला उद्योग धंदा करताच येत नाही .याची अनेक कारणं आहेत . सर्वात मोठे कारण म्हणजे मराठी माणसामध्ये असलेला "मोडेन पण वाकणार नाही " असा असलेला वृथा बाणा ! बिझनेस करताना थोडे फार लवचिक असावे लागते . गोड बोलून,डोक्यावर बर्फ ठेवून वागावे लागते . पण आम्ही मात्र "एक घाव दोन तुकडे" करणारे ! जे पटणार नाही त्यात फटकन बोलून मोकळे होणारे ! मग कुणी दुखावले /नाराज झाले तरी फिकीर नाही . हीच अडचण नोकरी बाबत ! इकडे आपल्या "पे डिग्री" चा वृथा अभिमान आडवा येतो  ! " आमचे आजोबा ब्रिटिश काळात फायनान्स ऑफिसर होते ! आम्ही इस्त्रीचा धंदा कसा काय करणार ! " किंवा  " अमुक तमुक संस्थानिकांना सुद्धा कर्ज देणारं आमचं घराणं ! .आहात कुठं ? आमचा बंडू नाही बुवा करणार ती "फालतू" ( ! ) १५ हज्जार देणारी नोकरी ! " ," पोरीला घरी बसवीन पण इव्हेंट मॅनेजमेंट कम्पनी मधली नोकरी करून देणार नाही ! रात्री बेरात्री घरी येईल ..लोक काय म्हणतील ! " ..असले संवाद आपण नेहमी ऐकले असतील ! या मध्ये मुले शिकून सुद्धा नुसती घरी बसतात . या उलट इतर राज्यातील तरुण पडेल ती नोकरी घेऊन लाख मोलाचा जीवनानुभव मिळवतात ! हळू हळू कॉर्पोरेट लॅडर चढतात ! योग्य वेळी कधी कधी आपला स्व-रोजगार सुद्धा शोधतात ! 

आयुष्यात कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली तर  माणूस खूप पुढे जाऊ शकतो .पण काही करायचेच नाही आणि व्यवस्थेला शिव्या द्यायच्या तर आपलेच नुकसान होते 


३. मराठी माणसाला "बिझनेस नेटवर्किंग " जमत नाही ! 


फेसबुक आणि व्हाट्सअँप वर पडीक असणारे तरुण त्या आभासी जगात रमतात !पण विविध क्षेत्रात काम करताना आपण ज्यांना भेटतो त्यांना आपल्या "नेटवर्क" मध्ये सामावून घेण्याची कला फार थोड्यांना जमते ! आजच्या जगात कोण कधी कसा उपयोगी पडेल आणि कोणाची आपल्याला करियर मध्ये अथवा अगदी वैयक्तिक आयुष्यात कधी मदत लागेल याचा नेम नसतो . पण भेटलेल्या माणसाच्या क्षेत्राबद्दल जुजबी माहिती करून घेणे ,असल्यास आपले विझिटिंग कार्ड एक्सचेंज करणे ,लिंक्डइन सारख्या प्रोफेशनल नेटवर्क वर त्यांना "ऍड" करणे ,वगैरे फार कमी तरुण करतात . विविध इंडस्ट्रीयल प्रदर्शनांना भेट देणे ,सध्या कुठल्या क्षेत्रात चलती आहे याचा अंदाज घेऊन एखाद्या कम्पनीची डिस्ट्रिब्युटरशीप घेऊन बघणे ,चार मित्र एकत्र येऊन एखादा पार्ट टाइम लघु उद्योग करून बघणे वगैरे मराठी तरुण अभावानेच करताना दिसतात . आपली "बिझनेस" ची उडी वडा पाव /पाव भाजी ची गाडी अथवा दिवाळी मध्ये होलसेल ने फटाके आणून रिटेल मध्ये विकणे याच्या पुढे जात नाही . 

