पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता लोकरंग ३ ० एप्रिल २ ० २ ३ : https://www.loksatta.com/lokrang/chatgpt-in-career-planning-chatgpt-jobs-career-opportunities-in-chatgpt-zws-70-3621553/
चिन्मय गवाणकर
(लेखक एका बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये संचालक असून त्यांना डेटा अॅनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात दोन दशकांहून अधिक व्यावसायिक अनुभव आहे .लेखातील मते वैयक्तिक आहेत )
मागच्या वर्षी डिसेम्बर मध्ये अचानक चॅट जीपीटी नावाचे “खेळणे” इंटरनेट विश्वात अवतरले आणि बघता बघता पाच दिवसात १० लाख लोक ते वापरू सुद्धा लागले . लँडलाईन टेलिफोन सर्व्हिस जगभरातील १० लाख लोकांना पोहोचेपर्यंत ७५ वर्ष लागली होती म्हणजे जवळजवळ ३ पिढया ! ,नेटफ्लिक्स ला हाच टप्पा पार करायला साडे तीन वर्ष,ट्विटर ला २ वर्ष आणि फेसबुक ला १० महिने लागले होते . यावरून या नवीन तंत्रज्ञानाचा आवाका आणि वेग किती आहे हे लक्षात येईल . आणि म्हणूनच हा वेग कुठली व्यावसायिक क्षेत्रे बदलेल आणि सध्या शाळा,कॉलेज मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना या बदलाशी आणि वेगाशी आपले करियर प्लँनिंग जुळवून घेण्यासाठी काय करायला हवे याची चर्चा आपण करणार आहोत .
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान काही नवे नाही . गेली कित्येक वर्षे आपण त्याचा अनुभव विविध क्षेत्रात घेत आहोत . हे तंत्रज्ञान आपली कार्य करण्याची आणि जगण्याची पद्धत बदलत आहे आणि त्यास ChatGPT ज्यावर बनवले आहे ते “जनरेटिव्ह AI “ तंत्रज्ञान सुद्धा अपवाद नाही. आपल्याला आजपर्यंत माहित असलेले कॉग्निटिव्ह AI तंत्रज्ञान माणूस कसा शिकतो आणि कसा विचार करतो याचे शिक्षण माणसांकडूनच घेऊन समस्यांचे उत्तर शोधायचा प्रयत्न करते पण हे नवीन जनरेटिव्ह AI नवीन गोष्टी तयार करते ज्या पूर्वी कधीही अस्तित्वात नाहीत.दोघांच्या “ट्रेनिंग” मध्ये सुद्धा खूप फरक आहे . जेव्हढी माहिती एका माणसाला साधारण वाचून समजून घ्यायला ..अगदी २४ तास नॉन स्टॉप .. २००० पेक्षा जास्त वर्षे लागतील तेव्हढी माहिती ChatGPT चा कणा असलेले GPT ४ मॉडेल ला देण्यात आली आहे .
आपल्याला आजपर्यंत माहित असलेले मशीन लर्निंग व AI आणि नवीन जनरेटिव्ह AI मधला फरक सोप्या शब्दात पाहू . एखादा शिक्षक “निबंध कसा लिहावा “ हे मुलांना कसे शिकवेल ? तो दोन प्रकारे शिकवू शकेल :
१ . निबंधाची रूपरेषा,विषय ,भाषा शैली ,शुद्धलेखन ,सुरुवात ,मध्य आणि सारांश कसा लिहावा ,संदर्भ कसे वापरावेत हे सगळे मुळापासून शिकवेल आणि असे खूप वेळा शिकवून झाले की विद्यार्थी ते शिकून नवीन निबंध लिहितील : सध्या माहित असलेले मशीन लर्निंग आणि AI
२. शिक्षक वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर निबंध मुलांना फक्त वाचायला देतील की “बघा मुलांनो , असे असे प्रकारचे निबंध असतात “ . मुले सगळे निबंध वाचून आपले मत बनवतील आणि पुढचा निबंध नवीन लिहितील : जनरेटिव्ह AI ( यात भाषेचे,शैलीचे इत्यादी प्रशिक्षण त्यांना कुणीच दिले नाही )
चॅटजीपीटी तंत्रज्ञान हे असे आहे ! त्यामुळे काही कामे फटाफट स्वयंचलित करून विविध व्यवसाय आणि करिअर यांच्या मध्ये याआधी कधीही न झालेला बदल घडवून आणीत आहे . काही सर्जनशील (Creative ) व्यवसाय बदलत आहेत आणि काही नवीन व्यवसाय जन्माला सुद्धा येत आहेत .
