The Gavankars

Friday, February 27, 2015

जागतिक मराठी दिना निमित्त मुक्त चिंतन ..आपण मराठी आहोत का ?


आज जागतिक मराठी भाषा दिन.सकाळ पासून "लाभले आम्हास भाग्य" वगैरे मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस whatsapp आणि फेसबुक वर थडकु लागलेयत.आनंद आहे की लोकांना निदान आठवण आहे .पण वर्षा तुन एकदा असले मेसेज फॉरवर्ड करण्या पलीकडे आपण नक्की मराठी भाषा जिवंत रहावी म्हणून काय करतो ?
 
ऑफिस मध्ये जरी आधिकारिक भाषा इंग्रजी असली तरी वैयक्तिक रित्या किती जण आपल्या मराठी सहकार्यांशी ठरवून मराठी मध्ये बोलतात ?भेसळ युक्त हिंदी आणि इंग्रजी कशाला बोलतात ?जर आपण गप्पा मारत बसलो असू आणि एखाद...ा अमराठी सहकारी असेल तिकडे तर त्याला पण सम्भाषणा मध्ये सहभागी करून घेण्यासाठी हिंदी अथवा इंग्रजी मध्ये सर्वांनी बोलणे एक वेळ समजू शकते पण चार मराठी माणसे डबा खाताना किव्वा ऑफिस खाली चहा सिगरेट पिताना पण एकमेकांशी मराठी का बोलत नाहीत ?लाज वाटते की "लो क्लास " वाटते ?
 
 
तेच घरात.एक तर आपण सर्व मेंढरा सारखे हल्ली आपल्या मुलांना ( हो हो अगदी मी सुद्धा ) इंग्रजी शाळां मध्ये घालतो.शाळेत बिचारी मुले इंग्रजी बोलतात .मग घरी तरी त्यांच्या शी मराठी मध्ये बोला की !पण नाही !मला अशी बरीच कुटुंबे माहित आहेत की त्यांना आपण मुलांशी घरात पण इंग्लिश बोलतो याचा कोण अभिमान असतो ! मुलाला एखादी गोष्ट समजावून सांगताना " बाळा ,असे नको रे करूस " हे सांगण्या ऐवजी " बेटा,पुन्हा डोंट डू धिस हा " असले भेसळ भाषा सल्ले देणारे पालक काय मर्दमुकी गाजवतायत ?
 
किती जण मराठी वृत्तपत्रे आणि पुस्तके वाचतात ?माझे अनेक मित्र मला सांगतात की त्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्या मुळे मराठी वाचायला त्रास होतो !अरे मग प्रयत्न करून शिका ना ..सवय होईल हळू हळू.आज हजारो रूपये खर्च करून जर्मन,स्प्यानिश,फ्रेंच भाषा घड़ा घड़ा शिकता ना ?हल्ली तर म्याण्डरिन ( चीनी)भाषा पण शिकायचे वेड लागलेय.ती तर अजुन कठीण,त्याची लिपि पण वेगळी ,मग आपली मातृभाषा नीट शिकायला लाज वाटते ?की मराठी शिकुन पैसा मिळतं नाही म्हणून साइडिंग ला ती भाषा ?
 
मग जर आपल्याला हे मान्य असेल की मराठी जगवली पाहिजे तर कृपया सोशल मिडिया च्या आभासी जगा बाहेर पण मराठी चा आवर्जून वापर करा.घरात मराठी पेपर येत नसेल तर पहीले त्याची वर्गणी भरा.मुलांना आणि स्वत् :ला सुद्धा मराठी पुस्तके वाचायची सवय लावा.दुसऱ्या मराठी माणसा शी मराठी मध्ये बोला.आणि हे सर्व एक वर्ष केलेत तर पुढच्या 27 फेब्रुवारी ला अभिमानाने मराठी भाषा दिनाचे मेसेज फॉरवर्ड करायचा हक्क तुम्हाला प्राप्त होईल.
 
वाचा..विचार करा आणि पटले तर आपल्या मराठी मित्रां बरोबर शेअर करा.
 
चिन्मय गवाणकर
वसई
http://gavankar.blogspot.in
 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home