होलसेल मार्केट मध्ये फिरणे,बिझनेस चे तंत्र समजून घेणे ,इतर समाजातील बिझनेस करणाऱ्यांशी चर्चा करणे हे केल्याशीवाय उद्योजकता विकास होणार  कसा ?

सॅटर्डे/संडे  क्लब ,मराठी उद्योग क्लब वगैरे प्रयत्न नक्कीच सुरु आहेत पण यातून फारसे  नवीन उद्योजक घडताना काही दिसत नाहीत हे पण तितकेच खरे .त्याच त्याच लोकांची कॉन्फरन्स रूम्स मध्ये भरणारी पिकनिक एव्हढेच या "मराठी बिझनेस  क्लब्स" चे आऊटपूट !


४. मराठी माणसाला एकमेकांना धरून पुढे जाणे जमत नाही .


आपल्या मराठी समाजात एकमेकांना पुढे जाण्यात मदत करण्याची वृत्ती फारशी नाहीच . आपला समाज "individual excellence " च्या मागे धावणारा आहे . याउलट गुजराती /मारवाडी/उत्तर भारतीय/दक्षिण भारतीय ..कुठलाही समाज घ्या ." आपल्या " लोकांना नोकरी /उद्योगात मदत करून "समाज" म्हणून उन्नती करून घेण्याची वृत्ती दिसते . एक उत्तर भारतीय  मुंबई मध्ये आला की गावाकडून १० लोकांना घेऊन येतो आणि आपल्या खोलीत राहायला देतो .एखाद्या बँकेमधला दक्षिण भारतीय उच्च अधिकारी आपल्या टीम मध्ये प्रोमोशन्स चा विचार करताना सर्व प्रथम "आपल्या" माणसांना प्राधान्य देतो . एखादा गुजराती शेठ कच्छ च्या छोट्याश्या गावातून आपल्या लांबच्या नात्यामधल्या होतकरू मुलाला मुंबई ला आणून आपल्या धंद्याच्या  सर्व खाचा खोचा शिकवतो आणि तोच मुलगा पुढे जाऊन स्वतः चा धंदा काढून करोडपती होतो .आम्ही मात्र फक्त पदव्या घेऊन बॅंकेतली /आय टी कम्पनीमधली  नोकरी पकडतो आणि बाकी मराठी लोक गेले तेल लावत म्हणून आयुष्य आपल्या कुटुंबापुरते मर्यादित जगतो .

आपले ज्ञान शेअर करावे ,कुणाला तरी "मेंटरींग" करावे असे आपल्या मराठी बॉसेस ना /उद्योगपतींना वाटतच नसावे .



यात अजून एक प्रकार म्हणजे नको तो तत्वनिष्ठपणा ! आपल्याला जास्त भीती असते की मी जर मराठी माणसाला पुढे केले तर लोक मला पक्षपाती म्हणतील ! हे जे कोण "लोक " असतात ते कुणालाच कधीच दिसत नाहीत बरं  का ! .पण प्रत्येक गोष्टीत "लोक काय म्हणतील " असतंच ! परंतु जर आपल्या समोर पूर्णतः सारख्या गुणवत्तेचे दोन उमेदवार असतील आणि आपल्याला त्यातून एकच निवडता येणार असेल तर तो एक उमेदवार मराठी असला तर पक्षपात कसा ? पण माझ्या अनुभवात कित्येक असे प्रसंग पहिले आहेत की  मराठी मॅनेजर्स /बॉसेस या "पक्षपाती" शिक्क्याला घाबरून लायकी असताना सुद्धा मुद्दाम मराठी टीम मेंबर ला प्रमोशन देत नाहीत. इतर बॉसेस मात्र आपल्या बरोबर आपल्या समाजाच्या लोकांना कॉर्पोरेट लॅडर वर घेऊन पुढे जातात .