कलाकार आणि डिझायनर्ससाठी जनरेटिव्ह एआय हे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. हे त्यांना नाविन्यपूर्ण डिझाइन आणि कलाकृती तयार करण्यास मदत करू शकते पण त्याचवेळी कुणीही या तंत्रज्ञाना चा वापर करून आर्टवर्क बनवू शकते त्यामुळे वर्षानुवर्षे मेहनत करून ज्या चित्रकारांनी आपली हयात या क्षेत्रात घालवली त्यांच्या तोडीचे नवीन आर्टवर्क कुणीही २ मिनिटात आज बनवू शकते जनरेटिव्ह एआयमध्ये लोगो, लेआउट्स आणि इतर व्हिज्युअल घटकांचे डिझाइन स्वयंचलित करण्याची क्षमता आहे. यामुळे ग्राफिक डिझाईन सेवांच्या मागणीत घट होऊ शकते आणि डिझायनर्सची काम करण्याची पद्धत बदलू शकते.
जनरेटिव्ह एआयचा लेखन आणि साहित्य निर्मिती उद्योगांवरही परिणाम झाला आहे. ChatGPT, विशेषतः, लेख, कथा आणि इतर लिखित सामग्री तयार करण्यासाठी वापरले गेले आहे. OpenAI सारख्या कंपन्यांनी असे मॉडेल विकसित केले आहेत जे बातम्या लेख आणि एव्हढेच काय पण अगदी संपूर्ण पुस्तके लिहू शकतात. या तंत्रज्ञानामुळे लेखन साहित्य तयार करणे सोपे झाले आहे, परंतु AI-व्युत्पन्न साहित्याचा पत्रकारितेवर आणि एकूणच लिखाणाच्या गुणवत्तेवर होणार्या परिणामाबद्दलही चिंता निर्माण झाली आहे.मोठमोठी पुस्तके ,लेख ,कायदेशीर निवाडे,मेडिकल जर्नल्स ,जे वाचून त्याचा सारांश काढायला माणसांना कित्येक तास ते अगदी कित्येक महिने सुद्धा लागू शकतात ,तेच काम आज १० सेकंदात होते . त्यामुळे लेखक ,कायदेशीर सल्ला देणाऱ्या संस्था ,क्रिएटिव्ह एजेन्सीस ,मार्केटिंग एजेन्सीस यांना या तंत्रज्ञानाची मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे
दुसरीकडे, जनरेटिव्ह एआय आणि चॅटजीपीटीचा अवलंब केल्यामुळे ग्राहक सेवेतील काही करिअरमध्ये मानवी नोकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे . कॉल सेंटर्स मध्ये संभाषण करण्यासाठी जनरेटिव्ह एआय वापरणारे चॅटबॉट्स, ग्राहकांच्या शंका आणि समर्थन हाताळण्यासाठी वाढत्या प्रमाणात वापरले जात आहेत. यामुळे काही प्रकरणांमध्ये मानवी ग्राहक सेवा प्रतिनिधींची जागा चॅटबॉट्स नी घेतली आहे.भारतासारख्या बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग ( BPO) आणि नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग (KPO ) या क्षेत्रात अजून तरी दबदबा राखून असणाऱ्या देशातील लाखो रोजगारांना त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे . हे समजून घेणे आपल्यासाठी फार महत्वाचे आहे कारण साधारण २००० सालानंतर पुढील १० वर्षे तरुणाची एक अक्खी पिढी भारतात आय टी आणि BPO /KPO क्षेत्रात संधी मिळाल्यामुळे पुढे गेली .