५. मराठी माणसाला आपल्या क्षेत्रात सदैव अद्ययावत रहाणे जमत नाही आणि आलेल्या संधीचा फायदा घेणे जमत नाही 


सध्या जग इतकं बदलतंय की आजचे ज्ञान उद्या कालबाह्य होतंय . पण मराठी समाजात अजूनही "एकदा नोकरीला चिकटलो की रिटायर होईपर्यंत आजू बाजूला बघायचं नाही की नवीन काही शिकायचं नाही" ही वृत्ती दिसते .एव्हढंच काय तर मुंबई,पुण्याच्या बाहेर जायचं नाही म्हणून प्रोमोशन्स नाकारणारे सुद्धा आहेत ! नवीन काही शिकायचं म्हटलं तर कपाळावर आठ्या येतात . कम्पनीचा नवीन प्लांट उत्तराखंड ला सुरु होतोय आणि तिकडे प्रमोशन घेऊन जाण्यापेक्षा इकडेच दुय्यम काम करायचे आणि मग कम्पनीने तुमची गरज नाही म्हणून काढून टाकले की "आमच्यावर अन्याय झाला" म्हणून गळा काढायचा हे नेहमीचे .तीच संधी इतर समाजाचे लोक घेतात आणि भर भर वर चढतात . आम्हाला मुंबई ,पुणे,फार तर नागपूर चालते आणि त्या नन्तर डायरेक्ट् अमेरिका लागते . भोपाळ /पंतनगर /विशाखापट्टणम /गुवाहाटी/चेन्नई वगैरे नाही जाणार आम्ही ! 

आईन्स्टाईन ने म्हटले आहे की ज्या दिवशी तुम्ही नवीन गोष्टी शिकायच्या थांबवलं त्या दिवशी तुमची मृत्यूची वेळ जवळ येईल !






नवीन शिकण्याची वृत्ती आपल्या बहुतांश मराठी मुलांमध्ये तर अजिबात नाही . नेहमीच्या कामा व्यतिरिक्त एखादे वेगळे काम आले तर मराठी माणूस "हे माझे काम नाही ,मला याचा पगार मिळत नाही " म्हणून बाजूला होतो . उलट इतर समाजाचे तरुण आपल्या कामाव्यतिरिक्त इतर कौशल्ये कशी शिकायला मिळतील याचा नेहमी विचार करीत असतात . 

मराठी तरुणांनी या मुद्यांचा जरूर विचार करावा !हा लेख पटला /आवडला तर कृपया लेखकाच्या नावासकट आणि या ब्लॉग च्या लिंक सकट शेअर करा .आपल्या प्रतिक्रिया खालील दिलेल्या ईमेल वर पाठवा .

चिन्मय गवाणकर ,वसई 

(लेखातील सर्व ग्राफिक्स : इंटरनेट वरून गुगल इमेज सर्च मधून साभार .स्वामित्वहक्क असल्यास त्या त्या वेबसाईटचे राखीव . )