आय टी मध्ये सुद्धा आता GITHUB COPILOT सारखे GPT वर चालणारे तंत्रज्ञान कमी खर्चात वेबसाईट बनवणे ,मोबाईल एप्लिकेशन्स बनवणे इतकेच काय पण पूर्ण संगणक प्रोग्रॅम्स बनवणे यासाठी मूठभर लोकांना मदत करते आहे . त्यामुळे पूर्वीसारखे कॉल सेंटर मध्ये कॉल घेण्यासाठी लागणारे हजारो तरुण आणि आय टी सॉफ्टवेअर बनविण्यासाठी मोठं मोठ्या आय टी कम्पन्या ज्यांना नोकऱ्या द्यायच्या ते लाखो फ्रेशर्स इंजिनियर आता यापुढे लागणार नाहीत . त्यामुळे गेली दोन दशके आपण आपल्या स्वस्त मनुष्यबळावर जी क्षेत्रे पादाक्रांत केली त्यात यापुढे तेव्हढे रोजगार निर्माण होणार नाहीत यासाठी आपण तयार राहिले पाहिजे .
जनरेटिव्ह AI वास्तुविशारद आणि अभियंत्यांना इमारती, पूल आणि इतर संरचनांसाठी अनुकूल डिझाइन तयार करण्यात मदत करू शकते. हे मानवी वास्तुविशारद आणि अभियंत्यांची जागा घेऊ शकत नसले तरी, या डिझाइन्सच्या निर्मितीसाठी लागणारा वेळ आणि मेहनत कमी करू शकते.एआय आणि मशीन लर्निंग स्वयंचलित डेटा विश्लेषण आणि भविष्यसूचक मॉडेलिंगमध्ये मदत करू शकतात. यामुळे डेटा विश्लेषकांची मागणी कमी होऊ शकते आणि त्यांच्या कामाचे स्वरूप बदलू शकते.
निश्चितपणे, काही व्यवसाय इतरांपेक्षा जनरेटिव्ह AI आणि ChatGPT मुळे प्रभावित होण्यास अधिक संवेदनाक्षम असतात. उदाहरणार्थ, ज्या नोकऱ्यांमध्ये पुनरावृत्ती होणारी, नित्याची कामे किंवा स्वयंचलित असू शकतात अशा नोकऱ्यांना जास्त धोका असतो. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की या व्यवसायांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता असली तरीही या क्षेत्रात थोड्या मानवी हस्तक्षेप आणि कौशल्याची आवश्यकता असेल. एआय आणि ऑटोमेशन ही अशी साधने आहेत जी व्यावसायिकांना मदत करू शकतात, परंतु ते मानवी हस्तक्षेप सध्यातरी पूर्णपणे बदलू शकत नाहीत. त्यामुळे, नोकरीच्या बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्यासाठी या व्यवसायातील व्यक्तींनी कौशल्य वाढवणे आणि बदलत्या वातावरणाशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे.पण संख्येचे सामर्थ्य म्हणजेच भरपूर स्वस्त कुशल मनुष्यबळ देणाऱ्या आपल्या भारतासारख्या “बॉडी फॅक्टरीज “ चे दिवस संपून खूप स्पेशलाईज व्यावसायिकांचे दिवस सुरु होतील .
परिस्थिती अशी गंभीर दिसत असली तरी हे सुद्धा तितकेच महत्वाचे की इतिहास असे सांगतो की उपलब्ध तंत्रज्ञानातील कुठलाही असा मोठा बदल काही जुने व्यवसाय नष्ट करतो आणि नवीन व्यवसाय निर्माण करतो .आपण अगदी पहिल्या औद्योगिक क्रांती पासून हे पाहत आलो आहोत . त्यामुळे सध्या आपल्याला माहित असलेल्या नोकऱ्या /व्यवसाय बदलतील /नष्ट होतील म्हणून सावध असण्याबरोबरच या बदलाने नवीन संधी कुठल्या निर्माण होतील आणि त्यासाठी आपण कसे तयार राहिले पाहिजे हे पाहण्यासाठी, फक्त तीन पैलूंचा विचार करूया कि जिकडे जनरेटिव्ह AI मॉडेल्स कमी पडू शकतात प्रथम, इच्छित आउटपुट प्राप्त करणारा प्रॉम्प्ट तयार करण्यासाठी थोडीशी (मानवी) हुशारी लागू शकते. प्रॉम्प्ट मधील किरकोळ बदलांमुळे आउटपुटमध्ये मोठा बदल होऊ शकतो.
दुसरे, ही AI मॉडेल्स अयोग्य किंवा निरर्थक आउटपुट तयार करू शकतात. तिसरे, AI संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे, अश्या जनरेटिव्ह मॉडेल्समध्ये कोणतेही अमूर्त, सत्य किंवा खोटे काय आहे, काहीतरी बरोबर आहे की चुकीचे आहे आणि सामान्य ज्ञान काय आहे याची सामान्य समज नसते. विशेष म्हणजे ते तुलनेने सोपे गणित करू शकत नाहीत. याचा अर्थ असा की त्यांचे आउटपुट अनपेक्षितपणे दिशाभूल करणारे, पक्षपाती, तार्किकदृष्ट्या सदोष किंवा अगदी सध्या भाषेत “ खोटे” असू शकते.चॅट जीपीटी ने बऱ्याच अस्तित्वात नसलेल्या गोष्टी अगदी खऱ्या वाटाव्या इतक्या आत्मविश्वासपूर्ण भाषेत दिलेल्या आहेत . त्यामुळे चॅट जीपीटी सगळेच बरोबर “बनवेल” असे नाही . तिकडे माणूस हवाच . मॉडेल्स चे हेच अपयश सर्जनशील आणि ज्ञानी व्यावसायिकांसाठी संधी बनू शकतात आहेत.
मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या अभ्यासानुसार, 2030 पर्यंत, एआय आणि ऑटोमेशन जगभरातील 800 दशलक्ष नोकर्या विस्थापित करू शकतात पण त्याच अहवालात असेही सूचित केले आहे की AI नवीन रोजगार संधी निर्माण करेल आणि 375 दशलक्ष पर्यंत कामगारांना आपल्या कामाचे स्वरूप बदलावे लागेल किंव्वा नोकरीत राहण्यासाठी नवीन कौशल्ये शिकण्याची आवश्यकता भासेल . पूर्वीचे पदवी मिळाल्यावर एका नोकरीत “चिकटण्याचे “ आणि तिकडून ३०–३५ वर्षांनी काहीही नवीन न करता ,न शिकता सुखाने रिटायर होण्याचे दिवस तर नव्वदीच्या दशकात संपलेच पण आता आपण शिकलेले ज्ञान आणि कौशल्य ५ वर्षात कालबाह्य होण्याचे दिवस आलेले आहेत . त्यामुळे तुम्ही आजचे विशी मधले पदवीधर कॉमर्स ची पदवी घेऊन अकाउंट्स करत असाल किव्वा इंजिनियर होऊन कोडिंग आणि टेस्टिंग करत असाल किव्वा अगदी कायद्याचे शिक्षण घेऊन घेऊन कोर्पोरेट लॉ मध्ये “स्पेशलायझेशन” करत असाल तरी ते तुम्ही आता तश्याच प्रकारे आयुष्यभर करू शकणार नाही हे सत्य मान्य करावेच लागेल. AI चा अवलंब जसजसा वाढत चालला आहे, तसतसे व्यक्ती आणि संस्थांनी नवीन तंत्रज्ञानासह अद्ययावत राहणे आणि नोकरीच्या बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्यासाठी नवीन कौशल्ये विकसित करणे महत्त्वाचे आहे.