Comments

मर्मभेदी लेख. पण एवढं सगळं असताना उद्योग क्षेत्रात मराठी लोकांचं भविष्य उज्ज्वल आहे. कारण ती काळाची गरज बनली आहे. सटर्डे क्लब सारख्या संस्था खुप छान काम करत आहेत. नवीन मराठी उद्योजकांना चांगल्याप्रकारे मदतीचा हात दिला जात आहे. एकंदरीत लेखातील नकारात्मक गोष्टींचा त्याग करून नाविन्याचा ध्यास धरला तर भविष्य उज्ज्वल आहे.
चांगला लेख लिहील्या बद्दल अभिनंदन.
Unknown said…
Chinmay appreciate writing this blog. Overall the lame excuses cited for non-risk taking are factual. But I guess you were a little harsh on the "marathi manoos"..becasue we see these behavioral patterns across. I'll say you captured the middle-class to lower middle-class "contented" attitude on point.
Unknown said…
Nice one Chinmay. How do you manage to write this in the dead of the night ?☺
Unknown said…
This comment has been removed by the author.
Unknown said…
चिन्मय,चांगला लेख लिहिला आहेस. वास्तव मांडले आहे, पण पूवाॅपार चालत आलेल्या सामाजिक जडणघडणीची जोखडे मोडून नविन ऊमेदिने भरारी घेवू पहाणारया मराठी मुलांना योग्य मागॅदशॅन करण्याची जबाबदारी पण तूझ्या सारख्यानी घ्यायला हवी.
Nitin Kulkarni said…
Very nice. Most of the observations are really & sadly true.
Unknown said…
लोक काय म्हणतील, पक्षपाती समजतील म्हणून आज किती मराठी माणसं अनेक चांगल्या संधींना मुकले आहेत. राज्याबाहेर राष्ट्रीय पातळीवर जिथे सर्वच राज्यातील लोकं असतात अशा ठिकाणी मराठी लोकं ओळख असूनही साधी मैत्रीही करत नाहीत की मग एकमेकांत बोलताना मराठीत बोलत नाहीत. असं करणारे मला तरी मराठी लोकंच दिसले, इतर राज्यातील मंडळी एकमेकांत फार मिळूनमिसळून राहतात. आणि जर दोन मराठी माणसांची घट्ट मैत्री झालीच तरी इतर मराठी लोकं नावं ठेवायला आघाडीवर असतात.
Harshal Sulakhe said…
Nice one Chinmay.. but things are changing..for good.. nust to name a few quick heal and m-indicator are Owned by Marathi manus and another marathi manus had the guts to manufacture airplane on his terrace and now will have his own unit in palghar..
chrisrebello said…
चिन्मय, डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख तरीही काही अपवाद निर्माण होत आहेत. आशा आहे कालानुरूप आपला मराठी माणूस बदलून येणार्‍या संधी दवडणार नाही.
Crasto Walter J said…
This comment has been removed by the author.
Crasto Walter J said…
Very Nice Chinmay !!!
Keep doing good work !!!!

😃 👌🏼👌🏼👍🏼

I think some other attribute of ours which drags us ....
Person Worship ( व्यक्तीपूजा ), Proud of region and culture (अस्मिता ) etc .... This keep us within our shell or boundaries.


I don't agree on favoring Marathi manoos over others ......... One has to rational.
Anil said…
Nice article Chinmay
Unknown said…
विचार करायला लावणारा लेख....thanks Chinmay
*कुसुमाग्रज म्हणजे कोण ?*

आज मराठी भाषा गौरव दिनी मला
एका मित्राचा संदेश आला,
"एखादी आजच्या दिवसाला
अप्रोप्रिएट अशी मराठीची
पोस्ट मला सेंड कर ना ! प्लीज !"

मातृभाषेपासून दूर राहणाऱ्या
पाप्याच्या पितरा.. (मनात)
हो पाठवतो ना तुला लगेच
ठेकाच घेतलाय मी भाषेचा,
साहित्याचा, सर्जनाचा अन
रसिकतेचाही ! आणि महत्त्वाचे
मित्रप्रेमाचाही !

"पण ही पोस्ट जिला सेंड करशील
तिला 'कुसुमाग्रज' माहिती कितपत ?"
माझा आपला भाबडा प्रश्न !

तो म्हणाला -
"जेमतेमच !"
"पण तिला माहिती आहे
नभातील एका ताऱ्याला
त्यांचे नाव दिलंय !
आणि तिने तिचं हृदय
मलाच दिलंय !"

थोडक्यात त्याला हवे
'लिमिटेड एडिशन'चे "कुसुमाग्रज !"

आता ऐक -

मध्यमवर्गीय समाजापासून
अलिप्त राहणाऱ्यांच्या
वृत्तीवर टीका करणारे -
"कुसुमाग्रज !"

दुर्बोधतेला नकार देणारे
आणि सामाजिकतेला स्वीकारणारे -
"कुसुमाग्रज !"