एआय आणि ऑटोमेशनचा अवलंब जसजसा वाढत चालला आहे, तसतसे विद्यार्थ्यांनी त्यांच्या भविष्यातील करिअरमध्ये या बदलांसाठी तयारी करणे आवश्यक आहे. सध्या शाळेत,महाविद्यालयात असणारी मुले आणि नुकतेच नोकरीला लागलेले तरुण तरुणी हे या बदलासाठी तयार होण्यासाठी येथे काही पावले उचलू शकतात. आणि हे सर्वांना करावे लागेल . कॉमर्स /सायन्स /आर्ट्स वगैरे स्पेशलायझेशन चे दिवस सुद्धा आता मागे पडले .आपल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुद्धा कौशल्याधारित अभ्यासक्रम आता शिकवला जाणार आहे . त्यामुळे कला शाखेतील विद्यार्थ्याने प्रोग्रामिंग का शिकावे आणि इंजिनियर ने मानसशास्त्र का शिकावे असले वाद घालण्यात अर्थ नाही .
मग नक्की करायचे काय ? सोपे आहे . मी साधारणपणे सर्वांना खालील दशसूत्री वर विचार करायचा सल्ला देईन . हे वाचताना कदाचित फार सोपे आणि मूलभूत वाटेल . आणि काही वाचक तर म्हणतील चॅट जीपीटी च्या लेखात हे काय तत्वज्ञान ! पण आज हेच खूप महत्वाचे आहे .
सखोल पायाभूत शास्त्रीय कौशल्ये विकसित करा: विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान,सांख्यिकी ( स्टॅटिस्टिक्स ) आणि संगणक शास्त्रातील सखोल पायाभूत कौशल्ये विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. AI आणि ऑटोमेशनची मूलभूत तत्त्वे समजून घेण्यासाठी या विषयांचे ठोस आकलन आवश्यक असेल.गणित आणि सायन्स “ऑप्शन” ला टाकू नका . पण त्यांच्याशी मैत्री करा . गणिताचा बागुलबुवा न करता मूलभूत गणिती संकल्पना समजून घ्या .
कोडिंग आणि प्रोग्रामिंग शिका : एआय आणि ऑटोमेशनसह काम करू पाहणाऱ्यांसाठी कोडिंग आणि प्रोग्रामिंग ही आवश्यक कौशल्ये आहेत. विद्यार्थ्यांनी पायथन आणि R सारख्या प्रोग्रामिंग भाषांमध्ये किमान मूलभूत ट्रेनिंग घेण्याचा विचार करावा.हे शिकण्यासाठी काहीही जास्त मेहनत लागत नाही . कुणीही या भाषा अगदी प्रोग्रामिंग चा कसलाही गंध नसताना १० ते १२ दिवसात शिकू शकते . ते सुद्धा अगदी फुकट . कसे ते याच लेखात पुढे दिलेले आहे
एआय आणि मशीन लर्निंगमधील अभ्यासक्रम पूर्ण करा: एआय आणि मशीन लर्निंग अधिकाधिक महत्त्वाचे होत असल्याने विद्यार्थ्यांनी या विषयांमध्ये अभ्यासक्रम घेण्याचा विचार केला पाहिजे. हे अभ्यासक्रम त्यांना AI ऍप्लिकेशन्स कसे विकसित करायचे आणि AI कसे कार्य करते हे शिकवतील.अगदी डॉक्टर्स,वकील ,आर्किटेक्ट्स एव्हढेच काय पण पत्रकार आणि कलाकारांना सुद्धा बेसिक्स ऑफ AI समजलेच पाहिजे . आपल्या कामात AI चा चपखल उपयोग करून अधिक उत्पादकता कशी वाढविता येईल हे समजेलच आणि त्याच बरोबर आपली कुठली कामे AI “गिळून” टाकेल हे समजायला सुद्धा याचा फायदा होईलच :-) हे सुद्धा फुकट शिकता येईल .
गंभीर विचार आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करा: AI आणि ऑटोमेशन ही समस्या सोडवण्यासाठी उत्कृष्ट साधने आहेत, परंतु तरीही त्यांना आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे मानवी इनपुट आणि कौशल्य आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी गंभीर विचारसरणी आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे जेणेकरुन AI करू शकत नसलेल्या समस्या ओळखू शकतील आणि त्यांचे निराकरण करू शकतील.यासाठी मात्र जरा जास्त प्रयत्न लागतील . शिक्षकांची मदत लागेल . गट चर्चा ,वाद विवाद आणि केस स्टडी सोडविण्याची पद्धत शाळांनी विकसित केली पाहिजे .
सर्जनशीलता आणि नवोन्मेषावर जोर द्या: एआय आणि ऑटोमेशन विविध उद्योगांमध्ये परिवर्तन घडवत आहेत, सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णतेसाठी नवीन संधी निर्माण करत आहेत. विद्यार्थ्यांनी सर्जनशील विचार कौशल्ये विकसित करण्यावर आणि नवीन कल्पना आणि संकल्पनांसह प्रयोग करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.सरकारने सुद्धा शाळांमध्ये “अटल टिंकरींग लॅब्स “ सारखे उपक्रम सुरु केलेले आहेत . प्रयोगशीलता आणि “ चुकण्यातुन शिकणे” हे अंगीकारले पाहिजे .
संवांद कौशल्य आणि नेतृत्व गुण विकसित करा,भरपूर खेळा आणि टीमवर्क शिका : आपल्या कोशात राहून “ आपण बरे आणि आपले काम बरे” , “आपण नाही बाबा पुढे पुढे बोलायला जात “ ,असे जुने विचार सोडून देण्याची सुद्धा हीच वेळ आहे . जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ने प्रगत मशिन्स सामान्य माणसांची कामे करायला लागतील तेव्हा उरलेल्या नोकऱ्या आणि नवीन निर्माण झालेल्या व्यवसाय क्षेत्रात असलेल्या मानवी स्पर्धेत उठून दिसण्यासाठी मूलभूत संवाद कौशल्ये ( Communication Skills ) आणि नेतृत्व गुण (Leadership Qualities ) ज्यांच्याकडे असतील त्यांना प्रथम संधी मिळतील . नेतृत्व गुण म्हणजे सर्वांनी राजकारणात जाऊन निवडणूक लढवणे नव्हे ,पण कुठल्याही क्षेत्रात सर्वोत्तम होऊन इतरांना पूढे जाण्यास मदत करणे आणि त्यांना वेळोवेळी आपल्याला येत असलेल्या चांगल्या गोष्टींचे प्रशिक्षण देऊन सक्षम करणे म्हणजे नेतृत्व गुण दाखविणे . शाळेपासूनच वक्तृत्व स्पर्धांत भाग घेणे , शालेय उपक्रमात नेतृत्व करणे ,विविध आंतरशालेय क्रीडा स्पर्धात भाग घेणे यातून याची सुरुवात करता येईल . टीमवर्क,म्हणजे सांघिकता शिकण्यासाठी विविध सांघिक खेळ हे उत्तम व्यासपीठ आहे .