लेखकांच्या अतिरेकी विश्लेषणाला
विकृत आत्मनिष्ठेला
पढीक पांडित्याच्या कैदेत
अडकण्याला विरोध करणारे -
"कुसुमाग्रज !"

पारंपरिक अज्ञान,
जातीभेद आणि दारिद्रयाच्या
खाईत बेशुद्ध समाजाला
मानवतेची संजीवनी देणारे -
"कुसुमाग्रज !"

तिरसट, कडवट आणि
सहानुभूतिशून्य लेखन हेच
उत्स्फूर्त आणि प्रामाणिक
असे काव्य मानणाऱ्यांना -
खरे काव्य म्हणजे काय ?
हे सांगणारे -
"कुसुमाग्रज !"

साहित्यात अवतीर्ण होणार्‍या
नव्या पुरोहितशाहीवर
कोरडे ओढणारे -
"कुसुमाग्रज !"

'बांधिलकी' पेक्षा 'सामिलकी'
ही दौलत मानणारे -
"कुसुमाग्रज !"

"हे कळव तुझ्या डार्लिंगला
आणि कर सेलिब्रेट
*'मराठी लैंग्वेज डे'* तुझा
'As per her wish'
अगदी विशेष असा !
- हेमंत सुधाकर सामंत

Popular posts from this blog

आय टी चे मृगजळ : काय सत्य काय असत्य !! मराठी पालकांनी करावे तरी काय ?

( प्रस्तुत लेखक स्वतः एका बहुराष्ट्रीय आय टी कम्पनी मध्ये कार्यरत असून ,या क्षेत्राचा १५ वर्षे अनुभव आहे .लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत. काही मुद्दे कठोर भाषेत मांडले आहेत .यात कुठल्याही व्यवसायाचा अथवा व्यावसायिकाचा वैयक्तिक उपमर्द करण्याचा हेतू नाही .आपल्या मुलाला अथवा मुलीला "आय टी " क्षेत्रात पाठवायला बघत असाल तर नक्कीच वाचा आणि आपल्या पाल्याला वाचायला द्या .लेखाचा विषय तांत्रिक असल्याने जिकडे योग्य मराठी प्रमाण प्रतिशब्द मिळाले नाहीत तिकडे मूळ तांत्रिक संज्ञा वापरल्या आहेत ) आय टी  चे मृगजळ : काय सत्य काय असत्य  सध्या वर्तमानपत्र उघडले की आय टी क्षेत्रात मंदी आहे आणि हजारो लोकांचे रोजगार जाणार अश्या बातम्या दिसतात . अमेरिकेने आणि इतर देशांनी व्हिसा चे नियम कडक केले असल्याने भारतीय आय टी प्रोफेशनल्स च्या बऱ्याच संधी जाणार अशी ओरड सुद्धा दिसते . या दोन्ही मुद्द्यात नक्कीच तथ्य आहे .पण यासाठी सरसकट आय टी कम्पन्यांना किंवा अमेरिकन सरकार ला व्हिलन बनविण्याआधी काही बाबींचा सर्वांगीण परामर्श घेणे गरजेचे आहे .आपल्या आय टी क्षेत्रा बद्दलच्या क...

The Crazy Airline Pilot

Hi The great Sarkari Indian Airlines (Now Air India) has done it again!They took passengers ransom for their own mistakes and tantrums yesterday on IC 164 from Goa to Mumbai. I was the one who praised Indian Airlines when they did a fantastic job during the employee strike recently in June earlier this year.(Please refer to my Articles published in DNA newspaper on 15th June 2007 titled "Hats off to Indian Spirits" and in Hindustan Times the same day titled "Indian did a good job" ) However sunday's episode raises serious doubts on Indian Airlines' ability to perform as "customer caring /serving entity". It was a lazy Sunday afternoon (11th November 2007) in Goa and most of the Travellers were returning to their home destinations after spending a diwali holiday (being a long weekend) in Goa.Everyone had to join their offices/business the next day and hence preferred afternoon flights to go back which gives a relaxing evening at home before anothe...