भरपूर वाचन करा आणि लेखनाची सवय लावा : सध्याची पिढी पुस्तके वाचत नाही कारण त्यांना आज ज्ञान आणि मनोरंजनासाठी इंटरनेट ची अलिबाबाची गुहा उपलब्ध आहे . पण इंटरनेट वर पाहिलेले “शॉर्ट्स” आणि “रिल्स” निगुतीने वाचलेल्या पुस्तकातुन मिळणाऱ्या अनुभवाची आणि त्यातून काढलेल्या टिपणे आणि त्यांचे मनन करण्याच्या मागच्या पिढीच्या पद्धतीशी बरोबरी करू शकत नाही . “स्क्रीन टाइम “ मनाला विचलित करतो पण छापील मजकूर मेंदू मध्ये जास्त ग्रहण केला जातो यावर आज विपुल संशोधन उपलब्ध आहे . हे वाचन सुद्धा विविध विषयांवर हवे . राज्यशास्त्र ,व्यवस्थापन , नेतृत्वगुण ,इतिहास ,विज्ञान आणि चालू घडामोडी यांचे ज्ञान हवे . वाचलेले विषय थोडक्यात टिपणे काढून लिहून ठेवण्याची सवय सुद्धा हवी . अगदी रोजचे वर्तमानपत्र वाचण्याची सवय सुद्धा बऱ्याच घरात हल्ली अस्ताला चाललेली आहे ,ती पुन्हा मशागत करून वाढवायला हवी . वाचनाने समृद्ध बनलेली वाणी आणि लेखणी तुम्हाला अस्सलपणा ( orginality) देऊ शकते . कारण आज कोणीही चॅट जीपीटी सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून काहीही लिहू शकतो पण माणसाने लिहिलेल्या अस्सल मजकुराला कदाचित अजूनही जास्त “भाव” मिळू शकतो .त्यामुळे लेखन,वाचन,मनन आणि चिंतन या सवयी अगदी शाळेपासून लावल्या पाहिजेत .
सामाजिक क्षेत्रात थोडा अनुभव घ्या आणि जमल्यास प्रवास करा : पाश्चात्य देशात ज्याला कम्युनिटी सर्व्हिस म्हणतात त्याचे बाळकडू शाळेपासून दिले जाते आणि तरुण तरुणी आनंदाने सामाजिक कार्य करून अनुभव घेतात . अश्या अनुभवाचा फायदा नुसता सर्टिफिकेट मिळवून किव्वा फेसबुक चमकोगिरी करण्यासाठी नसून खरोखर मानवी जगात काय समस्या आहेत ते समजून त्यांना कसे सोडविता येईल याविषयी एक व्यापक दृष्टी बनवण्यास होतो . तसेच शक्यतो हे सामाजिक कार्य विविध ठिकाणी करता आल्यास त्यानिमित्ताने प्रवास होऊन “केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार “ असा सुद्धा फायदा होऊ शकतो . अगदी विविध भागातील पाणी प्रश्न ,शेतकी प्रश्न ,ग्राहकांच्या समस्या इत्यादी समजून घेतल्याने “युरेका “ क्षणासारखी तुम्हाला कदाचित एखादी स्टार्ट अप आयडिया सुद्धा मिळू शकेल
पैशाचे व्यवस्थापन शिका आणि अर्थ साक्षर व्हा : आपल्या मराठी समाजात याविषयी एक सर्वसाधारण निरक्षरता आजही आहे . हे शिकणे म्हणजे स्टॉक मार्केट मध्ये घुसून पैसे कमवणे नाही पण पैशाचे विविध स्रोत ,भांडवल कसे उभे करता येते ,प्रॉफिट मार्जिन कसे मिळविता येते ,खेळते भांडवल म्हणजे काय ,रोखे बाजार,प्रायव्हेट इक्विटी ,व्हेंचर कॅपिटल इत्यादी संकल्पना काय आहेत हे समजून घेतलेच पाहिजे . आज संपूर्ण आर्थिक जग एकत्र आल्याने जगाच्या एका कोपऱ्यात काही खुट्ट झाले की संपूर्ण जगावर परिणाम होतो . ते अर्थकारण समजून घेतले पाहिजे . यासाठी सुद्धा अर्थशास्त्रद्न्य असण्याची गरज नाही . रोजचे वर्तमानपत्र आणि बिझनेस न्यूज वाचून सुद्धा पुष्कळ समजून घेता येते .
सदैव शिकत राहा : शेवटचे आणि फार महत्वाचे सूत्र म्हणजे म्हणजे पदवी मिळताच “ शिकण्याचे दिवस संपून आता कमवायचे दिवस आले “ हे विसरून जा . आपण मिळवलेले ज्ञान काय वेगाने कालबाह्य होणार आहे याचा उहापोह आपण याच लेखात केला आहेच . त्यामुळे रोज काहीतरी नवीन शिकणे हे सर्वांना करावेच लागणार आहे . आणि शिकणे म्हणजे केवळ वर सांगतले तसे प्रोग्रामिंग आणि AI शिकणे नाही पण मेंदूची मशागत करायला अगदी काहीही तुम्हाला आवडेल ते शिकत राहा .चित्रकला,संगीत ,नृत्य,एखादे वाद्य ,परकीय भाषा ,नाट्य अनुभव ,एखादा खेळ ,स्वयंपाक ,अगदी काहीही शिका . पण शिकत राहा .कुठल्या ज्ञानाचा उपयोग कुठे होईल सांगता येत नाही . याबाबत आपण प्रसिद्ध शास्त्रज्ञ गॅलिलियो चे उदाहरण घेऊ. गॅलिलियो च्या आधी चंद्रावरील काळ्या रेषा बऱ्याच लोकांनी पहिल्या होत्या . पण त्या रेषा म्हणजे डोंगर आणि दऱ्यांमुळे बनलेल्या छाया रेषा असू शकतात हे गॅलिलियो ने पहिल्यांदाच तर्काने शोधले कारण बऱ्याच लोकांना माहित नसलेली गोष्ट म्हणजे गॅलिलीयो एक शास्त्रज्ञ तर होताच पण तो एक उत्तम चित्रकार सुद्धा होता ! त्याला त्याच्या चित्रांमध्ये विविध पोत दाखविण्यासाठी आणि उंची,खोली ,छाया दाखविण्यासाठी रंगांचा आणि विविध शेड्स चा कसा वापर करायचा हे माहित होते . तोच तर्क लावून त्याने चंद्रावर दुर्बिणीमधून मध्येच काळ्या रेषा का दिसतात याचे उत्तर शोधले ! चंद्राच्या “ कॅनव्हास “ वरील छाया आणि शेड्स म्हणजे डोंगर आणि दर्या हे तेव्हा मानवाला कळाले .
आता तुम्ही म्हणाल हे सगळे शिकायचे ,करायचे म्हणजे मजबूत पैसे लागणार ! शहरातील मुले ज्यांच्या पालकांना विविध क्लासेस लावणे परवडते तेच हे करू शकतात . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी काय करायचे ? पण त्यासाठी एक चांगली बातमी आहे . आज इंटरनेट वर हे सगळे फुकट शिकण्यासाठी अनेक मंच अगदी युट्युब पासून कोर्सेरा पर्यंत आणि आपल्या सरकारी “स्वयम “ पासून ते खाजगी अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटी पर्यंत भरपूर कोर्सेस उपलब्ध आहेत . अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा साधा अँड्रॉइड फोन आणि महिन्याचा डेटा पॅक वापरून हे सगळे फुकट शिकू शकतो .इंटरनेट नी उपलब्ध करून दिलेली संधीची समानता इकडे उपयोगी येऊ शकते . या मंचांना “Massive Online Open Courses “ (MOOC) असे म्हटले जाते . आणि ९० % कोर्सेस शिकायला फुकट असतात .पण शिकून झाल्यावर तुम्हाला परीक्षा देऊन त्या त्या विद्यापीठाचे प्रमाणपत्र हवे असेल तर मात्र नाममात्र फी भरावी लागते .
त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आले म्हणून घाबरून न जाता पालक आणि शिक्षकांनी आपल्या मुलांच्या करियर प्लँनिंग साठी आजच वरील दशसूत्री चे पालन करण्यास सुरुवात केली तर उद्याचा मराठी तरुण स्पर्धेला तोंड देण्यासाठी तयार होईल हेच खरे .
Comments